नार्वेत युवकाचा निर्घृण खून

गावकरवाडा, नार्वे – डिचोली येथील मुख्य जंक्शनजवळ असलेल्या साकवाखाली सतीश गुरुदास परवार (१७) या स्थानिक युवकाचा दगडाने ठेवून खून केलेल्या अवस्थेत मृतदेह काल आढळून आला. सदर मृतदेह पूर्णपणे सडलेल्या अवस्थेत होता. तीस मीटर अंतरावर ठार करून त्याला साकवाखाली लपवून ठेवल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले असल्याने सदर प्रकार खुनाचाच असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त आहे. याप्रकरणी पोलिसांनी तपासाला गती देताना मयत सतीश याच्या दोघा मित्रांना ताब्यात घेतले आहे.

डिचोलीचे निरीक्षक नारायण चिमुलकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सतीश परवार हा युवक सुरज आसबे व गणेश रावल या आपल्या मित्रांसमवेत गेल्या शनिवार दि. ७ जानेवारी रोजी रात्री म्हावळिंगे येथे कालोत्सवाला गेला होता. कालोत्सवाला जाण्यापूर्वी सर्वांनी म्हावळिंगे येथे मद्यपानही केले होते. म्हावळिंगेतील कालोत्सव संपवून तिघेही एकाच दुचाकीवरून नार्वेत आले. सदर दुचाकी गणेश रावल चालवत होता. त्याने गावकरवाडा येथे मृतदेह आढळलेल्या जंक्शनजवळ सतीश व सुरज या दोघांना उतरवून तो आपल्या घरी गेला होता.
त्या रात्रीच सदर खून झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्या दिवसापासून सतीश बेपत्ता होता. मात्र, तो बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस स्थानकात नोंदवण्यात आली नव्हती. मृतदेह आढळलेल्या साकवाजवळच मयत सतीश याचे घर आहे. काहीतरी कुजल्याची उग्र दुर्गंधी येत असल्याने सतीशचे वडील गुरुदास परवार यांनी दुर्गंधीच्या दिशेने जाऊन पाहिले असता त्यांना मुलाचा मृतदेह दृष्टीस पडल्याचे पोलिसांनी सांगितले.