नेत्रदान ः श्रेष्ठ दान

नेत्रदान ः श्रेष्ठ दान

  • डॉ. मनाली म. पवार
    गणेशपुरी-म्हापसा

नेत्र आपले महत्त्वाचे ज्ञानेंद्रिय आहे ज्याची हल्ली हवी तशी काळजी घेतली जात नाही. त्यामुळे अगदी लहान मुलांनाही चष्मा लावावा लागतो. वाढत्या वयानुरूप कमजोर होणारी दृष्टी आजकाल लवकरच कमजोर व्हायला लागली आहे. हल्ली ‘मोतीबिंदू’ची शस्त्रक्रिया सर्रास चाळीशीत व्हायला लागली आहे. दृष्टीदोषाचे विकार वाढत चालले आहेत. यास कुठेतरी आपणच जबाबदार आहोत.

आयुर्वेदिक औषधांनी मोतीबिंदू विरघळवण्याचा दावा अनेकजण करताना दिसतात. मात्र मोतीबिंदू असणार्‍या रुग्णांनी आधुनिक नेत्रतज्ज्ञांकडे शस्त्रक्रियेसाठी जावे, हाच सल्ला. आयुर्वेदानेही यासाठी शल्यकर्मच सांगितलेले आहे.

आयुर्वेदामध्ये डोळ्यांसाठीही काही उपाय आहेत का? किंवा डोळ्यांचे आजार आयुर्वेदिक औषधांनी बरे होऊ शकतात काहो डॉक्टर?… असे आश्‍चर्यकारक प्रश्‍न पेशंट्‌स बर्‍याच वेळा विचारतात. आयुर्वेदातील ‘शालक्यतंत्रा’ने डोळे, कान, नाक, घसा व एकूणच शिरप्रदेशावर उपचार केले जातात. त्यातही विशेषत्वाने काही भाग नेत्ररोग निदान व चिकित्सेवर आहे.

पंचज्ञानेंद्रियांपैकी एक अत्यंत महत्त्वाचे ज्ञानेंद्रिय म्हणून नेत्राची गणना होते. नेत्राद्वारे रूपग्रहणाचे कार्य होते. अशा या नेत्राची उत्पत्ती पंचमहाभूतापासून झालेली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने तेजमहाभूत आहे. त्यापैकी नेत्रातील मांसल भाग पृथ्वी महाभूतापासून, तर रक्तभाग अग्निपासून, कृष्ण भाग वायुपासून, श्‍वेतभाग तेज महाभूतापासून तर अश्रुवह स्रोतस आकाशमहाभूतापासून निर्माण झालेला आहे. गर्भावस्थेमध्ये नेत्राची उत्पत्ती कफ व रसवह स्रोतसांपासून होते. त्यापैकी शुक्ल भाग कफाच्या प्रसादभागापासून, कृष्ण भाग रक्ताच्या प्रसाद भागापासून आणि दृष्ट मंडळ या दोहोंच्या प्रसादभागापासून निर्माण होतात. नेत्राची उत्पत्ती ही गर्भनिर्मितीच्या चवथ्या महिन्यात सुरू होते. प्रामुख्याने गर्भाच्या मातृज अंशापासून याची निर्मिती झालेली आहे. त्यापैकी शुक्ल भाग पितृज, कृष्ण भाग मातृज व दृष्टिमंडळ मातृज व पितृज भागापासून निर्माण झालेले आहे.

नेत्राचे कार्य- प्रकृतीच्या राजस तत्त्वापासून पंचज्ञानेंद्रियांची उत्पत्ती होते. याच पंचज्ञानेंद्रियांपासून पंचतन्मात्रा उत्पन्न होतात. या तन्मात्र ज्ञानेंद्रियाच्या आधाराने राहतात. त्यापैकी नेत्राच्या आधाराने असणारी रूप तन्मात्रा अग्नी महाभूतापासून निर्माण झालेली आहे. ही तन्मात्रा सूर्यदेवाचे अधिष्ठान मानतात. रूपतन्मात्राद्वारा नेत्र रूपग्रहणाचे कार्य करते. याद्वारे रूपग्रहणाशिवाय अन्य कार्य होऊ शकत नाही. नंतर या रूपाचे संवहन नेत्राकडून आत्मा व मनाकडे होते.

