निर्भया कांडाच्या निकालाने बलात्कारी वृत्ती थांबेल काय?

निर्भया कांडाच्या निकालाने बलात्कारी वृत्ती थांबेल काय?

–  दत्ता भि. नाईक
तसे पाहता या घटनेला नऊ वर्षे लोटली. गुन्हा इतका निर्घृण व त्याचबरोबर स्पष्ट असूनही हा खटला रेंगाळला. सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा दिल्यानंतर यावर पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली. १२ डिसेंबर २०१९ रोजी तीही फेटाळली. तरीही नक्की फाशी केव्हा देणार याबद्दल अजूनही उत्सुकता होतीच.
दिल्लीत १६ डिसेंबर २०१२ रोजी घडलेल्या सामूहिक बलात्कार, खून, अपहरण, चोरी व मारहाण अशा विविध अपराधांना कारणीभूत ठरलेले मुकेश, पवन गुप्ता, विनय शर्मा आणि अक्षय कुमार सिंह या आरोपींना दिल्लीच्या पतियाला हाऊस न्यायालयाने २२ जानेवारी रोजी फासावर लटकावणार असल्याचे घोषित करून अख्खा देश हादरवून टाकणार्‍या निर्णया कांडातील अखेरचे पर्व संपणार असल्याचे घोषित केले. तसे पाहता या घटनेला नऊ वर्षे लोटली. गुन्हा इतका निर्घृण व त्याचबरोबर स्पष्ट असूनही हा खटला रेंगाळला. सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा दिल्यानंतर यावर पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली. १२ डिसेंबर २०१९ रोजी तीही फेटाळली. तरीही नक्की फाशी केव्हा देणार याबद्दल अजूनही उत्सुकता होतीच.
बलात्कार करून खुनाचा प्रयत्न
त्या दिवशी संध्याकाळी दक्षिण दिल्लीतील मुनरिका या बसस्टॉपवर अवनिंद्रकुमार पांडे व त्याच्याबरोबर ज्योती नावाची पॅरामेडिकलची विद्यार्थिनी उभी होती. तेवढ्यात एक बस येऊन उभी राहिली. बसमध्ये पाचजण इतस्ततः बसले होते, त्यामुळे ते प्रवासीच आहेत असे वाटावे. अवनिंद्रकुमार पांडे याने जे नंतर वर्णन केले त्यावरून ही संपूर्ण माहिती पुढे आली. थोड्या वेळानंतर बसचे दरवाजे बंद करून त्या दोघांवर हल्ला करून त्यांचे मोबाईल काढून घेतले. अवनिंद्रकुमारच्या हातापायावर रॉडने प्रहार करून त्याला उठणे व प्रतिकार करणे अशक्य होईल अशी त्याची हालत करून ठेवली. तरीही त्याने बसचा दरवाजा व खिडकी तोडण्याचा प्रयत्न केला. गुन्हेगारांच्या डोक्यात इतकी गर्मी चढली होती की त्यांनी त्याच्यासोबतच्या तरुणीवर सामूहिक बलात्कार केला. त्याशिवाय जिवंत मारण्याचाही प्रयत्न केला. ती मरण पावली अशी खात्री पटल्यावर त्यांनी त्या दोघांना रस्त्याच्या बाजूला फेकून दिले. त्यानंतरही त्यांनी त्यांच्या अंगावरून बस नेण्याचा प्रयत्न केला, पण त्यात त्यांना यश आले नाही.
अंगात ओरडण्याचे बळ नाही तरीही अवनिंद्रकुमार यांनी येणार्‍या-जाणार्‍यांना मदतीसाठी आवाहन केले. बरेचजण गाडी थांबवून काचा खाली उतरवून बघितल्यावर निघून जात होते. तेवढ्यात एका दुचाकीस्वाराने त्यांना बघितल्यावर स्वतःच्या ऑफिसमध्ये नेले व पोलिसांना कळवले. त्यांना दिल्लीतील सफदरजंग हॉस्पिटलमध्ये ज्युनिअर डॉक्टरांनी तपासले. सिनिअर डॉक्टर चार तासांनी आले तोपर्यंत परिस्थिती अजून गंभीर बनली होती. अशा घटनेतील महिलेचे नाव पुनः पुन्हा येऊ नये असा एक संकेत आहे म्हणून तिचा उल्लेख निर्भया या नावाने केला जाऊ लागला. प्रकृती चिंताजनक असल्यामुळे तिला उपचारासाठी सिंगापूरला नेण्यात आले. २९ डिसेंबर रोजी तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.
