पणजीत कचरा प्रक्रिया प्रकल्पाला आग लागल्याने नुकसान

पणजीत कचरा प्रक्रिया प्रकल्पाला आग लागल्याने नुकसान

>> जेसीबी, अर्थमुव्हर व अन्य यंत्रसामुग्री भक्ष्यस्थानी

पणजी महापालिकेच्या पाटो येथे हिरा पेट्रोल पंपच्यामागे असलेल्या कचरा प्रक्रिया प्रकल्पाला काल सकाळी आग लागली. या आगीत या कचरा प्रक्रिया प्रकल्पातील एक जेसीबी, एक ‘अर्थ मुव्हर’ यांच्यासह तेथे असलेली अन्य यंत्र सामुग्री भक्ष्यस्थानी सापडली. पणजी अग्निशामक दलाला आगीची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन आग विझवण्याचे काम हाती घेतले. आग कचर्‍याला लागल्याने ती विझवण्याचे काम संध्याकाळपर्यंत चालू होते, असे अग्निशामक दलातील सूत्रांनी स्पष्ट केले.
कचर्‍याला लागलेली काल संध्याकाळी ५ वाजेपर्यंत धुमसत होती. त्यामुळे कचर्‍यावर पाण्याची फवारणी करण्याचे काम संध्याकाळपर्यंत चालूच ठेवावे लागल्याचे सूत्रांनी सांगितले.

सुरक्षा रक्षक चौकशीसाठी
पोलिसांच्या ताब्यात
आगीसंबंधी माहिती देताना पणजीचे महापौर उदय मडकईकर म्हणाले की पाटो येथील आमच्या कचरा प्रक्रिया प्रकल्पात आग लागल्याची माहिती आम्हाला सकाळी ७च्या दरम्यान मिळाली. या प्रकल्प स्थळी एक सुरक्षा रक्षक असतो. आम्हाला तो सरकारने दिलेला आहे. मात्र, आगीची दुर्घटना घडली तेव्हा तो तेथे नव्हता असे दिसून आल्याने त्याला चौकशीसाठी पणजी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

सकाळी ६.३० वाजता लागलेली आग संध्याकाळपर्यंत आटोक्यात आणणे अग्निशामक दलाला शक्य झाले नव्हते. आम्हीही त्यांना आग विझवण्यासाठी पाण्याचा टँकर दिला असेही मडकईकर यांनी सांगितले. या पार्श्‍वभूमीवर कचरा प्रक्रिया प्रकल्प स्थळी असलेला कचरा विनाविलंब अन्य ठिकाणी हलवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला असल्याचे त्यांनी नमूद केले.

या कचरा प्रक्रिया प्रकल्प स्थळी रोज २० ते ३० टन एवढा कचरा येत असतो. त्यापैकी १० टन कचरा प्रक्रियेसाठी साळगाव येथील कचरा प्रकल्पात पाठवण्यात येत असतो. तर उर्वरित कचर्‍यावर तेथेच प्रक्रिया करण्यात येत असल्याची माहिती मडकईकर यानी यावेळी दिली. यापुढे सदर कचरा प्रक्रिया प्रकल्प स्थळी महापालिका स्वत:चा सुरक्षा रक्षक नेमणार असल्याचेही मडकईकर यानी यावेळी सांगितले.