ब्रेकिंग न्यूज़

नोकर भरतीसाठी १५ वर्षांची रहिवासी दाखला सक्ती हवी

>> मंत्री विजय सरदेसाई यांची स्पष्टोक्ती

गोमंतकियांच्या हिताच्या रक्षणासाठी गोवा विद्यापीठ आणि सरकारी खात्यातील नोकरभरतीसाठी १५ वर्षाचा रहिवासी दाखला सक्तीचा करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी गोवा फॉरवर्डच्या नवीन कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्यात बोलताना काल येथे केले.
यावेळी गोवा फॉरवर्डचे नेते तथा जलस्रोत मंत्री विनोद पालयेकर, आरडीए मंत्री जयेश साळगावकर, मडगावच्या नगराध्यक्ष बबिता आंगले व इतरांची उपस्थिती होती.

गोवा विद्यापीठातील नोकर भरतीसाठी रहिवासी दाखला शिथिल करण्यात आल्याने गोवा फॉरवर्डच्या युवा विभागाने आंदोलन छेडले आहे. या विषयाचा सोक्षमोक्ष लावल्याशिवाय गप्प बसणार नाही. गोंयकारपण टिकवून ठेवण्यासाठी रहिवासी दाखला सक्तीचा करणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या मुद्यांवर गंभीरपणे विचार करून योग्य निर्णय घेण्याची गरज आहे. गोंयकार प्रथम हा आमचा मुख्य कार्यक्रम आहे. पक्ष संघटना गोयकारपणाच्या हिताच्या मुद्यावर आक्रमक भूमिका घेणे सुरूच ठेवणार आहे. प्रसंगी आमची रस्त्यावर येण्याची तयरी आहे, असेही सरदेसाई यांनी स्पष्ट केले.

आमच्या पक्षाने केवळ चार जागा लढविल्या. त्यातील तीन जागांवर विजय मिळविण्यात यश प्राप्त झाले. आणि तिघेही मंत्री झाले आहेत. गोवा फॉरवर्ड या प्रादेशिक पक्षाचा झपाट्याने वाढत आहे. जात, धर्म हा आमचा अग्रक्रम नव्हे. गोयकारपण हा विषय अग्रक्रम आहे. माडाला न्याय देण्यासाठी या पक्ष स्थापन केला. माडाला राज्य झाडाचा दर्जा देण्यात यश प्राप्त झाले. जॅक सिकेरा यांच्या कार्याची माहिती अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात यश प्राप्त झाले आहे, असेही सरदेसाई यांनी सांगितले.