ब्रेकिंग न्यूज़

‘पंचमवेद’ नाट्यमहोत्सव

>> गोमंतकियांसाठी एक पर्वणी

पुणे-मुंबईकरांच्या तुलनेत गोमंतकात प्रायोगिक नाटके फार तुरळक प्रमाणात बघायला मिळतात. त्यामुळे गोमंत विद्या निकेतनने दत्ता दामोदर नायक पुरस्कृत दामोदर काशिनाथ नायक स्मृती तीन दिवसीय नाट्यमहोत्सवात निवडलेली नाटके ही गोमंतकीय प्रेक्षकांसाठी पर्वणीच होती. त्यामुळे तीनही दिवस प्रेक्षकांची लक्षणीय उपस्थिती होती.

गोमंत विद्या निकेतन, मडगाव (गोवा) आयोजित दामोदर काशिनाथ नायक स्मृती नाट्यमहोत्सवातील पहिले पुष्प एकलनाट्य ‘सावित्री’.
एकपात्री प्रयोग सादर करणं हे कलाकारासाठी थोडंसं आव्हानात्मक आणि धाडसाचं काम आहे. एकाच वेळी स्वतःवर आणि प्रेक्षकांवर ताबा ठेवून सुविहित प्रयोग सादर करण्याची जबाबदारी त्या कलाकाराची असते.

‘सावित्री’ या एकल नाट्याची धुरा अभिनेत्री प्रिया जामकर यांनी आपल्या खांद्यावर घेऊन प्रेक्षकांना एक वेगळा नाट्यानुभव तर दिलाच, त्याचबरोबर दमदार आणि रंगतदार नाट्यप्रयोगाने महोत्सवाची सुरुवात छान झाली. त्यामुळे उर्वरित दोन दिवसांत प्रेक्षकांनी बर्‍यापैकी उपस्थिती दर्शवली. लेखकानं मांडलेला आशयविषय प्रेक्षकांपर्यंत पोचविण्यात अभिनेत्री प्रिया जामकर या प्रयोगात यशस्वी झाल्या असे प्रेक्षकप्रतिक्रियेवरून लक्षात येते.

या एकल नाट्यात- दोन अनोळखी माणसांची (एक स्त्री व एक पुरुष) प्रवासादरम्यान भेट होते. त्यानंतर पत्रोत्तरांच्या माध्यमातून ते एकमेकांशी जोडले जातात. दिवसेंदिवस त्यांच्यामधील नातं अधिक घट्ट होत जातं. दरम्यान काही दिवसांसाठी त्यांची प्रत्यक्ष भेटही होते पण ती फार अल्पजिवी ठरते. पुन्हा पत्रोत्तरांचा खेळ नव्याने सुरू होतो. परंतु त्याच्या पुढील पत्रात त्रोटक उत्तरे मिळत असल्याचं तिला जाणवतं व त्याचा तिला त्रासही होतो. पण नंतर आपल्या कल्पना किती भ्रामक असतात आणि आपल्याला जे वाटत राहतं ते तसंच्या तसं नसतं हा विचार करून नायिका स्वतःचं समाधान करून घेते.

दिग्दर्शक रवींद्र लाखे यांनी या प्रयोगाची बांधणी प्रेक्षणीय केली आहे. रंगमंचीय अवकाशात एकच पात्र असल्याने पात्राच्या हालचाली एकसुरी होणार नाहीत याची दक्षता घेतली आहे. ट्रेनमधील दृश्यासाठी दिवाणखान्यातील खुर्चीचा वापर अतिशय कल्पकतेने केला… त्याला पार्श्‍वसंगीताची योग्य जोड देऊन योग्य तो परिणाम साधला गेला आहे. तसेच पु. शि. रेगे यांच्या या आगळ्यावेगळ्या कादंबरीला या प्रयोगाने योग्य न्याय दिला हे समाधान या सादरीकरणाने नक्कीच दिले.

दुसरा नाट्यप्रयोग ‘ठाकूर और मैं’ स्वामी विवेकानंद आणि रामकृष्ण परमहंस यांच्या नात्यावर आधारित होता. अभिनेते नितीन वाघ यांनी अनेक अडथळ्यांची शर्यत पार करत आपल्या अभिनय सामर्थ्याच्या जोरावर काही काळ रसिकांना थोपवून धरले. या एकलनाट्याचे लेखनही नितीन वाघ या तरुण रंगकर्मीने केले होते. योग्य देहबोली भाषा, स्पष्ट संवाद उच्चार आणि असलेल्या नेपथ्याचा योग्य वापर करत स्वतःच्या लेखनातील स्वामी विवेकानंद प्रेक्षकांपर्यंत पोचवण्यात थोड्याफार प्रमाणात ते यशस्वी झाले. दिग्दर्शक योगेश पाटील यांचं दिग्दर्शन अतुलनीयच म्हणावं लागेल. नाटकाची बांधणी अतिशय उत्कृष्ट होती. नेपथ्यकार माधव दास यांचं नेपथ्य नाटकाच्या विषयानुरूप पूरक होतं. विवेकानंदांची वेशभूषा त्यांचे व्यक्तिमत्त्व उभे करण्यास योग्य होती. संगीत आणि प्रकाशयोजनेची प्रयोगाला उत्तम साथ मिळाली. आजच्या पिढीला स्वामी विवेकानंदांचा विचार कळायला हवा हा लेखक/दिग्दर्शक आणि अभिनेते नितीन वाघ आणि त्यांच्या सहकार्‍यांनी केलेला प्रयत्न अभिनंदनास नक्कीच पात्र आहे.

