पणजी पोटनिवडणुकीत ७५.२५ टक्के मतदान

पणजी पोटनिवडणुकीत ७५.२५ टक्के मतदान

विधानसभेच्या पणजी मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी काल ७५.२५ टक्के मतदान झाले. मतदानाच्या काळात कोणताही अनुचित प्रकार न घडता शांततेत पार पडले, अशी माहिती उत्तर गोवा जिल्हाधिकारी आर. मेनका यांनी पत्रकार परिषदेत काल दिली.

या पोटनिवडणुकीसाठी २२,४८२ मतदारांपैकी १६, ९१८ मतदारांनी मतदान केले. त्यात पुरुष ८११९ आणि महिला ८७९९ मतदारांचा समावेश आहे. २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत पणजीत ७८.३८ टक्के आणि २०१७ च्या पोट निवडणुकीत ६९.९८ टक्के मतदान झाले होते. मतदानाला सकाळी ७ वाजता प्रारंभ करण्यात आला. संध्याकाळी ६ वाजता मतदान प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. मतदानापूर्वी घेण्यात येणार्‍या प्रात्यक्षिकांच्या वेळी एकाही मतदान यंत्रामध्ये बिघाड आढळून आला नाही. निवडणुकीच्या प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झाल्यानंतर दुपारी १.४५ वाजता मतदान केंद्र ५ मधील मतदान यंत्रात तांत्रिक दोष निर्माण झाल्याने बदलावे लागले. तसेच मतदान केंद्र ६ आणि मतदान केंद्र ९ मधील व्हीव्हीपॅट तांत्रिक दोषामुळे बदलावी लागली, अशी माहिती जिल्हाधिकारी मेनका यांनी दिली.

सर्वाधिक मतदान मतदान केंद्र १६ येथे ८९.८६ टक्के आणि सर्वांत कमी मतदान मतदान केंद्र १५ येथे ६३.९६ टक्के एवढे नोंद झाले आहे. मतदानाच्या काळात एका ठिकाणी मतदान केंद्राच्या बाहेर जमाव गोळा होत असल्याचे आढळून आल्यानंतर पोलिसांनी सदर ठिकाणी जमलेल्या लोकांना २०० मीटरच्या बाहेर जाण्याची सूचना केली.

दत्तप्रसाद नाईक विरुद्ध कॉंग्रेसची तक्रार
कॉंग्रेसच्या उमेदवाराला मतदान न करण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते दत्तप्रसाद नाईक मतदारांना अडथळा आणि प्रलोभने दाखवत असल्याची तक्रार कॉंग्रेसचे रोहित डिसा यांनी निवडणूक कार्यालयाकडे केली आहे. या तक्रारीची चौकशी सुरू आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी मेनका यांनी दिली.

पणजीतील मतदान केंद्र ३० मधील काही मतदारांना मतदान करू नका, त्याबदल्यात मतदारांना १० हजार रुपये देतो, असे आमिष दाखविले जात आहे. या प्रकाराची निवडणूक कार्यालयाकडे तक्रार करण्यात आली आहे, अशी माहिती ताळगावच्या आमदार जेनिफर मोन्सेरात यांनी दिली.
कॉंग्रेसच्या तक्रारीनंतर ज्या महिलेला मतदान करू नको अशी सूचना करून आमिष दाखविण्यात आले होते. त्या महिलेला शोधून काढण्यात आले आहे.

१०२ वर्षीय महिलेचे मतदान

पणजी विधानसभा पोटनिवडणुकीत काल मारिया आंतोनेत नामक १०२ वर्षांच्या महिलेने मतदान केले. गोव्याच्या निवडणूक इतिहासात मतदान करणारी ती पहिलीच एवढी वयोवृद्ध महिला असावी, अशी चर्चा तिच्या मतदानानंतर ऐकू येत होती. तिला व्यवस्थितपणे चालता येत नसल्याने तिच्या नातेवाईकांनी तिला चारचाकी वाहनातून मतदान केंद्रस्थळी आणले होते.