असे हे नेत्र आपले महत्त्वाचे ज्ञानेंद्रिय आहे ज्याची हल्ली हवी तशी काळजी घेतली जात नाही. त्यामुळे अगदी लहान मुलांनाही चष्मा लावावा लागतो. वाढत्या वयानुरूप कमजोर होणारी दृष्टी आजकाल लवकरच कमजोर व्हायला लागली आहे. हल्ली ‘मोतीबिंदू’ किंवा कॅटॅरॅक्टची शस्त्रक्रिया सर्रास सगळ्यांची चाळीशीत व्हायला लागली आहे. दृष्टीदोषाचे विकार वाढत चालले आहेत.

अशा वाढत चाललेल्या नेत्रविकारांना कुठेतरी आपणच जबाबदार आहोत. आयुर्वेद शास्त्रात असे नेत्ररोग होण्याची अनेक कारणे सांगितलेली आहेत.

उष्णाभितप्तस्य जलप्रवेशात्
दूरेक्षाणात् स्वप्नविपर्ययात् च|
प्रसक्त संरौदन कोप शोक
क्लेशाभिघातात् अम्ल कुलत्थमाष
निषेवणात वेगविनिग्रहात्‌च|
स्वेदाद् अयो धूमनिषेवणात् च
छर्पेः विधानात् वमनातियोगात्‌॥
बाष्पग्रहात् सूक्ष्मनिरिक्षणात् च
नेत्रे विकारान् जनयान्ति दोषः॥

उष्णाभितप्तस्य जलप्रवेशात् – पूर्वीच्या काळी लोक जर उन्हातून लांबून चालत आल्यावर उकाडा दूर करण्यासाठी जलाशयात डुंबत. सद्यकाळात जरी जलाशयात जात नसले तरी काहीजण लगेच शॉवर घेतात किंवा उन्हातून चटकन एसीच्या खोलीतील अतीशीत वातावरणात शिरतात. त्यावेळी शरीरातील अतीसूक्ष्म वाहिन्यांचे एकदम आकुंचन घडते.

– दुरेक्षाणात् – अति दूरचे सतत पाहण्याचे काम करणारे, सीमेवरचे जवान, रेल्वे, नेव्हीमधील कर्मचारी यांच्या डोळ्यांवर ताण येऊन त्यांना नेत्ररोग जडण्याची शक्यता असते.
– स्वप्नविपर्ययात् – रात्रीऐवजी दिवसा झोपणे ही आजकाल सर्वत्र बोकाळलेली बाब आहे. कारखान्यातले कामगार असोत वा इंजिनिअर्स, डॉक्टर्स, परिचारिका किंवा कॉलसेंटर्ससारख्या ठिकाणी काम करणारी तरुण मंडळी. सगळ्यांना सततचा ‘शिफ्ट’ पद्धतीमुळे ‘स्वप्नविपर्यय’ घडतोच.
– प्रसक्त संरोदन, कोप, शोक…- खूप रडण्यांत, राग, शोक, क्लेश इ. मानसिक ताणांनी
– अतिमैथुनात् – अति प्रमाणात मैथुन
– शुक्तआरनाल अम्न्य- पचायला अतिशय जड, आंबट, अतिमसालेदार, अतितिखट व अतिउष्ण पदार्थांचे सेवन, कुळीथ, उडीद, मसूर, कांजी यांचा समावेश असलेला आहार यामुळे पित्तदोषाचा प्रकोप होतो आणि अन्य दोषांना बिघडवून तो नेत्रदोष घडवून आणतो.
– वेगविनिग्रहात् – मल-मूत्रादी दोषांचे धारण करणे
– धूमनिषेवणात् – प्रदूषित वातावरणात – धूर, धुळ इ.मध्ये वास्तव्य.
– वमनतियोगात् – अतिप्रमाणात शोधन क्रिया.
– बाष्पग्रहात् – डोळ्यांना अधिक वाफ बसते.
– सूक्ष्मनिरीक्षणात् – अतिसूक्ष्म वस्तूंचे अत्यधिक निरीक्षण
(घड्याळजी, पॅथॉलॉजिस्ट, इलेक्ट्रॉनिक सर्किटवर काम करणारे अभियंते इत्यादी.)
तसेच संरक्षण साधनं न वापरता सूर्याकडे पाहणे इत्यादी. गोष्टींचा डोळ्यांना त्रास होतो.
सध्याच्या काळात या कारणांमध्ये आणखी काही कारणांची भर पडली आहे… त्यात सतत टिव्हीसमोर बसून एकटक टीव्ही पाहण्याचे वाढलेले प्रमाण.
– कॉम्प्युटर स्क्रीनसमोर सतत बसून एकटक पाहात काम करणे.
– मोबाइलचा अतिवापर
– त्यातही खोलीतील प्रकाशयोजना योग्य नसेल तर ‘कॉम्प्युटर व्हीजन सिंड्रोम’ नावाचा रोग होऊ शकतो. याच डोळे दुखणे, धुरकट दिसणे, डोळे कोरडे होणे, टोचणे, मद्येच ‘ब्लॅक’ होणे इत्यादी गोष्टी घडतात.

