पणजीत भाजपची उमेदवारी  अखेर सिध्दार्थ कुंकळकरांना

पणजीत भाजपची उमेदवारी अखेर सिध्दार्थ कुंकळकरांना

मागचे काही दिवस भाजपकडून पणजी मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी उत्त्पल पर्रीकर यांच्या नावाची चर्चा सुरू होती. मात्र शेवटी भाजपने उमेदवारी पक्षाचे पणजी मतदारसंघातील माजी आमदार सिद्धार्थ कुंकळकर यांच्याच गळ्यात घातली.

भाजपने सिद्धार्थ कुंकळकर व उत्त्पल पर्रीकर अशी दोन नावे निश्‍चित करून ती नवी दिल्लीला पाठवली होती. मात्र, म्हापसा मतदारसंघात आपले दिवंगत नेते फ्रान्सिस डिसोझा यांचे पुत्र जोशुआ डिसोझा यांना उमेदवारी देणार्‍या भाजपने पणजीतून मात्र आपले दिवंगत नेते मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्त्पल पर्रीकर यांना उमेदवारी देणे टाळले हे विशेष.

पणजी मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठीचा आपला उमेदवार ठरवण्यास भाजपने पहिल्यांदाच कधी नव्हे एवढा विलंब केला. आज सोमवार दि. २९ एप्रिल हा ह्या निवडणुकपीसाठीचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठीचा शेवटचा दिवस असताना भाजपने २८ एप्रिल रोजी म्हणजे केवळ एक दिवस अगोदर आपला उमेदवार जाहीर केला. परिणामी सिद्धार्थ कुंकळकर यांना आज सोमवारी आपला उमेदवारी अर्ज कोणत्याही परिस्थितीत भरून निर्वाचन अधिकार्‍यांकडे दाखल करावा लागेल.
मनोहर पर्रीकर यांच्या निधनाने निर्माण झालेल्या सहानुभूतीचा लाभ उठविण्यासाठी भाजप उत्पल यांना उमेदवारी जाहीर करेल असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपण्यास अवघे काही तास राहिले असताना काल उशिरा कुंकळकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली.

दोनवेळा आमदार
२०१७ च्या राज्याच्या विधानसभा निवडणुकीत भाजपतर्ङ्गे सिद्धार्थ कुंकळकर आणि युनायटेड गोवन्स पक्षातर्ङ्गे बाबुश मोन्सेरात यांच्यातच लढत झाली होती. त्यावेळी सिद्धार्थ हे १०३९ मतांनी विजयी झाले होते. परंतु पर्रीकर हे केंद्रातून गोव्यात मुख्यमंत्री म्हणून आले तेव्हा सिद्धार्थ यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन पणजीची जागा पर्रीकर यांच्यासाठी रिकामी केली. तत्पूर्वी २०१४ साली मनोहर पर्रीकर यांना केंद्रात संरक्षणमंत्री म्हणून नेण्यात आल्यानंतर २०१५ साली पोटनिवडणूक झाली व तेव्हा सिद्धार्थ हे निवडून आले होते. त्यानंतर २०१७ साली पुन: ते भाजपच्या उमेदवारीवर निवडून आले.
दरम्यान. सिद्धार्थ कुंकळकर हे आज दुपारी १२ वाजता आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत.