पणजीत विजयी होण्याचा सर्वच पक्षांचा दावा

पणजी पोटनिवडणुकीसाठी काल झालेल्या मतदानानंतर सत्ताधारी भाजप, कॉंग्रेस, गोवा सुरक्षा मंच व आम आदमी पार्टी अशा सर्वच पक्षांनी आपलाच उमेदवार विजयी होईल, असा दावा केला आहे.

प्रदेश भाजप अध्यक्ष विनय तेंडुलकर म्हणाले की, भाजपचे उमेदवार सिद्धार्थ कुंकळयेंकर हे किमान ८०० मतांची आघाडी घेऊन पणजीतून विजयी होतील. पक्षाने पणजी मतदारसंघात नियोजनबद्धरित्या प्रचार केल्याचे सांगून कार्यकर्त्यांच्या कष्टाचे फळ पक्षाला निश्‍चितच मिळेल, असा विश्वास त्यानी यावेळी व्यक्त केला.

आमचा विजय निश्‍चित ः चोडणकर
पणजीतून कॉंग्रेसचा विजय निश्‍चित आहे. पणजीत आम्ही खूप आक्रमकपणे प्रचार केला होता. आमची निवडणूक रणनीती ठरवतानाच आम्ही पणजीत आक्रमकपणे प्रचार करण्याचे ठरवले होते, असे प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर म्हणाले.

व्हायरल व्हिडिओ प्रकरण
भाजपवर बुमरँग ः वेलिंगकर
गोवा सुरक्षा मंचचे उमेदवार सुभाष वेलिंगकर म्हणाले की, ह्या निवडणुकीत खरी लढाई ही कॉंग्रेस व गोवा सुरक्षा मंच यांच्यात आहे. भाजप घसरून तिसर्‍या स्थानी फेकला जाणार असल्याचा दावा त्यानी केला. निवडणुकीच्या पूर्वसंध्येला आपली कन्या गौरी बोरकर यांचा आपल्या विरोधातील व्हिडिओ तयार करून तो वायरल करण्याचे भाजपने जे कृत्य केले ते बुमरँग होऊन त्यांच्यावरच उलटल्याचे वेलिंगकर म्हणाले.

सेवेची पावती भाजपला मिळेल ः सिद्धार्थ
भाजपने गेली २५ वर्षे पणजीचे प्रतिनिधीत्व केले आहे. मनोहर पर्रीकर तसेच भाजपने पणजीचा जो विकास साधला ते जनता विसरलेली नाही. ह्या २५ वर्षांच्या सेवेची पावती पणजीतील जनता भाजपला देईल, असा विश्वास भाजप उमेदवार सिद्धार्थ कुंकळयेकर यांनी व्यक्त केला.

मी जिंकणार ः बाबुश
या निवडणुकीत आपलाच विजय होणार असल्याची प्रतिक्रिया कॉंग्रेस उमेदवार बाबुश मोन्सेर्रात यांनी काल दिली. मात्र, आपण भाजप, गोवा सुरक्षा मंच व आम आदमी पार्टीच्या उमेदवारांना कमजोर समजत नसल्याचेही ते म्हणाले. मनोहर पर्रीकर हे पणजीतून निवडणूक लढवायचे तेव्हा भाजपच्या नेत्यांची पूर्ण फौज पणजीत दिसत असे. आज मात्र कोणच दिसत नव्हते, असे मोन्सेर्रात म्हणाले.

मतदार आमच्या बाजूने ः आप
कॉंग्रेस व भाजप म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हे आता जनतेला कळून चुकले असून त्यामुळे मतदार आम आदमी पार्टीलाच मते देतील, असा दावा पक्षाचे उमेदवार वाल्मिकी नाईक यानी प्रतिक्रिया देताना केला.
पणजी पोटनिडणुकीतील भाजपचे उमेदवार सिद्धार्थ कुंकळयेंकर यांचा मोठ्या मताधिक्याने विजय होईल, असे श्रीपाद नाईक यांनी सांगितले