निसर्गाचा जीवनदाता ः ‘पाऊस’

  • रश्मिता रा. सातोडकर
    (शिरोडवाडी-मुळगाव)

अगदी त्रासिक जिवाचा विसर पडून मोहिनी घालणार्‍या जगात वावरल्याचा भास केवळ पाऊसच देऊ शकतो. सर्व सजीवांबरोबरच निसर्गाला जीवनदान देणारा हा पाऊस. डोळे मिटून जर या पावसाचा आस्वाद घेतला तर आपल्या मनातल्या भावना, संवेदना नक्कीच कोर्‍या कागदावर उमटून येतील!

आपण प्रत्येकजण वयानुसार लहानाचे मोठे होत जातो. त्याचप्रमाणे आपल्यात वयानुसार कितीतरी बदल जाणवत असतात. एखाद्यावेळी आपण लबाड असलेले शांत होत जातो तर कधी शांत असलेले लबाड! आपल्यासारखाच हा लबाड पाऊस! कधी विजांचा लखलखाट, ढगांचा गडगडाट करत, कधी मुसळधार तर कधी थंड बरसात घेऊन येतो. दरवर्षी त्याचे एक नवे रूप आणि नवीन रंग बघायला मिळतात. हा पाऊस लबाड असला तरी प्रत्येकाचा आवडता ऋतू असतो. नाही म्हटलं तरी प्रत्येकाच्या मनाच्या एका गाभार्‍याला तो ओलावा देत असतो.

मज्जा, मस्ती, गारवा आणि आनंद म्हणजेच पाऊस. त्याच्याविषयी प्रत्येकाची वेगवेगळी संकल्पना असते. युवा पिढीला आणि लहान मुलांना पावसात भिजून आनंद घ्यायचा असतो. कामाला जाणारे लोक म्हणतात तू फक्त रविवारी हवा तेवढा कोसळ तर काही म्हणतात तू फक्त रात्रीचा कोसळ. अशा प्रत्येकाच्या वेगवेगळ्या विचारधारा. पण तो तरी काय करणार? त्याचे ते तीन महिने तो आनंदाने व्यक्त करत असतो.

मेघांचा तो अनाच्छादित पसारा पाहून मन तृप्त होतं. आकाश भरून आलं की आकाशाच्या अंगणातले मेघ आनंदाने गरजतात आणि आपल्यावर आनंदाश्रूंचा वर्षाव करतात. पहिल्या पावसाचा तो मनमोहक सुगंध प्रत्येकाच्या मनातल्या कुप्पीला साद घालतो. सर्वत्र गारवा पसरवून हरित तृणांची मखमली चादर चढवून आम्हा सर्वांना वेड लावून जाणार्‍या या पावसाची खोड दुसर्‍या वर्षीच्या ज्येष्ठातच मोडते आणि याच्या येण्याची चाहूल प्रत्येकालाच तारुण्य देते. पावसाचं माणसांशी एक वेगळंच नातं आहे. पावसाशी निगडीत प्रत्येकाचे वेगवेगळे अनुभव, वेगवेगळ्या आठवणी. प्रत्येकाच्या चेहर्‍यावर आनंद द्विगुणित करत बरसतो हा पाऊस.

‘पाऊस’ हा शब्द नुसता ओठांवर आला तर बालपणी केलेली मौजमजा आठवते. पावसाच्या पाण्यात केलेले खेळ, पाण्यात सोडलेली कागदी होडी आणि शाळेतून येताना बॅगेत छत्री असूनसुद्धा पाण्यात नाचत- बागडत गेलेले ते सुंदर दिवस! प्रत्येक पावसात बालवाडीत शिकवली जाणारी कविता ओठांवर ओघळते. पावसाला आतुरतेने साद घालणार्‍या त्या चार ओळी माणसाच्या ओठांवर मरेपर्यंत नक्कीच येत असाव्या. पावसानंतर निर्माण होणारा तो प्रसन्न, आल्हाददायी परिसर, मातीचा ओला सुगंध, झाडांना फुटलेली नवी पालवी, बेडकांचा कर्कश आवाज, पक्षांचा संथ किलबिलाट, मध्येच मोरांचा गुंजारव आणि एकदम आपल्या आगमनासाठी पावसाने सोडलेली डरकाळी …मस्त वाटणारं असं हे चित्र! अगदी त्रासिक जिवाचा विसर पडून मोहिनी घालणार्‍या जगात वावरल्याचा भास केवळ पाऊसच देऊ शकतो. सर्व सजीवांबरोबरच निसर्गाला जीवनदान देणारा हा पाऊस. डोळे मिटून जर या पावसाचा आस्वाद घेतला तर आपल्या मनातल्या भावना, संवेदना नक्कीच कोर्‍या कागदावर उमटून येतील!

आपल्यातल्या प्रत्येकाने पावसाचा अनुभव निरनिराळ्या वयात नक्कीच घेतला असेल. लहानपणी बाई आत वर्गात शिकवत असताना आपल्या नजरा बाहेरच. घरी आलो की अभ्यास सोडून बाहेर खेळायला जायचीच सदा घाई असायची. वयापरत्वे आपण पावसात भिजून टपरीवरचा आलं ठेचून घातलेला चहा आणि गरमगरम भजी… या मानसिकतेतच वावरू लागतो. पण प्रत्येक वयात पावसाबद्दलची ओढ तशीच कायम टिकून राहते. कित्येकांच्या नव्या आयुष्याची साक्ष म्हणजे हा पाऊस. नव्या जिवाला पालवी देऊन अंकुर आणणारा हा पाऊस सर्वांसाठी लाभदायी ठरतो. जसा मोर आपला पिसारा फुलवून आनंद व्यक्त करतो त्याचप्रमाणे आपल्या सगळ्यांची मनं या पावसात तृप्त होऊन जातात. कारण हेच साठवलेले क्षण आणि आठवणी आपलं जीवन बदलून टाकतात. कधी कधी दुःखाने भरून आलेले मन या पावसात रडू लागते. मनात साठलेल्या आठवणी ओल्या होऊन प्रत्येक पावसात ओल्याचिंब होऊन नव्याने बहरून जातात.