नाराज न होता राजकारणातील प्रवेशासाठी प्रयत्नरत ः उत्पल

राजकारणात प्रवेश करताना सुरुवातीला अडथळे येतात. या अडथळ्यामुळे नाराज न होता राजकारणातील प्रवेशासाठी प्रयत्नरत राहणार आहे, अशी प्रतिक्रिया दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांनी दिली. पणजी मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी भाजपने उमेदवारी नाकारल्यानंतर पत्रकारांशी उत्पल काल बोलत होते.

आपले वडील मनोहर पर्रीकर यांनाही राजकारण प्रवेश करताना सुरुवातीला अडचणी आल्या होत्या. भाजपकडून दिली जाणारी जबाबदार पार पाडणार आहे, असेही उत्पल पर्रीकर यांनी एका प्रश्‍नावर बोलताना सांगितले.

माझ्या राजकारणातील प्रवेशामुळे घराणेशाहीचा प्रश्‍नच निर्माण होत नाही. कारण, माझे वडील आज हयात नाहीत. माझे स्वतःचे मत, विचार आहेत. मी स्वतःच्या बळावर राजकारणात प्रवेशासाठी प्रयत्न करीत आहे. राजकारणाचे शुद्धीकरण करण्यासाठी चांगल्या माणसांनी राजकारणात प्रवेश केला पाहिजे, असे माझे वडील सांगत होते. आपण राजकारणाच्या शुद्धीकरणासाठी राजकारणात प्रवेश करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. अडथळ्यांना घाबरणार नाही. राजकारणातील प्रवेशाचे अडथळे दूर करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे, असेही पर्रीकर यांनी सांगितले.

पणजी मतदारसंघाची जागा ही माझ्यासाठी प्रतिष्ठेची आहे. गेली २५ वर्षे पणजीवासीयांनी माझ्या वडिलांना चांगली साथ दिली. यापुढे ही जागा कायम राखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे, असेही उत्पल पर्रीकर यांनी सांगितले.