दृष्टी नीट रहावी व नेत्ररोग होऊ नयेत म्हणून करण्याच्या काही गोष्टी……
* आयुर्वेदामध्ये बर्‍याचशा नेत्रविकारांमध्ये त्रिफला चूर्ण व सोबत मध आणि तूप (विषम प्रमाणात घ्यावे) घेणे लाभदायक सांगितले आहे.
– नेत्रबिंदू, पुरपाक कर्म, अंजन कर्म (काजळ), तर्पण (मेत्रबस्ती), बिडालक कर्म, धारा कर्म असे अनेक प्रतिबंधक उपाय सांगितले आहेत.
* विरेचनादि शोधन क्रिया, मानसिक समाधान यासाठी शिरोबस्ती, शिरोधारा, नस्य (तुपाचे, तेलाचे)
* पाय स्वच्छ ठेवणे, तळपायांना त्रास न होतील अशी पादत्राणे घालणे, पायाला नित्य तूप, तेल लावणे, काशाच्या वाटीने तळपायात तूप घासणे. तळपायाच्या मध्यावर असणार्‍या दोन शिरा डोळ्यांशी संबंधित असतात. या शिरांवर म्हणजेच तळपायावर अभ्यंग लेप करणे.
* नियमित गंडूष करणे
* चिमुटभर त्रिफळा चूर्ण रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी गाळून गेऊन त्या त्रिपळासिद्ध जलाने डोळे धुवावेत.
* सर्वांगाला अभ्यंग करणे.
* अधुनमधून व्यवस्थित पंचकर्म करणे
काय करावे?… काय टाळावे?….
* थोड्या कामानंतर डोळे मिटून घ्यावेत व मिटलेल्या डोळ्यांच्या आत बुब्बुळांची उजवीकडून डावीकडे, वर-खाली अशी हालचाल करावी. मध्येच जवळ तर काही काळ दूर पहावे. याने अश्रुग्रंथींचे कार्य सुरळीत राहण्यास मदत होते. आपण शक्यतो एकटक पाहतो, पापण्यांची उघडझाप करीत नाही. हे टाळणे आवश्यक ठरते.
* गाल फुगवून तोंडात पाण्याची गुळणी धरून मिटलेल्या डोळ्यांवर हाताने पाण्याचे (साधे नळाचे पाणी) हबके मारणे (दिवसातून दोन-तीन वेळा)
* कधीही दुसर्‍याचा चष्मा, आयड्रॉप्स, डोळे पुसण्याचा रुमाल वापरू नये.
* काजळ वा आयलायनर न वापरल्यास उत्तम, वापरायचे असल्यास चांगल्या प्रतीचे आयुर्वेद शास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे बनवलेले अंजन वापरावे. बर्‍याच वेळा काजळ, आयलायनरसारखा मेकअप व्यवस्थित न केल्यास अश्रुप्रणिकांमध्ये अडकून जंतुसंसर्ग होण्याची शक्यता असते.
* डोळ्यात काही गेल्यास डोळा अजिबात चोळू नये.
* नेत्रदानाचा फॉर्म भरावा. मृत व्यक्तीच्या नेत्रदानासाठी डॉक्टरला ताबडतोब बोलवावे. ते र्येपर्यंत मृत व्यक्तीच्या डोळ्यांवर पाण्याची घडी ठेवावी.
दृष्टी नीट रहावी व नेत्ररोग होऊ नयेत म्हणून सेवन करण्याचे पथ्यकर पदार्थ-
– दररोज एक ताजा आवळा खावा. डोळ्यांना उत्तम. द्राक्षांच्या सीझनमध्ये द्राक्षेही खावीत, ज्यामध्ये ‘अ’ जीवनसत्व जास्त आहे. अशा आहाराचा समावेश जेवणात ठेवावा. हिरव्या पालेभाज्या, गाजर, तूप, डाळिंब, खडीसाखर, त्रिफळा, सैंधव यांचे सेवन करावे.

– जुने जव व गहू, साठेसाळीचे तांदूळ, मूग, इ. कफपित्तघ्न धान्यांचे पुष्कळ तूप घालून सेवन करावे.
– घरी बनवलेले ताजे लोणी चमचाभर खडीसाखरेबरोबर नियमित खावे.
अपथ्यकर आहार.
– आंबट, अतिमसालेदार, दही, केळे, सीताफळ, रामफळ, अंडी, अळू, रताळे, श्रीखंड, आईस्क्रीम इत्यादी.
डोळ्यांच्या काही छोट्या छोट्या तक्रारींवर उपाय…..
– प्रखर प्रकाशाकडे बघितल्याने किंवा रात्रीच्या जागरणाने डोळ्यांची आग होत असल्यास काकडीचे काप डोळ्यांवर ठेवावेत.
– डोळ्यांवर सतत ताण येऊन थकल्यामुळे डोळे दुखत असल्यास खजुराची बी पाण्यात उगाळून पापण्यांवर लेप करावा.
– डोळ्यांतून पाणी येत असल्यास, घाण जमत असल्यास किंवा डोळे खाजत असल्यास मधाचे बोट डोळ्यांवरून फिरवावे.
एक चमचा त्रिफळाचूर्ण, एक चमचा मध व अर्धा चमचा तूपाबरोबर घेतल्यास डोळ्यांनी कमी दिसणे, रात्री नीट न दिसणे अशा तक्रारी कमी होतात.
– रात्री झोपताना नाकामध्ये २-३ थेंब साजूक तूप टाकल्यास व एरंडेलचे दोन थेंब डोळ्यांना ताकद मिळून दृष्टी सुधारते.

– डोळे थकले असल्यास व विशेषतः डोळ्यांची आग होत असल्यास पायाच्या तळव्यावर थोडे तूप किंवा एरंडेल तेल लावून काशाच्या वाटीने चोळावे.
– आठवड्यातून एकदा त्रिफळाच्या पाण्याने डोळे धुतल्यास डोळे निरोगी राहतात.
सारखा वाढणारा चष्म्याचा नंबर असो की रेटिनावर आलेले डाग वा वार्धक्यजन्य रेटिनल डिजनरेशन, आयुर्वेदातील योग्य उपचार केले तर खरोखरच रुग्णाच्या तक्रारींमध्ये घट निश्‍चित आढळते.

तसेच लेझी आय सिन्ड्रोम, ऍम्ब्लिओपिया यांसारख्या विकारांतदेखील आयुर्वेदाचे योगदान चकित करते.
आयुर्वेदिक औषधांनी मोतीबिंदू विरघळवण्याचा दावा अनेकजण करताना दिसतात. मात्र मोतीबिंदू असणार्‍या रुग्णांनी आधुनिक नेत्रतज्ज्ञांकडे शस्त्रक्रियेसाठी जावे, हाच सल्ला. आयुर्वेदानेही यासाठी शल्यकर्मच सांगितलेले आहे. मात्र हल्ली सर्रास चाळीशीत जे मोतीबिंदूचे ऑपरेशन करावे लागते किंवा करतात त्यांनी पूर्वीपासूनच आयुर्वेदिक प्रतिबंधात्मक उपायांचा उपयोग करावा.

‘ग्लुकोमा’ रोगातही वेळीच आधुनिक वैदकानुसार उपचार करून घेणेच योग्य. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे कुणीतरी सांगितले म्हणून, कुठेतरी वाचले म्हणून कोथिंबिरीचा रस एखाद्या वनस्पतीचा अर्क असे काहीबाही डोळ्यात घालू नये. कारण डोळे आपलेच आहेत आणि ते बहुमोल आहेत. त्यामुळे डोळ्यांची योग्य काळजी घ्या. ‘नेत्रदान- श्रेष्ठ दान’.