महोत्सवातील तिसरा प्रयोग ‘भंवर’ या एकल नाट्याने दामोदर नायक स्मृती नाट्यमहोत्सवात रसिकांची दाद मिळवली. लेखन/दिग्दर्शन/नेपथ्य/संगीत-प्रकाश योजना आणि प्रभावी सादरीकरण या सर्व जमेच्या बाजू ठरल्याने एका देखण्या प्रयोगाचा रसिकांना आस्वाद घेता आला. उत्तरप्रदेश-बिहारसारख्या अतिशय गरिब खेडेगावातील एक मुलगा मुंबईमध्ये एका फॅक्टरीचा रखवालदार (वॉचमन) म्हणून काम करीत असतो. त्याचं नाव भंवरसिंह. ‘भंवर’ हे नाट्य या भवरसिंहाच्या जीवनाचं नाट्य आहे. भंवर म्हणजे भोवरा. तंतोतंत भोवर्‍यासारखंच असतं या भंवरसिंहाचं आयुष्य. गोल गोल गरगरत फिरणं त्याच्या नशिबी असतं. अशाप्रकारे आयुष्यात पिचलेल्या तरुण वॉचमनची व्यक्तिरेखा अभिनेते शिवराज वायचळ यांनी अगदी हुबेहूब सादर केली. उत्तम संवादफेक, आकर्षक देहबोली आणि रंगमंचावरचा मोकळा वावर, जोडीला नेपथ्य आणि प्रॉपर्टीचा पुरेपूर वापर करत शिवराज वायचळ यांचा भंवरसिंह ठसठशीत वाटला. दिग्दर्शक विराजस कुलकर्णी यांनी अभिनेते शिवराज वायचळ यांना सादरीकरणात थोडीशी मोकळीक आणि स्वातंत्र्य देऊन नेपथ्य, संगीत आणि प्रकाशयोजना यांचा पुरेपूर वापर करीत एक निटनेटका आणि प्रेक्षणीय प्रयोगाची बांधणी केली. लेखन/दिग्द./नेपथ्य/संगीत/प्रकाशयोजना आणि दमदार अभिनय अशी भट्टी जमलेला प्रयोग एकल नाट्य ‘भंवर’ रसिकांना सुखावून गेला हे या नाटकाचं आणि दामोदर. का. नायक नाट्यमहोत्सवाचं फलित.

महोत्सवातील शेवटचं नाटक ‘मन्शा की शादी’ या एकल नाट्याच्या अभिनेत्री आरती तिवारी यांनी कसदार आणि मनमोहक अभिनयाने नाट्याच्या पहिल्या वाक्यापासूनच प्रेक्षकांवर पकड मिळविली. नाटकाच्या सादरीकरणात नाटकाचा भाग म्हणून प्रेक्षकांना सहभागी करून नाटकाच्या शेवटपर्यंत रसिकांना खिळवून ठेवलं. रंगमंचावर एक हाती किल्ला लढवणं म्हणजे काय असतं हे या अभिनेत्रीने आपल्या कसदार अभिनयाने दाखवून दिलं. तसेच या नाटकाच्या लेखिका केतकी पंडित यांच्या लेखनातच या नाटकाची मोठी ताकद दडलेली आहे. दिग्दर्शक जमीर कांबळे यांनी प्रेक्षणीय असा प्रयोग उभा केला. लग्नसमारंभातील पै-पाहुणे म्हणून प्रेक्षकांना नाटकात सहभागी करून घेण्याची कल्पना खूप चांगली वाटली. त्यामुळे प्रेक्षक नाटकाच्या सुरुवातीपासून नाटकात गुंतून पडले. दिग्दर्शकाच्या या कल्पकतेला खरीच दाद द्यावीशी वाटते. नेपथ्य नाटकाला साजेसे आणि आटोपशीर होते. विषयात नाविण्य नसलं तरी एखादा अभिनेता किंवा अभिनेत्री विषय कशा पद्धतीने खुलवून प्रेक्षकांसमोर सादर करते त्यावर या प्रयोगाचं भवितव्य अवलंबून असतं. या एकल नाट्याचा विषय तसा नवीन नाही. ठरलेल्या लग्नात ऐन वेळी मुलगी पळून जाणं, असे प्रकार अनेक नाटकात किंवा चित्रपटात बघायला मिळतात. पण विषय साधा असूनही आरती तिवारी या अभिनेत्रीने खुमासदार संवादशैली, सुंदर देहबोली आणि रंगमंचावरचा सहजसुंदर वावर या जोरावर प्रेक्षकांना शेवटपर्यंत गुंतवून ठेवलं आणि एकलनाट्याचं शिवधनुष्य खर्‍या अर्थानं पेललं.