परराज्यातील रुग्णांना गोमेकॉत शुल्क लागणार

परराज्यातील रुग्णांना गोमेकॉत शुल्क लागणार

>> आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे : डिसेंबरपासून कार्यवाहीचा विचार

परराज्यांतून गोव्यातील सरकारी इस्पितळात उपचारांसाठी येणार्‍या रुग्णांना येत्या डिसेंबर महिन्यापासून मोफत उपचार सेवा मिळणार नसून त्यांना शुल्क लागू करण्याचा विचार आरोग्य खात्याने केला आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यानी काल दिली.

गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या इस्पितळात कारवारपासून सिंधुदुर्गपर्यंतचे रुग्ण उपचारासाठी येत असतात. परिणामी गोमेकॉवर प्रचंड ताण पडतो. गोमेकॉबरोबरच दोन्ही जिल्हा इस्पितळातही परराज्यातून रुग्ण येत असतात. त्यामुळे या रुग्णांना येत्या डिसेंबर महिन्यापासून उपचारासाठी शुल्क आकारण्याचा आमचा विचार असून त्यावर अभ्यास करण्यासाठी अतिरिक्त आरोग्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यांची एक समिती नेमण्यात येणार आहे.
त्यासाठीची फाईल आपण तयार केलेली असून किती शुल्क आकारायचे याचा निर्णय सदर समिती घेणार असल्याचे राणे यांनी स्पष्ट केले.

गोमंतकीयांना ओळखपत्र
दाखवावे लागेल
सरकारी इस्पितळात मोफत आरोग्य सेवेसाठी डिसेंबर महिन्यापासून रुग्णांना आपण गोमंतकीय असल्याचा पुरावा म्हणून एखादे ओळखपत्र दाखवावे लागेल, असे आरोग्यमंत्र्यानी नमूद केले.
डिसेंबर महिन्यापासून गोमेकॉ व दोन्ही जिल्हा इस्पितळात परराज्यातील रुग्णांकडून शुल्क आकारण्यात येईल. त्यानंतर छोटी सरकारी इस्पितळे व आरोग्य केंद्रातही शुल्क आकारण्यात येणार असल्याचे राणे यानी नमूद केले.

सध्या गोमेकॉत गोव्यातील रुग्णांबरोबरच परराज्यातील रुग्णांवरही हृदय व अन्य शस्त्रक्रिया मोफत केल्या जातात. महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग व कर्नाटकातील कारवार आदी भागात आरोग्य सुविधा नसल्याने तेथील रुग्ण सध्या मोठ्या संख्येने शस्त्रक्रिया व अन्य उपचारांसाठी गोमेकॉत व जिल्हा इस्पितळात येत असतात. त्यामुळे या इस्पितळांवर प्रचंड ताण पडत असतो.