ब्रेकिंग न्यूज़

निवडून आल्यास भाजपात जाणार नाही ः वाल्मिकींचे प्रतिज्ञापत्र

पणजी मतदारसंघातून निवडून आलो तर आपण पक्षातून फुटून जाऊन भाजपमध्ये प्रवेश करणार नाही, असे एक प्रतिज्ञापत्र आपण नोटरीकडे जाऊन तयार करून घेतले आहे. भाजपला बाहेरूनही पाठिंबा देणार नसल्याचे या प्रतिज्ञापत्रातून स्पष्ट केलेले आहे, असे आम आदमी पार्टीचे पणजी पोटनिवडणुकीतील उमेदवार वाल्मिकी नाईक यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले.

आपण या प्रतिज्ञापत्राचा भंग केला तर भारतीय दंड संहितेचा कलम ३४० खाली कुणीही आपणाविरुद्ध तक्रार करू शकतो, असे ते म्हणाले.
पणजी पोटनिवडणुकीतील कॉंग्रेसचे उमेदवार बाबुश मोन्सेर्रात व अन्य बिगर भाजप उमेदवारांनीही अशा प्रकारचे प्रतिज्ञापत्र तयार करावे, अशी सूचना त्यांनी यावेळी केली.
जर आपण या पोटनिवडणुकीत विजयी ठरलो तर आपण कोणत्याही परिस्थितीत भाजपला पाठिंबा देणार नाही. जर एखाद्या पक्षाला समर्थन देण्याची वेळच आली तर कॉंग्रेस पक्षाला बाहेरून पाठिंबा देऊ, असे नाईक यांनी यावेळी स्पष्ट केले. कॉंग्रेस व भाजप हे एकाच माळेचे मणी असून पक्ष बदलणे ही आता त्यांच्यासाठी रोजचीच गोष्ट झाली आहे, असे ते म्हणाले.

भाजप, कॉंग्रेसनेही उमेदवारी
देऊ केली होती
२०१५ साली पणजीत झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपने आपणाला उमेदवारी देऊ केली होती. तर २०१७ साली पणजीत झालेल्या पोटनिवडणुकीत कॉंग्रेस पक्षाने उमेदवारी देऊ केली होती, असा गौप्यस्फोट नाईक यांनी केला. भाजपची उमेदवारी मनोहर पर्रीकर यांनी तर कॉंग्रेसची उमेदवारी शांताराम नाईक यांनी देऊ केली होती, असे ते म्हणाले.
पक्षांतर बंदी कायद्याचा काहीही उपयोग नसून आमदार फुटण्याच्या घटना वाढतच चालल्या आहेत, असे आम आदमी पार्टीचे निमंत्रक एल्विस गोम्स यावेळी म्हणाले.

केजरीवालांवरील हल्ल्यास
केंद्र सरकार जबाबदार
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर पुन्हा पुन्हा हल्ले होण्याचा ज्या घटना घडत आहेत त्याला केंद्र सरकार जबाबदार असल्याचा आरोप वाल्मिकी नाईक व एल्विस गोम्स यांनी एका प्रश्‍नावर केला.
नवी दिल्लीत कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी ही केंद्र सरकारकडे आहे व मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आवश्यक ती सुरक्षा पुरवण्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप वरील द्वयींनी केला.