नासा ही शिरसो द्वारं …

  •  डॉ. सुरज स. पाटलेकर
    (अध्यापक, गोमंतक आयुर्वेद महाविद्यालय)

आपण जेव्हा नाक साफ करतो तेव्हा ते दोन्ही नाकपुड्या एकत्र न करता एकावेळेस एकच साफ करावी. अश्याने नाकावर जास्त दाब येणार नाही व नाकातून रक्तस्राव होण्याची शक्यता पण कमी होईल.

आपले ‘नाक’ याबद्दल आपल्याला एवढेच माहीत असते की नाकाने आपण श्वास घेतो व त्यामुळेच आपण वास घेऊ शकतो मग तो एखादा सुगंध असो किंवा दुर्गंध. बरेचशे कान-नाक-घसा व डोळे यांचे व्याधी हे एकमेकांशी निगडीत असतात किंवा एकमेकांच्यात पसरत असतात. युवस्टेचियन ट्यूब/नलिका हा शरीराचा एक असा अवयव आहे जो नाकाला कान, मुख या अवयवांशी जोड़तो आणि म्हणूनच तर सर्दी झाल्याने कधीकधी कान पण गप्प, बंद झाल्यासारखे वाटू लागतात, ऐकू कमी येते, कान दुखू लागतात. नाकातील सर्दी किंवा इतर व्याधि ह्या कानामध्ये पसरल्या, संसर्ग झाला तर कर्णस्राव, मध्यकर्णशोथ, कानाचा पडदा फाटणे इतर गंभीर आजार होऊ शकतात.

ह्याव्यतिरिक्त नाक हे संरक्षणासाठीही तेवढेच उपयुक्त असते. जे काही जिवाणू, धूळ, परागकण यांसारख्या इतर गोष्टी नाकावाटे शरीरामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करतात त्या सगळयांना नाकातील चिकट द्राव व बारीक केस हे पकडून ठेवते व आपली रोगप्रतिकार शक्ति वाढवते. तसेच बाहेरील थंड हवा ही शरीरात जाण्यापासून नाकाची विशिष्ट रचनाच वाचवते. नाक(नासा) व नासास्थि यांचे एक प्रमुख कार्य म्हणजे बाह्य थंड व गार हवा ही थोड्या प्रमाणात उष्ण करुन मग ती शरीरामध्ये आत जाऊ देणे. ही हवा जर तश्याच स्वरूपामध्ये शरीरामध्ये गेली तर डोकेदुखी किंवा डोके जड होणे यासारखा त्रास होतो कारण नाक हे तर शिरा(डोके)चे द्वार असे आयुर्वेदात सांगितले आहे. नाकाचे हे कार्यच बिघड़ले गेले तर ह्या सर्व गोष्टी नासा अस्थि(सायनस), घसा, फुफ्फुस, स्वरयंत्र यामध्ये जाऊन रोग उत्पन्न करतील. सर्दी, खोकला, दमा, घसा खवखवणे, आवाज बसणे, घश्याला सूज येणे हे रोग होऊ शकतात. तसेच नाकातून दिलेले औषध ज्याला आपण नस्य म्हणतो ते ही शिरामध्ये पोचते व म्हणूनच फायदेशीर ठरते.