न्यायालयाचा कालापव्यय
हा सर्व प्रकार पूर्वनियोजित होता याबद्दल शंकेस वाव नाही. बसमध्ये कुणीही नव्हता जो या गुन्हेगारांना विरोध करेल. बसच्या चालकाने त्यांना पूर्ण सहकार्य दिले. आपण काय करतो याचे सर्वांनाच भान नव्हते. तरुण तरुणीबरोबर फिरतात म्हणजे त्यांना कुणी विचारणारा नसतो यासारखी कल्पना काहींच्या मनात असते. ती कुठून सुरू होते याचा नीट तपास लावला पाहिजे. अरुणा शानभाग या नर्सवरील बलात्काराची घटना, रूचिका गहरोजा, कठुआ बलात्कार, २००८ मधील नोयडा डबल मर्डर, शक्ती मिल्समधील घटनाक्रम, २०१४ मधील जादयपूर विद्यापीठातील घटना या सर्व एकामागून एक घडणार्‍या घटनांकडे पाहिल्यावर आपला देश कुठे चालला आहे असा प्रश्‍न उभा राहतो. एका बाजूला ‘यत्र नार्यस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवतः’ असे शिकवणारी आपली संस्कृती आहे असा टेंभा आपण मिरवत असतो.
या घटनेतील चारही आरोपींचा गुन्हा सिद्ध होऊनही कालापव्ययामुळे न्यायप्रिय जनता एकप्रकारे संतप्त आहे. २२ जानेवारीपूर्वी अजूनही एखादी दयेची याचिका सादर केल्यास फाशीचा दिवस पुढे जाऊ शकतो. फाशीचे जन्मठेपीमध्ये रूपांतर करण्यास सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच नकार दिलेला आहे. खटला चालू असतानाच बसचा चालक रामसिंहने आत्महत्या करून स्वतःची सुटका करून घेतली. एकूण सहा आरोपींपैकी एक वयाने लहान होता. त्याच्यावर बालन्यायालयात खटला चालवला गेला. एका अल्पवयीन मुलाचे कृत्य पाहून बालन्यायालयाचे न्यायमूर्तीही अस्वस्थ झाले. त्याला त्यानुसार शिक्षा होऊन त्याची २० डिसेंबर २०१५ रोजी सुटका झाली. या घटनेचा इतका परिणाम झाला की ज्युवेनाईल जस्टीसच्या कायद्यात बदल करावा लागला.
कुटुंबीयांची प्रतिक्रिया
१४ फेब्रुवारी २०१९ रोजी निर्भयाच्या मातेने शिक्षेची कार्यवाही लवकरात लवकर व्हावी म्हणून न्यायालयासमोर याचिका दाखल केली होती. त्यामुळेही या निर्णयाला गती मिळाली असेल, नपेक्षा अजूनही निर्णय झाला तरी कार्यवाहीचा दिवस ठरवताना दिरंगाई होऊ शकली असती.
दिल्लीच्या तिहार जेलमध्ये असलेल्या या चारही आरोपींशी व्हिडिओ कॉन्फरन्ंिसगद्वारे न्यायालयाचा निर्णय कळवण्यात आला. त्यांना २२ जानेवारी रोजी फाशी देण्याचा आदेश देण्यात आलेला आहे हे यातून सांगण्यात आले. त्यामुळे लोकशाहीतील सुस्पष्ट न्यायदानाचे नियम पाळण्यात आले. दिल्लीचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश सतीशकुमार आरोरा यांनी या आरोपींचा कुठल्याही प्रकारचा दयेचा अर्ज राष्ट्रपती वा कोणत्याही पातळीवरच्या न्यायालयासमोर प्रलंबित नाही. त्याचबरोबर शिक्षेच्या फेरविचाराची याचिकाही सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावल्यामुळे हा आदेश दिला जात असल्याचे म्हटले आहे.
या निर्णयामुळे निर्भयाच्या कुटुंबीय व मित्रमंडळींना आपले माणूस गमावले तरी न्याय मिळाला याचे समाधान आहे. निर्भयाच्या मातेने प्रतिक्रिया देताना देशातील महिलांना बळ देणारा हा निर्णय आहे असे म्हटले आहे. या निर्णयामुळे जनतेचा न्यायव्यवस्थेवरील विश्‍वास दृढ होईल असेही म्हटले आहे. वडील बद्रिनाथ सिंह यांनीही न्यायालयाच्या निर्णयाच्या संबंधाने समाधान व्यक्त केले आहे. निर्भयाच्या आजोबांनी निर्णय समजल्यावर उशिरा का होईना आम्हाला न्याय मिळाला, आम्ही सात वर्षे वाट पाहिली अशी प्रतिक्रिया दिली. अशा प्रकारच्या खटल्यांची जलदगतीने सुनावणी झाली पाहिजे असे सर्वांनाच वाटते. संबंधितांना तर ते अधिक वाटणे साहजिकच आहे. तरीही आपली न्यायव्यवस्था संथगतीनेच चालते यासारखी चिंता करण्याची दुसरी कोणतीही बाब नाही.
