नानोडा, डिचोलीत चक्रीवादळाचा तडाखा

नानोडा, डिचोलीत चक्रीवादळाचा तडाखा

> २० पेक्षा अधिक वृक्ष कोसळले; २॥ लाखांची हानी

डिचोली तालुक्यातील लाटंबार्से पंचायत क्षेत्रातील नानोडा, भटवाडी, उसप येथे काल सकाळी चक्रीवादळाचा तडाखा बसल्याने किमान २० पेक्षा अधिक मोठे वृक्ष कोसळले. अनेक ठिकाणी वीज खांब उन्मळून पडल्याने वाहिन्या तुटून वीजपुरवठा खंडित झाला तर काही घरावर वृक्ष कोसळल्याने हानी झाली.
वरील भागात असलेल्या कुळागरातील सुपारीची तसेच फणसाची झाडे उन्मळून पडली. त्यामुळे सुमारे अडीच लाखांची हानी झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. नानोडा शाळेजवळ वटवृक्ष कोसळल्याने हमरस्त्यावरील वाहतूक २ तास ठप्प झाली. डिचोली अग्निशमन दलाच्या जवानांनी अडथळे दूर करून रस्ता मोकळा केला.
आमदार राजेश पाटणेकर यांनी दुपारी घटनास्थळी भेट घेऊन वादळाचा तडाखा बसलेल्या भागाची पाहणी केली. वादळामुळे बागायतदारांचे मोठे नुकसान झालेले असून त्यांना मदत देण्याची मागणी पाटणेकर यांनी केली आहे. मुसळधार पावसाबरोबर वादळ वार्‍याने सुमारे अर्धा तास वरील गावांमध्ये धुमाकूळ घातल्याने अनेक वृक्ष कोसळले. पाच तासांनंतर वीज व्यवस्था सुरळीत करण्यात आली. डिचोली अग्निशमन दलाचे जवान अविश्रांत मदत कार्यात गुंतले होते.