नाकाची जेवढी भूमिका या वरील उल्लेखित कार्यामध्ये आहे तेवढीच भूमिका स्वर किंवा आवाज उत्पन्न करण्यात आहे. जर आपले नाक बंद असेल तर मग आवाजावरसुद्धा फरक नक्कीच पडतो आणि हेच स्वतः अनुभवायला मिळते. ज्यावेळी सर्दीमुळे नाक बंद होते तेव्हा किंवा तुम्ही स्वतःचे नाक बंद करुन बोलायचा प्रयत्न केलात तरी पण हे जाणवेल. तसेच चव कळण्यासाठीसुद्धा नाक हे गरजेचे असते कारण जर त्या खाण्यात येणार्‍या पदार्थाचा सुगंधच येणार नसेल तर तो पदार्थ पण पचपचीत व नीरस लागणार आणि हेच ताप सर्दी असल्यास होते, काही खाण्याची इच्छाच मरते.
आपल्याला शिंक जी येते, ती आपल्या शरीराची एखादी न आवडती गोष्ट, पदार्थ याबद्दल ऍलर्जीक रिस्पोंस असू शकते किंवा आजारामुळे शिंक येणे असेही होऊ शकते. काही लोकांना सकाळी उठल्याउठल्या एकाचवेळी भरपूर प्रमाणात सलग शिंका येतात, तर काहींना रडल्यावर, दुःख झाल्यावर, एखादा आंबट वा तिखट पदार्थ खाल्ल्यावर, अण्डे, चॉकलेट (त्यातील कोकोआ याची), शीतपेय प्यायल्याने, बाहेर दव व बर्फ यांचा संपर्क आल्याने, गारवा वाढल्याने, हवामान दमट झाल्याने, वायु प्रदूषण (कारखाना, गाड्यांचा धुर), दुर्गंधी, विशिष्ट औषध, सौंदर्यप्रसाधने वापरल्याने (अत्तर, पावडर इतर) सर्दीमुळेसुद्धा शिंका येतात.

बहुतांश वेळा नाकातील श्लेष्मल त्वचा ही इर्रिटेट झाल्याने शिंका येतात व त्यासोबत नाकातून थोड्या प्रमाणात स्रावसुद्धा होऊ शकतो.
जोरात शिंकणे, नाक साफ करणे, नाकातील खपल्या काढणे, अचानक एखादा मार लागल्याने यामुळे नाकातील रक्तवाहिन्या फुटून थोड्या वा जास्तप्रमाणात रक्तस्राव होऊ शकतो. नाकामध्ये घोणा फुटणे ज्याला म्हणतात त्यातही भरपूर प्रमाणात रक्तस्राव होत असतो. नाकातील ५ प्रमुख रक्तवाहिन्यांपैकी ४ ह्या लिटल्स एरिया या भागाला पुरवठा करतात आणि त्या नाकाच्या आत खुपच बाहेरच्या बाजुला असतात व त्यांना लगेच इजा पोहोचते आणि असे झाल्यास अतिप्रमाणात रक्तस्राव होऊन मृत्युसुद्धा होऊ शकतो. म्हणूनच असे करणे टाळावे व रक्तस्राव होत असल्यास त्वरित नाकावर २ बोटांनी थोडा दाब देऊन, बर्फ लाऊन रक्तस्राव थोडा आटोक्यात आणून वैद्यांना दाखवावे.

प्रमेही, मधुमेही रुग्णाना अंगास लाल पिटिका, पुरळ, फोड होण्याचे प्रमाण जास्त असते. विशेषकरुन कान व नाकामध्ये. असे असल्यास काळजी घेणे खूप महत्वाचे. कारण ह्या पिटिकांची जर जखम झाली तर मग तो व्रण भरुन यायला कठिण होईल आणि त्यातही रक्तातील साखरेचे प्रमाण जर जास्त असेल तर मग अजुनच कठीण परिस्थिती उद्भवेल.
आपण जेव्हा नाक साफ करतो तेव्हा ते दोन्ही नाकपुड्या एकत्र न करता एकावेळेस एकच साफ करावी. अश्याने नाकावर जास्त दाब येणार नाही व नाकातून रक्तस्राव होण्याची शक्यता पण कमी होईल.
नाकामध्ये आत जेव्हा सुज येते (हायपरट्रोफीड टरबीनेट्स) व त्यामुळे नाक बंद झाल्याने श्वासोश्वास करण्यास त्रास होतो, त्यावेळी आपण एखादे इंग्रजी नेसल ड्रॉप्स नाकामध्ये घालण्यासाठी वापरतो. त्याचा परिणाम हा फक्त काहीवेळासाठीच असतो आणि त्यानंतर परत नाकामधील सुज जैसे थे परत येते. आपण टीव्ही वरची जाहिरात बघून ओवर द काऊंटर ते कुठल्याही वैद्यांचा किंवा तज्ञांचा सल्ला न घेता विकत घेत असतो. त्यापेक्षा त्यांचा सल्ला घेणे महत्वाचे.