ब्रेकिंग न्यूज़

निवडणुकांच्या रणधुमाळीतील नेत्यांची मुक्ताफळे

  • शंभू भाऊ बांदेकर

या निवडणुकांमध्ये विविध पक्षांच्या काही नेत्यांनी जी मुक्ताफळे उधळली, त्याचा निवडणुका संपल्यानंतर ते ज्यावेळी विचार करू लागतील, त्यावेळी क्षणभर त्यांनाही आपण खरेच असं बोललो का?

लोकसभेच्या व काही राज्यांतील विधानसभेच्या पोटनिवडणुका जाहीर झाल्यानंतर गेले दीड-दोन महिने प्रचाराची – अपप्रचाराची रणधुमाळी उडाली ती आता अंतिम टप्प्यात आली आहे. या दरम्यान कुठे ‘पुलवामा’च्या बदल्याचा राष्ट्रवादाचा जोश दिसला, तर कुठे ‘राफेल’च्या गहाळ फायलींचा हिशेेब मागितला गेला. विरोधक एकजूट दाखवायच्या प्रयत्नात दिसले, तर भाजपातून विरोधकांची बेकी दाखवण्याचा प्रयत्न झाला. सत्ताधार्‍यांनी दिलेली आश्‍वासने किती फोल ठरली याचा पाठा विरोधकांनी वाचला, तर आम्ही मार्ग, महामार्ग, पूल बांधून कसा ‘विकास’ साधला त्याची रेकॉर्ड भाजपाने वाजवली.

या सार्‍यामध्ये एकमेकांची उणीदुणी काढणार्‍या, भावनांना आव्हान करणार्‍या शिवराळ, शेरेबाजी करणार्‍या प्रचाराभोवतीच निवडणूक फिरत राहिली आणि निवडणूक आयोगाला आचारसंहिता भंग करणार्‍यांवर सभा, बैठका, रोड शो आदिंवर बंदी घालणार्‍या कारवाया अनेकवेळा, अनेक ठिकाणी कराव्या लागल्या. आता २३ मेपर्यंत उधाण येणार आहे ते चर्चेला. सत्ताधार्‍यांना किती जागा, गठबंधनाला किती जागा, प्रादेशिक पक्षांना किती जागा आदींचा हिशेेब मांडण्यात आता वेळ जाणार आहे.
मला वाटते या निवडणुकांमध्ये विविध पक्षांच्या काही नेत्यांनी जी मुक्ताफळे उधळली, त्याचा निवडणुका संपल्यानंतर ते ज्यावेळी विचार करू लागतील, त्यावेळी क्षणभर त्यांनाही आपण खरेच असं बोललो का? आपले बोलणे केवळ प्रचारी थाटाचे होते का? प्रसारमाध्यमांनी आपल्याला प्रसिद्धी दिली ती योग्यच होती का, आदी प्रश्‍न त्यांना वाकुल्या दाखविल्याशिवाय राहणार नाहीत.

आपण पहिले उदाहरण मायावती-मुलायमसिंग यांचे घेऊ. १९९३ मध्ये मायावतींचा बसपा आणि मुलायमसिंह यादवांचा सपा एकत्र होते. पण १९९५ मध्ये घडलेले ‘गेस्ट हाऊस कांड’ त्यांच्या मुळावर आले व हे दोन्ही पक्ष व पक्षप्रमुख एकमेकांचे कट्टर वैरी बनले. आता तब्बल दोन तपानंतर मायावती – मुलायमसिंह जोडगोळी पुन्हा निवडणुकीच्या रणधुमाळीत एकत्र आली. यावेळी मायावती म्हणाल्या, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशातील मागासवर्गाबद्दल वाटत असलेली काळजी खोटी आहे. मुलायमसिंह हेच मागासलेल्या जातीचे खरे कैवारी आहेत. कारण मुलायमसिंह यांनी समाजवादी पक्षाच्या झेंड्याखाली सर्व जातींच्या लोकांना एकत्र आणले, याबाबत कोणतेही दुमत नाही. म्हणून आम्ही एकत्र आलो.’ अर्थात मायावती यांनी इतके चांगले बोलल्याबद्दल आणि विद्यमान पंतप्रधानांपेक्षाही आपल्याला ‘ओबीसीं’चा खरा नेता म्हटल्याबद्दल एरव्ही कठोरपणे मायावतींना टीकेचे लक्ष्य बनवणारे मुलायमसिंह नरम होऊन मुलायम बनले नाहीत तरच आश्‍चर्य! मायावतींना भगिनी मायावती म्हणून मुलायम म्हणाले, ‘मायावती आणि मी एकाच व्यासपीठावर आलो, याचा मला अत्यानंद होत आहे. प्रत्येक कठीण प्रसंगांत त्यांनी आम्हाला साथ दिली आहे. माझ्यासाठी मते मागायला त्या येथे आल्या आहेत, हे उपकार मी कधीही विसरणार नाही.’
ही सपा-बसपाची गळाभेट झाल्यानंतर कंठ फुटला तो साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना. त्यांनी जी मुक्ताफळे उधळली त्यामुळे त्यांच्याविरुद्ध देशभरात संताप व्यक्त करण्यात आला, याचे कारण म्हणजे शहीद हेमंत करकरेंविषयी त्यांनी केलेले वादग्रस्त वक्तव्य होय. त्या म्हणाल्या,‘हेमंत करकरे यांनी मालेगाव बॉम्बस्फोटात मला विनाकारण गोवले. त्यांनी मला इतक्या प्रचंड यातना दिल्या. त्यामुळे त्यांचा मृत्यू त्यांच्या कर्मामुळे व माझ्या शापामुळे झाला.’ साध्वी प्रज्ञा ठाकूर या मालेगाव बॉम्बस्फोटातील एक संशयित आहेत व तथाकथित साध्वी या भोपाळ मतदारसंघातील भाजपच्या विद्यमान लोकसभा उमेदवार आहेत.

