ब्रेकिंग न्यूज़

पणजीत मगोचा बाबुशना पाठिंबा

पणजी मतदारसंघात होऊ घातलेल्या पोटनिवडणुकीत आम्ही कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार बाबुश मोन्सेर्रात यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे, असे मगो पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी काल सांगितले.

मगो पक्षाच्या केंद्रीय समितीची बैठक काल झाली. या बैठकीत आम्ही पणजी मतदारसंघात १९ मे रोजी होणार असलेल्या निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार बाबुश मोन्सेर्रात यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे, असे दीपक ढवळीकर म्हणाले. सत्ताधारी भाजपचा पाडाव करणे हे आमचे उद्दिष्ट आहे. पणजीत होऊ घातलेल्या पोटनिवडणुकीत बाबुश मोन्सेर्रात यांचा विजय निश्‍चित असल्याचा दावा त्यांनी केला.

या पोटनिवडणुकीत मगो पक्षाचे नेते व कार्यकर्ते मोन्सेर्रात यांच्या विजयासाठी सक्रीयपणे प्रचार करणार असल्याचे ढवळीकर यांनी नमूद केले. राज्यात झालेल्या दोन लोकसभा मतदारसंघात तसेच म्हापसा येथे आम्ही कॉंग्रेसच्या उमेदवारांना पाठिंबा दिला होता. तर मांद्रे येथे अपक्ष उमेदवार जीत आरोलकर यांना पाठिंबा दिला होता असे ते म्हणाले.