पणजीसाठी सुभाष वेलिंगकर गोवा सुरक्षा मंचचे उमेदवार

गोवा सुरक्षा मंचने सुभाष वेलिंगकर यांची पणजी पोटनिवडणुकीसाठी आपले उमेदवार म्हणून निवड जाहीर केली. वेलिंगकर आज आपला उमेदवारी अर्ज सादर करणार आहेत.

काल पणजीत झालेल्या पत्रकार परिषदेत मंचचे ज्येष्ठ नेते अरविंद भाटीकर यांनी सुभाष वेलिंगकर यांच्या नावाची घोषणा केली. वेलिंगकर यांची पक्षाने एकमताने निवड केली असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. आयाराम गयारामांचा पराभव करून तत्त्वांचे राजकारण पुढे नेण्यासाठी सुभाष वेलिंगकर यांच्यासारख्या नेत्यांची गोव्याला गरज असल्याचे भाटीकर यांनी यावेळी सांगितले. वेलिंगकर पणजीतून निवडून येतील यात शंका नसल्याचे ते म्हणाले.

यावेळी बोलताना गोसुमंच्या कार्याध्यक्ष ऍड. स्वाती केरकर या म्हणाल्या की, सुभाष वेलिंगकर यांना पक्षाने उमेदवारी द्यावी, अशी पणजीतील सुजाण व सज्जन लोकांची मागणी होती. स्वतः वेलिंगकर हे ही निवडणूक लढवण्यास इच्छुक नव्हते. पण जनतेची मागणी लक्षात घेऊन पक्षाने आग्रह केल्यानंतर ते ही निवडणूक लढवण्यास राजी झाले.

पत्रकार परिषदेला पक्षाचे अध्यक्ष आत्माराम गावकर, उपाध्यक्ष गोविंद देव, पांडुरंग नाडकर्णी, मोनझिन आताईद, उपाध्यक्ष किरण नायक, खजिनदार अभय खंवटे, महिला विभाग प्रमुख ऍड. रोशन सावंत, संघटन मंत्री संदीप पाळणी, दत्ताराम हरमलकर, दीपक आमोणकर व शैलेंद्र वेलिंगकर हे हजर होते.