नौदल महिला अधिकार्‍यांची नौका जगभ्रमंतीवर रवाना

‘नाविका सागर परिक्रमा’ या उपक्रमांतर्गत नौदलाच्या महिला अधिकार्‍यांचा एक चमू भारतीय बनावटीच्या आय्‌एन्‌एस्‌व्ही ‘तारिणी’ या नौकेने आज जगभ्रमणासाठी रवाना होत आहे ही भारतासाठी एक अत्यंत अभिमानास्पद अशी गोष्ट आहे व ह्या सुवर्ण क्षणाची साक्षी होण्याची संधी आपणाला मिळाली याबद्दल आपण स्वत:ला भाग्यवान समजत आहे, असे उद्गार संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांनी काल काढले.

सीतारमण यांच्या हस्ते रविवारी नौदलाच्या बेती-वेरें येथील तळावरून नाविका सागर परिक्रमेच्या ‘तारिणी’ नौकेला हिरवा बावटा दाखवून मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी बोलताना त्यांनी वरील उद्गार काढले. यावेळी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हेही उपस्थित होते.
पुढे त्या म्हणाल्या की आजची घटना ही पाच वर्षांनी अथवा दहा वर्षांनी एकदा घडणारी घटना नव्हे. पहिल्यांदाच ही घटना घडलेली आहे. त्या अर्थाने ती ऐतिहासिक असून सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवण्यासारखी असल्याचे त्या म्हणाल्या. नौदलाच्या इतिहासात आजच्या दिवसाची खास नोंद असेल, असे सांगून आतापर्यंत जगातील कुठल्याही नौदलाने अशा प्रकारची परिक्रमा केलेली नाही ही लक्षात घेण्यासारखी गोष्ट असल्याचे त्या म्हणाल्या. ह्या परिक्रमेत नौदलाच्या सगळ्या महिला अधिकारीच सहभागी झालेल्या आहेत ही देखील उल्लेखनीय अशी बाब असल्याचेही सीतारमण यानी यावेळी नमूद केले. ह्या उपक्रमासाठी नौदलाचे आपण कौतुक करीत आहे. ह्या मोहीमेत सहभागी झालेल्या नौदलाच्या महिला अधिकार्‍यांना ह्या प्रवासावर जाण्यासाठी प्रशिक्षण देण्याबरोबरच त्यांना त्यासाठी प्रेरीत केलेल्या सगळ्यां अधिकार्‍यांचे अभिनंदन करावे लागणार असल्याचे संरक्षण मंत्री म्हणाल्या. ह्या परिक्रमेत नौदलाच्या लेफ्टनंट कमांडर वर्तिका जोशी, लेफ्टनंट कमांडर प्रतिभा जमवाल, लेफ्टनंट पी. स्वाती, लेफ्टनंट विजया देवी, लेफ्टनंट पायल गुप्ता व लेफ्टनंट बी. ऐश्‍वर्या आदींचा समावेश आहे.

पर्रीकर प्रेरणादायी व्यक्ती
याप्रसंगी बोलताना निर्मला सीतारमण यानी गोव्याचे मुख्यमंत्री तथा माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांचा आपणाला प्रेरणा देणारी राजकीय व्यक्ती असा उल्लेख केला. पर्रीकर हे केंद्रात होते तेव्हा आपला त्यांच्याशी संबंध आला. पर्रीकर हे एक प्रेरणादायी असे व्यक्ती आहेत, अशा शब्दात निर्मला सीतारमण यानी यावेळी त्यांचा उल्लेख केला.