ब्रेकिंग न्यूज़

पणजी – मडगाव ‘मेगा ब्लॉक’

कॉंग्रेसचे तिरंगा
मोर्चा आंदोलन रद्द

पणजी-मडगाव महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी व त्यामुळे होणारा ‘मेगा ब्लॉक’ ही समस्या पुढील पाच दिवसांत सोडवण्याचे आश्‍वासन पोलीस महासंचालक प्रणब नंदा यांनी दिल्यामुळे आज बुधवारी आगशी ते कुठ्ठाळी असा कॉंग्रेस पक्षाने जो तिरंगा मोर्चा आयोजित केला होता तो रद्द करण्यात आला आहे. पाच दिवसानंतरही जर वाहतूक कोंडीचा प्रश्‍न सुटला नाही तर तिरंगा मोर्चाचे आयोजन केले जाईल, अशी माहिती प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी काल पत्रकार परिषदेत बोलताना दिली.

वरील प्रश्‍नी तोडगा न काढल्यास तिरंगा मोर्चा आयोजित करण्यात येणार असल्याचे विरोधी पक्षनेते दिगंबर कामत व आपण प्रदेश कॉंग्रेस समितीच्या काही सदस्यांसह पोलीस महासंचालक प्रणब नंदा यांची भेट घेऊन त्यांना कळवले होते. त्यावेळी नंदा यांनी आगशी ते कुठ्ठाळी या दरम्यान, वाहतूक व्यवस्थेवर लक्ष ठेवण्यासाठी इंडियन रिझर्व्ह बटालियनची एक तुकडी नेमण्याचे आश्‍वासन दिले आहे.