ही वृत्ती का वाढते?
उत्तर प्रदेशातील बालिया हे निर्भयाचे गाव. तिच्यावर गुदरलेल्या प्रसंगामुळे अख्खे गाव दुःखसागरात बुडाले होते. आपल्या गावातील हरहुन्नरी मुलगी अशी लांडग्यांच्या तोंडी पडावी याचे दुःख अख्ख्या गावाला आहे. अनेकजण दोषींना फाशीची शिक्षा व्हावी म्हणून देवाला साकडे घालून बसले होते. नवस-सायास करत होते. पतियाला हाऊस कोर्टाच्या निर्णयामुळे संपूर्ण गावाने सुटकेचा सुस्कारा सोडला असून २२ जानेवारी रोजी सकाळी सात वाजता जेव्हा फाशीची अंमलजावणी होईल त्यावेळी फटाके व आतशबाजी करण्याचे व संपूर्ण शहरात दिवाळी साजरी करण्याचे सर्वजणांनी ठरवले आहे.
देशात बलात्काराच्या घटना दिवसेंदिवस का वाढतात ही एक विचार करायला लावणारी बाब आहे. चित्रपटांमध्ये कॅबेेरे डान्स, बलात्कार यांची रेलचेल असते. आजकाल एखादी अभिनेत्री तिच्या अभिनयापेक्षाही देहप्रदर्शनामुळे प्रसिद्ध व लोकप्रिय बनते. आजकाल अश्‍लील दृश्ये पोर्न साईट्‌स सर्वत्र उपलब्ध आहे. त्यामुळे अनेकजण लैंगिकदृष्टीने आक्रमक होतात असे बर्‍याच जणांचे म्हणणे आहे, तर याउलट सतत अशी दृश्ये पाहिल्यामुळे माणूस कमी आक्रमक होतो असेही काहींचे म्हणणे आहे. युरोपमध्ये ज्या गोष्टी नेहमीच्या असतात त्या आपल्याकडे नाहीत. आपले हवामान व जीवनपद्धती यावरही या गोष्टी अवलंबून आहेत.
देखणे दिसण्याचा प्रयत्न करणे हा प्रत्येक माणसाचा हक्क आहे. त्यातही महिलांसाठी श्रृंगाराचे महत्त्व अधिक असते. आपल्या संस्कृतीत सोळा शृंगारांचे महत्त्व आहे. आपल्याकडील तत्त्वज्ञान जितके विरक्त आहे तितकेच काव्य शृंगारिक भाषेने रंगलेले आहे. रामायण व महाभारत या दोन्ही महाकाव्यांत याचा प्रत्यय येतो. इतके असूनही शृंगार करणार्‍या स्त्रीकडे वाईट दृष्टीने बघण्याचा दृष्टिकोन कुठून उत्पन्न झाला याचा शोध लावला पाहिजे. निर्भया केसमुळे न्याय-अन्यायाच्या चर्चा सुरू होऊन परत केव्हातरी त्या थंडावतील. बलात्कार हा सर्वात मोठा गुन्हा आहे. याशिवाय बलात्कार करून पीडितेची हत्या करणे, त्यांचा संपर्क तोडण्याकरिता मोबाईल्स काढून घेणे या घटनांकडे पाहता पाळत ठेवून हा गुन्हा केलेला आहे. परिणामांची जाणीव यांना नसेलच असे नाही, परंतु त्यातील एकालाही त्यांना थांबवावेसे वाटले नाही. बसच्या चालकाने तरी तारतम्य बाळगणे आवश्यक होते. हे पाहता सर्वकाही अनाकलनीय वाटते. कोणतीही शिक्षा ही दिशा निदेशक असते. यापुढे कुणीही असा प्रकार करू नये म्हणून गुन्हेगाराला शिक्षा दिली जाते. आज सज्जन माणसे जल्लोश करतील पण गुन्हेगारी वृत्ती यातून काही धडा शिकेल काय, हाच खरा प्रश्‍न आहे. पुरुषी अहंकारातून उत्पन्न झालेली बलात्कारी वृत्ती एवढ्याने थांबेल काय, हा खरा अनुत्तरित प्रश्‍न आहे.