ब्रेकिंग न्यूज़

पणजीत प्रचारतोफा थंडावल्या

>> सिद्धार्थांच्या कारवर अज्ञातांचा हल्ला

>> भाजप-कॉंग्रेसचे परस्परांवर आरोप

पणजी विधानसभा पोटनिवडणुकीची रणधुमाळी काल संध्याकाळी ५ वाजता शमली असून उद्या १९ मे रोजी या प्रतिष्ठेच्या जागेसाठी मतदान होणार आहे. काल शेवटच्या दिवशी सत्ताधारी भाजप, प्रमुख विरोधी पक्ष असलेला कॉंग्रेस यांच्याबरोबरच गोवा सुरक्षा मंच व आम आदमी या पक्षानेही जोरदार प्रचार केला. दरम्यान, भाजपचे उमेदवार सिद्धार्थ कुंकळ्येकर यांच्या कारवर गुरुवारी मध्यरात्री अज्ञातांनी केलेल्या हल्ल्यामुळे वातावरण तापले होते. भाजपने या हल्ल्यामागे कॉंग्रेसचा हात असल्याचा आरोप केला आहे. तर कॉंग्रेसचे उमेदवार बाबुश मोन्सेर्रात यांनी आरोप फेटाळत सदर हल्ला भाजपनेच रचलेले कुभांड असल्याचा संशय व्यक्त केला आहे.

सत्ताधारी भाजपने जोरदार प्रचार करताना पणजीतील ९९ टक्के मतदारांच्या गाठीभेटी घेण्यात यश मिळवले. प्रचाराच्या शेवटच्या दिवसापर्यंत आम्ही मतदारसंघातील ९९ टक्के मतदारांच्या गाठीभेटी घेतल्याचे भाजपचे उमेदवार सिद्धार्थ कुंकळ्येकर यांनी काल मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. केवळ एक टक्का एवढ्याच मतदारांपर्यंत आम्ही पोचू शकलो नसल्याचे त्यांचे म्हणणे होते.
कॉंग्रेसचे उमेदवार बाबुश मोन्सेर्रात यांनी आपण ९० टक्के मतदारांच्या गाठीभेटी घेण्यात यशस्वी ठरल्याचे सांगितले. मनात असूनही सुमारे १० टक्के एवढ्या मतदारांच्या गाठीभेटी घेणे आपणाला शक्य झाले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आपचा अनोखा प्रचार
आम आदमी पार्टीनेही या पोटनिवडणुकीत आपला प्रचार करताना कोणतीही कसर सोडली नाही. काल अखेरच्या टप्प्यात या पक्षाचे कार्यकर्ते पणजी शहराला भेडसावणार्‍या वेगवेगळ्या समस्यांची माहिती देणारे वेगवेगळे कापडी फलक हाती घेऊन शहराच्या प्रमुख ठिकाणी उभे होते. एका ठिकाणी पणजीत पार्किंगसाठीची सोय नाही हे लोकांना दाखवून देण्यासाठी ‘एन्डलस हंट फॉर पार्किंग’, असा कापडी फलक हाती घेऊन उभे असलेले आम आदमीचे कार्यकर्ते पहावयास मिळाले. अन्य एका ठिकाणी वाहतूक समस्येवर आवाज उठवणारा फलक घेऊन कार्यकर्ते उभे होते. तर दुसर्‍या एका ठिकाणी पाणी समस्येवर आवाज उठवणारा फलक आप कार्यकर्त्याच्या हाती होता. आपच्या कार्यकर्त्यांनी व नेत्यांनी पणजीत मोठ्या उत्साहाने प्रचार केला.
गोवा सुरक्षा मंचने त्यांचे उमेदवार सुभाष वेलिंगकर यांच्या नेतृत्वाखाली पणजीत दमदार व प्रभावी असा प्रचार करताना प्रचाराचा वस्तुपाठच घालून दिला. या प्रचारासाठी गोमुसंने कोकणी व मराठी या दोन्ही भाषांच्या प्रभावीपणे वापर केला.
कॉंग्रेसच्या नेत्यांचीही मोठी फळी बाबुश मोन्सेरात यांच्या प्रचारासाठी यावेळी पणजीत वावरली. परिणामी तुल्यबळ असा प्रचार यावेळी झाला.

एक्झिट पोलवर १९ रोजी निर्बंध
येत्या १९ मे रोजी सकाळी ७ ते संध्याकाळी ६.३० यावेळेत पणजी पोटनिवडणूक मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत प्रसार माध्यमांना निवडणूक सर्वेक्षण किंवा एक्झिट पोल घेऊन प्रसिद्ध करण्यास भारतीय निवडणूक आयोगाने मनाई केली आहे. पोटनिवडणुकीच्या मतदानाच्या पूर्वी ४८ तास एक्झिट पोल प्रसिद्ध करण्यात इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमांना मनाई करण्यात आली आहे.

सिद्धार्थ यांचा आरोप
पराभवाच्या भीतीने
कॉंग्रेसकडून हल्ला
पणजीतील पोटनिवडणुकीत पराभव दिसू लागल्याने कॉंग्रेस पक्षाच्या पायाखालील जमीन सरकू लागली असून त्यामुळेच आपल्या गाडीवर हल्ला करण्यात आल्याचा आरोप भाजपचे उमेदवार सिद्धार्थ कुंकळयेकर यांनी काल पत्रकार परिषदेत बोलताना केला. अशा प्रकारे हल्ल्याची घटना पणजीच्या निवडणुकीत कधीही घडली नव्हती, असे ते म्हणाले. विरोधकांच्या खोट्या प्रचारावर मतदार विश्‍वास ठेवणार नसून आपलाच विजय होणार असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला. दुचाकीवरून आलेल्या दोघाजणांनी आपल्या वाहनावर हल्ला केला. अंधार असल्याने दुचाकीचा क्रमांक कळू शकला नसल्याचे ते म्हणाले. यासंबंधी पोलिसात तक्रार करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

बाबुश यांना संशय
सिद्धार्थच्या कारवरील
हल्ला भाजपचेच कुभांड
भाजपचे उमेदवार सिद्धार्थ कुंकळयेकर यांच्या वाहनावर जो हल्ला झाला त्या हल्ल्यामागे आपला किंवा आपल्या समर्थकांचा कोणताही हात नसल्याचे बाबुश मोन्सेर्रात यांनी काल स्पष्ट केले. सिद्धार्थ कुंकळ्येकर यांच्या वाहनावर झालेला हल्ला हे भाजपनेच रचलेले कुभांड असावे, असा संशय व्यक्त करून असे नाटक रचण्यात त्यांचा हातखंडा असल्याचे मोन्सेर्रात म्हणाले.

आपला एक समर्थक असलेल्या सिडनी नामक एका नेत्याचा या हल्ल्याच्या वेळी नामोल्लेख झाल्याचे सांगून जिल्हा पंचायत सदस्य असलेल्या रायबंदर येथील आपल्या या समर्थकाला भाजप या हल्ल्यात अडकवू पाहत असल्याचा आरोप मोन्सेर्रात यांनी यावेळी केला.