वास्को येथे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा झाली. या सभेत देवेंद्र फडणवीस उद्गारले,‘ही लोकसभा निवडणूक म्हणजे देशाचा मान, सन्मान, स्वाभिमान आणि अभिमान राखणारी आहे. ही निवडणूक गल्लीची नसून दिल्लीची आहे. या देशाला सुरक्षित कोण ठेवू शकतो, याचा फैसला करणारी ही निवडणूक असून भाजपाशिवाय देशाला पर्याय नाही.’ अशी फोडणी फडणवीसांनी मारली. त्याला जणू प्रत्युत्तर म्हणून की काय राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार महाराष्ट्रातील नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी-कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार संग्राम जगताप यांच्या प्रचारासाठी कर्जत येथे बोलताना सांगितले की,‘मोदी देशात हुकूमशाही आणतील, अशी भीती वाटत आहे. कारण जनतेच्या मनामध्ये ही शेवटची निवडणूक आहे, यापुढे निवडणुका होणार नाहीत अशी जनतेची भावना होऊ लागली आहे. ते येथील लोकशाही भाजपचा पराभव करून नक्कीच टिकवतील. मोदींची हुकूमशाही ते ठोकरून देतील.’ निवडणूक मग ती राज्य पातळीवरची असो किंवा देशपातळीवरची. नेत्याला, पक्षाला मानणारे सरकारी कर्मचारीही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या सहभागी होतात हे आता उघड गुपीत झाले आहे; पण येथे तर खुद्द एका राज्याचे राज्यपालच भाजपाचे कल्याण करण्यासाठी पुढे सरसावल्यामुळे देशाच्या राष्ट्रपतींना हस्तक्षेप करावा लागला. हे राज्यपाल म्हणजे राजस्थानचे राज्यपाल कल्याणसिंह होय. ते एका प्रचारसभेत म्हणाले,‘आम्ही भाजपाचे कार्यकर्ते असून भाजपचाच विजय व्हावा अशी इच्छा आहे. २३ मे रोजी पुन्हा एकदा नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावेत असे आम्हाला वाटते.’ अर्थात हे वक्तव्य त्यांना महाग पडले. विरोधी पक्षांनी त्यांच्या या वक्तव्याला आक्षेप घेत निवडणूक आयोगाकडे धाव घेतली. चौकशीत राज्यपालांनी नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळून आले आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी गृहमंत्रालयाला त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले.

एकीकडे मतदारराजाला नेत्याची नड आहे, तर त्याच्या पक्षाची आवड आहे, दुसरीकडे पक्षाची नड आहे, तर नेत्याची आवड आहे. त्यामुळे ‘निवड’ कशी करायची याचा तो विचार करीत असतो, तर दुसरीकडे मतदारराजा निवडणुकीची संधी साधून आपल्या ठेवणीतले तोफगोळेही बाहेर काढीत असतो. यासाठी दोन गोळ्यांचीच ताजी उदाहरणे देता येतील. एक आहे सत्तरी तालुक्यातील तर दुसरी आहे काणकोण तालुक्यातील. मूलभूत सुविधांपासून आत्तापर्यंतच्या सरकारने वंचित ठेवल्याच्या निषेधार्थ पर्ये-सत्तरीतील अनसुलेवासीय आणि पैंगीण पंचायत क्षेत्रातील मार्ली-तिरवाळवासीयांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा सामूहिक ठाम निर्णय घेतला. अनसुलेमध्ये २०० मतदार तर मार्लीध्ये २३० मतदार आहेत. रस्ता, खंडित वीज, आरोग्यसेवा, रानटी प्राण्यांचा उपद्रव आदि समस्या त्यांना भेडसावत आहेत. शासकीय पातळीवर या मतदारांची समजूत काढण्याचा प्रयत्न झाला तरी त्या दोन्ही ठिकाणच्या मतदारांनी आता नाही, तर पुढे कधीच नाही, असा निर्धार करून मतदान न करण्याच्या निर्णयावर ठाम असल्याचे प्रतिपादन केले. निवडणुकांच्या रणधुमाळीतील नेत्यांची मुक्ताफळे आणि मतदारांनी फेकलेले तोफगोळे हे असे आहेत. आता मुक्ताफळे, तोफगोळे, बॉम्बगोळे या सर्वांचा परिणाम २३ मेला कळेलच. तोपर्यंत आपली खळखळ, चुळबुळ, तळमळ, काबूत असलेली बरी!