नाफ्ता हलविण्यासाठी सिंगापूरस्थित कंपनीची मदत

नाफ्ता हलविण्यासाठी सिंगापूरस्थित कंपनीची मदत

>> मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची माहिती : काम पूर्ण करण्यासाठी लागणार किमान १५ दिवस

दोनापावल येथे समुद्रात अडकून पडलेल्या ‘नुशी नलिनी’ या जहाजातील नाफ्ता सुरक्षितपणे काढून दुसर्‍या जहाजात घालण्याचे काम हाती घेण्यास सिंगापुरस्थित एका कंपनीची मदत घेण्यात येणार असल्याचे काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यानी सांगितले. हे काम पूर्ण करण्यास किमान १५ दिवस लागणार असल्याचे ते म्हणाले.

सावंत यांनी याबाबत सरकार कोणताही धोका पत्करू इच्छित नसून त्यासाठीच हे काम हाती घेण्यास अशा कामाचा दांडगा अनुभव असलेल्या कंपनीचीच मदत घेण्याचे सरकारने ठरवले असल्याचे स्पष्ट केले. तसा अनुभव असलेल्या कंपन्यांची आम्हाला मदत हवी असून आम्ही ती घेऊ इच्छित असल्याचे आम्ही केंद्रीय गृह मंत्रालय व केंद्रीय जहाजोद्योग मंत्रालयाला कळवून त्यासाठीची प्रक्रिया सुरू केली आहे. सिंगापुरस्थित दोन कंपन्यांनी त्यासाठी बोली गोवा सरकारला पाठवल्या आहेत. त्यापैकी कोणाची मदत घ्यायची यासंबंधीचा निर्णय आम्ही बुधवारी घेणार असून नंतर काम सुरू करण्याचा आदेश सदर कंपनीला देणार असल्याचे सावंत यांनी स्पष्ट केले.

काम सोपे नाही
सदर जहाजातून नाफ्ता काढून तो दुसर्‍या जहाजात भरणे हे तसे सोपे काम नसून या मोहिमेच्या वेळी दुर्घटना घडू नये यासाठीच अशा कामाचा दांडगा अनुभव असलेल्या कंपनीकडेच हे काम सोपवण्याचा निर्णय घेतला असल्याचे सावंत यांनी नमूद केले. हे जिकरीचे असे काम पूर्ण होण्यास किमान १५ दिवस लागणार असल्याचे ते म्हणाले.

नाफ्ताच्या टाक्या सुरक्षित
या बोटीतील नाफ्ताच्या टाक्या सुरक्षित असून त्यातील नाईट्रोजनची पातळी हवी तेवढीच असल्याचेही ते म्हणाले.

खर्च जहाजाच्या मालकाकडून
वसूल करून घेणार
या संपूर्ण मोहिमेवर जेवढा खर्च येणार आहे तो सगळा ह्या जहाजाच्या मालकाकडून वसूल करून घेण्यात येणार असल्याचे सावंत यांनी स्पष्ट केले. मालकाने त्यासाठी असमर्थता दाखवली तर तो खर्च एमपीटी अथवा डीजी शिपिंगला करावा लागणार आहे. आपण रोज आढावा घेत असून मंगळवारी यासंबंधी महसूल सचिवाबरोबरही बैठक घेतल्याचे ते म्हणाले.