नीरज सारिपल्ली रॅपिड बुद्धिबळाचा जेता

रोटरी क्लब ऑफ म्हापसा एलिट आणि बार्देश तालुका बुद्धिबळ संघटनेने गोवा बुद्धिबळ संघटनेच्या सहकार्याने आयोजित तिसर्‍या अखिल गोवा रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद सासष्टीच्या नीरज सारिपल्लीने पटकावले. स्पर्धेचे आयोजन काणका-म्हापसा येथील साईबाबा मंदिर सभागृहात करण्यात आले होते.

स्पर्धेत ६० फिडे मानांकित खेळाडूंसह एकूण १७७ खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. नीरजने अपराजित राहताना आठ फेर्‍यांतून साडेसात गुणांची कमाई केली. त्याने चषक व साडेसात हजार रूपयांची कमाई केली. तिसवाडी तालुक्याचा शेन ब्रागांझा सात गुणांसह दुसर्‍या स्थानी राहिला. त्याला पाच हजार रूपयांचे बक्षीस प्राप्त झाले. फोंड्याच्या देवेश नाईकने सात गुणांसह तिसरा क्रमांक मिळविला. ईशान पागी व विल्सन क्रूझ यांचे प्रत्येकी ६.५ गुण झाले. त्यांनी अनुक्रमे चौथे व पाचवे स्थान प्राप्त केले. तन्वी हडकोणकर, मंदार लाड, आर्यन रायकर, व्रज पोरोब, संजय थोरात, रूबन कुलासो, वसंत नाईक, माधवन जी. विघ्नेश सावंत, पार्थ साळवी, ऍड. पी.एम. कंटक, सुहास अस्नोडकर, आयुष पेडणेकर, सयुरी नाईक, स्वेरा ब्रागांझा यांनी अनुक्रमे सहावा ते विसावा क्रमांक पटकावला. जलस्रोतमंत्री विनोद पालयेकर, रोटरी क्लब ऑफ म्हापसा एलिटचे अध्यक्ष प्रताप परब, बार्देश तालुका बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष विश्‍वास पिळर्णकर, सुदत्त कोरगावकर, नंदकिशोर आरोलकर, स्पर्धेचे मुख्य लवाद अरविंद म्हामल, स्पर्धा समन्वयक परेश पालयेकर यांच्या उपस्थितीत बक्षिसांचे वितरण करण्यात आले.