पणजी मनपाने फेरीवाल्यांना हटवले

पणजी मनपाने फेरीवाल्यांना हटवले

चतुर्थीनिमित्त येथील मांडवी तीरावरील पदपथावर फर्निचरसह विविध प्रकारच्या गृहोपयोगी वस्तू विक्रीसाठी घेऊन आलेल्या फेरीवाल्यांना काल पणजी महापालिकेने तेथून आपला गाशा गुंडाळायला लावला. सदर परिसर हा सीआरझेड -२ मध्ये येत असल्याने तेथे फेरी भरवण्यास परवानगी न देण्याचा आदेश उच्च न्ययालयाने दिलेला असल्याने काल महापालिकेने या फेरीवाल्यांना त्यांनी तेथे थाटलेली मंडपवजा दुकाने हटवण्याचा आदेश दिला.
आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे महापालिकेनेच या फेरीवाल्यांना गेल्या शनिवारी सदर ठिकाणी दुकाने थाटण्यास परवानगी देऊन त्यांच्याकडून त्यासाठीचे शुल्कही घेतले होते. मात्र, हे शुल्क भरल्याची पावती कोर्‍या कागदाच्या छोट्या चिठोर्‍यावर लिहून देण्यात आली होती.
पैसे भरून परवानगी मिळवलेली असताना काल महापालिकेच्या बाजार निरीक्षकांनी सदर फेरीवाल्यांना तेथून गाशा गुंडाळण्याची सूचना केल्यानंतर वादावादी झाली. महापालिकेचे आयुक्त दीपक देसाई यांनी यासंबंधी आपली भूमिका मांडताना सदर विभाग हा सीआरझेडमध्ये येत असल्याने व न्यायालयाने सदर ठिकाणी फेरी भरवता येणार नाही असा स्पष्ट आदेश दिलेला असल्याने फेरीवाल्यांना तेथे दुकाने थाटता येणार नसल्याचे स्पष्ट केले. शनिवारी महापालिकेतील कुणी शुल्क आकारून ही दुकाने उभारण्यात परवानगी दिली हे आपणास माहित नसल्याचे ते म्हणाले. फेरीवाल्यांकडून घेण्यात आलेली शुल्काची रक्कम परत करण्याचे आश्‍वासन महापालिकेने फेरीवाल्यांना दिले आहे.
काल संध्याकाळी वरील प्रश्‍नावरून पणजी महापालिका व फेरीवाले यांच्यात वाद निर्माण झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेचे आयुक्त दीपक देसाई व उत्तर गोवा जिल्हाधिकारी नीला मोहनन् यांची तातडीची बैठक झाली व न्यायालयाचा आदेश असल्याने सदर ठिकाणी फेरीवाल्यांना दुकाने थाटू न देण्याचा व ती तेथून हलवण्यास गुरुवारपर्यंतची मुदत देण्याचा निर्णय जिल्हाधिकार्‍यांनी घेतला. यासंबंधी बोलताना या फेरीवाल्यांच्या संघटनेचे अध्यक्ष डॉमनिक फर्नांडिस म्हणाले की, दरवर्षी गोकुळाष्टमीपासून सुरू होणारी ही फेरी चतुर्थीपर्यंत चालू असते. गेल्या ५ वर्षांपासून मांडवी तीरावरील पदपथावर ती भरवण्यात येते. त्याआधी ती कांपाल परेड मैदानावर भरत असे अशी माहिती त्यांनी दिली. मडगाव येथून माल आणणे व येथे जी दुकाने उभारली आहेत त्यावर अंदाजे १० ते १२ लाख रुपये एकूण खर्च फेरीवाल्यांना (एकत्रित खर्च) आल्याचे सांगून हा खर्च आता पाण्यात गेल्यात जमा आहे, असे सांगून आम्ही अर्ज घेऊन हे केले होते. आम्ही गरिबानी हे एवढे मोठे कर्ज आता फेडायचे कसे, असा प्रश्‍न डॉमनिक फर्नांडिस व त्यांच्या सहकारी फेरीवाल्यानी या प्रतिनिधीशी बोलताना केला.
फेरीवाल्यांचे मुख्यमंत्री महापौरांना साकडे
या फेरीवाल्यांनी उशिरा संध्याकाळी पणजीचे महापौर सुरेंद्र फुर्तादो व आयुक्त दीपक देसाई यांची भेट घेऊन आपली कैफियत मांडल्यानंतर त्यांनी सदर फेरीवाल्यांना कला अकादमी अथवा फुटबॉल मैदानावर स्टॉल्स थाटू देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्‍वासन दिले. नंतर या फेरीवाल्यांनी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची आल्तिनो येथील शासकीय निवासस्थानी जाऊन भेट घेतली व न्याय मिळवून देण्याची त्यांच्याकडे मागणी केली.