निवडणूक रणधुमाळीत ऐकावे ते नवलच!

  • शंभू भाऊ बांदेकर

विविध पक्षांतील विविध नेते शेरेबाजीद्वारे आचारसंहितेचा भंग करीत आहेत आणि यात ‘पुढच्यास ठेच मागचा शहाणा’ असे शहाणपण कुणी दाखवताना दिसत नाही. शेवटी या सार्‍या बाता, वार्ता, कुवार्ता किंवा सुवार्ता वाचून, ऐकून ऐकावे ते नवलच! असे म्हणण्याखेरीज आपल्या हातात तरी काय आहे?

लोकसभा निवडणुकीतील पाचव्या टप्प्यासाठी सोमवार दि. ६ मे रोजी मतदान पार पडले. यात ७ राज्ये आणि ५१ मतदारसंघातील एकूण ६७४ मतदारांचे भवितव्य ठरणार आहे. अनेक दिग्गजांच्या भवितव्याचा फैसला या पाचव्या टप्प्यात होणार आहे. अजून दोन टप्पे बाकी असून टप्प्याटप्प्यांनी होणार्‍या या मतदानात प्रत्येकवेळी नेत्यांकडून ऐकावे ते नवलच, अशा नवलाईच्या गोष्टी कानी पडत आहेत व त्या शेवटच्या टप्प्यापर्यंत चालू राहतील असे वाटते. या शेरेबाजीमध्ये एकच पक्ष आहे असे मात्र नाही. विविध पक्षांतील विविध नेते शेरेबाजीद्वारे आचारसंहितेचा भंग करीत आहेत आणि यात ‘पुढच्यास ठेच मागचा शहाणा’ असे शहाणपण कुणी दाखवताना दिसत नाही.
लोकसभा निवडणुकीतील भोपाळमधील भाजपच्या उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी एटीएसचे माजी प्रमुख हेमंत करकरे यांचा मृत्यू आपल्या शापामुळे झाला, असे वक्तव्य करून त्या वादाच्या आणि आचारसंहितेच्या भोवर्‍यात सापडल्या होत्याच, लागोलाग त्यांचे दुसरे वक्तव्यही आचारसंहितेचा भंग करणारे ठरले. ‘बाबरी मशीद पतन प्रकरणी आपलेही मोठे योगदान आहे’ असे ‘गर्व से कहो हम हिंदू हैं|’च्या थाटातील त्यांचे वक्तव्य होते. शेवटी त्यांच्या या दोन्ही वक्तव्यांची गंभीर दखल घेत निवडणूक आयोगाने त्यांच्यावर ७२ तासांची प्रचारबंदी घातली.
हेमंत करकरे यांच्यावर तोंडसुख घेणार्‍या साध्वी प्रज्ञासिंह यांच्यावर टोला हाणत कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री तथा भोपाळचे कॉंग्रेस उमेदवार दिग्विजयसिंह म्हणाले,‘साध्वी प्रज्ञासिंह यांनी जर जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझहरला शाप दिला असता, तर भारताला सर्जिकल स्ट्राईक करावाच लागला नसता.’

जवानांची भलावण करीत प्रचारसभेत सर्जिकल स्ट्राईकबद्दल वारंवार भाष्य करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्याबाबत सांगत माजी प्रधानमंत्री डॉ. मनमोहनसिंग म्हणाले की, आमच्या वेळी आम्ही तीन वेळा सर्जिकल स्ट्राईक केले, पण त्याचे प्रचारासाठी भांडवल कधी केले नाही आणि करणारही नाही.’
बिहारमधील प्रचारसभेत बोलताना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा उद्गारले,‘पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या २० वर्षांपासून न थकता काम करत आहेत. कॉंग्रेस अध्यक्षांसारखे त्यांना दर काही महिन्यांनी सुट्टीची गरज भासत नाही.’ त्यावर भाष्य करताना कॉंग्रेस श्रेष्ठी म्हणाले,‘त्याबद्दल पंतप्रधानांचे कौतुक करावे तेवढे थोडेच, पण काही केंद्रीय मंत्री ‘राफेल’च्या फायली गहाळ होईपर्यंत आणि नोटाबंदी, जीएसटीचा उलटा झालेला परिणाम दिसत असून ‘गिर गए, फिर भी टांग उपर’ थाटाचा कारभार करतात. त्यांना शह देण्यासाठी शहांनी शहाजोगपणा सोडून काम करायला सांगावे.’
या निवडणूक रणधुमाळी दरम्यान सपा-बसपा मिलाफ झाल्यानंतर मुलायमसिंह यादव-मायावती जोडगोळी पुन्हा एकत्र आल्यानंतर मायावती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शरसंधान साधत ते नावाचे ‘ओबीसी नेते’ आहेत, खरे ओबीसी नेते मुलायमसिंह आहेत, असे सांगून मुलायमसिंह दीन-दयाळांसाठी किती मुलायम आहेत, याची री ओढली होती. त्याचाच पुनरुच्चार आता राष्ट्रीय जनता दल नेते व बिहारचे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी केला आहे. त्यांचे म्हणणे असे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जन्माचे उच्चवणीर्र्य आणि कागदोपत्री मागासवर्गीय आहेत.’ श्री. नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील कनौज येथे बोलताना स्वतःलाच केवळ ओबीसी प्रवर्गातील नसून अतिमागास जातीत जन्म घेतल्याचे सांगितले. त्यावरून निशाणा साधताना तेजस्वीने आपल्यापरीने हे तेजस्वी ट्विट केले आहे. त्यांचे म्हणणे असे की केवळ मते मिळविण्यासाठी मोदी काहीही सांगतील. मोदींनी स्वतःला ओबीसी म्हणवून घेतल्यानंतर ‘आता मोदी स्वतःला अति मागास जातीचा म्हणवून घेतील.’ असे त्यांचे म्हणणे होते.

भाजपने तर ‘फिर एक बार मोदी सरकार’चा नारा लगावत ‘ब्रँड मोदी’ हा मुद्दा केंद्रस्थानी धरला आहे. यासाठी त्यांनी विकास हा मुद्दा दोन टप्प्यांमध्ये केंद्रस्थानी आणला. पण जीएसटी, नोटाबंदी, बेरोजगार, शेतकर्‍यांची कर्जमाफी या मुद्द्यांवर विरोधी पक्षांनी एकमुखाने भाजपला तोंडघशी पाडण्याचा प्रयत्न केल्यानंतर भाजपने आता विकासाचा मुद्दा बाजूला ठेवून दुसरे तीन मुद्दे प्रचारासाठी पुढे केले आहेत. हे तीन मुद्दे म्हणजे पाकिस्तान, दहशतवाद आणि राष्ट्रीय सुरक्षा हे होत. जगात दहशतवादाचा चेहरा ठरलेला कुप्रसिद्ध दहशतवादी मसूद अजहर याला अखेर आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यात आले. हेही भारतात लोकसभेच्या निवडणुका चालू असताना. भारताची गेल्या कित्येक वर्षांपासूनची ही मागणी होती. ती पूर्ण झाल्याच्या जोशात भाजपने याचे श्रेय लुटले नाही तरच नवल! त्यामुळे पाकिस्तानला अद्दल घडवण्याबरोबरच दहशतवादाला मूठमाती देण्याच्या प्रचारकार्याला भाजपने अग्रक्रम दिला तर त्यात आश्‍चर्य वाटायचे कारण नाही, कारण भारतीय संसदेवरील हल्ला, पठाणकोट हल्ला आणि अलीकडेच झालेला पुलवामामधील हल्ला यांसह अनेक दहशतवादी हल्ल्यांचा मास्टरमाइंड मौलाना मसूद अजहर याला संयुक्त राष्ट्र संघटनेतील सुरक्षा परिषदेने ‘आंतरराष्ट्रीय दहशतवादी’ म्हणून घोषित करणे ही भारताच्यादृष्टीने फार मोठी जमेची बाजू आहे. आता त्याचा निवडणूक रणधुमाळीत कसा व किती वापर करायचा ते राजकीय पक्षांवर अवलंबून आहे.

‘राष्ट्रीय सुरक्षा’ हा मुद्दा भाजपने ऐरणीवर आणला आहे. हा मुद्दा गेली अनेक वर्षे पाक, चीन यांच्या प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष हल्ल्यांमुळे चर्चेत आहे. शेजारच्या शत्रूराष्ट्रांना समज देऊन काम होत नसेल, तर त्यांच्याशी योग्य वेळ व संधी साधून दोन हात करावेत ही भारतीयांची ठाम भूमिका आहे. त्यामुळेच आता राष्ट्रीय सुरक्षेवर जोर देण्यात काय अर्थ आहे बरे?
एका माजी सैनिकाने जवानांवर झालेला अन्याय म्हणून मोदींच्या विरोधात निवडणुकीत उभे राहण्याचा प्रयत्न केला तर, त्याचा अर्जच फेटाळला गेला. यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना सपाचे म्होरके तथा उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी तर ‘राष्ट्रवादाच्या नावाने मते मागणार्‍यांना जवानांचा सामना करणे परवडणारे नव्हते’ असा टोला हाणला आहे.

पंतप्रधान मोदी यांनी आचारसंहितेचा भंग केल्याबाबत निवडणूक आयोगतही मतभेद झाल्याचे वृत्त आले आहे. याबाबतची माहिती अशी की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र राज्यातील लातूर आणि वर्धा येथील प्रचारसभेमध्ये केलेल्या वक्तव्यामुळे निवडणूक आचारसंहितेचा भंग झाला नसल्याचा निर्वाळा निवडणूक आयोगाने दिला असला तरी हे प्रकरण आयोगापुढे विचारार्थ आले तेव्हा तीनपैकी एका निवडणूक आयुक्तांनी मतभिन्नता दर्शवून मोदी यांच्या विधानाने आचारसंहितेचा भंग झाला नसल्याचे मत व्यक्त केले होते, असे उच्चपदस्य सूत्रांनी सांगितल्याचे प्रसिद्ध झाले आहे.
तर आहे हे असे आहे. शेवटी या सार्‍या बाता, वार्ता, कुवार्ता किंवा सुवार्ता वाचून, ऐकून ऐकावे ते नवलच! असे म्हणण्याखेरीज आपल्या हातात तरी काय आहे?