नाताळ एक आनंदसोहळा

– फादर डॉ. रॉबर्ट डिसौझा 

शांतता, सद्भावना, दया, क्षमा, शांती, परोपकार आदींची शिकवण देणारा नाताळ म्हणजे येशू ख्रिस्ताचा जन्मसोहळा साजरा करण्याचा एक आनंदी मुहूर्त… प्रथा आणि परंपरांचं पालन करत साजरा होणारा हा सण प्रत्येक पिढीला जगण्याचा संदेश देत असतो. समाजरचना उत्तम राखण्यासाठी हा संदेश उपयुक्त ठरतो. नाताळनिमित्त सजणारी बाजारपेठ, जाणवणारा खरेदीचा उत्साह आणि हे सूचक संदेश अशा सणाच्या दोन बाजू आहेत.

साजर्‍या होणार्‍या प्रत्येक सणामागे धार्मिक, पौराणिक, आध्यात्मिक संदर्भ असतातच, त्याचबरोबर सामाजिक संदर्भही असतात. मुख्य म्हणजे हे संदर्भ प्रत्येक काळाला लागू पडतात. काळ पुढे सरकतो पण मनुष्यस्वभावात ङ्गारसा ङ्गरक पडत नाही. जीवनाचे संदर्भ बदलले तरी मूलभूत संकल्पना बदलत नाहीत. समाजरचना बदलली तरी ढाचा बदलत नाही. मनुष्याच्या ठिकाणी सत्व, रज आणि तमोगुणांचं प्रमाण वेगवेगळं असलं तरी त्यांचं अस्तित्व नाकारता येत नाही. मनुष्य आणि पर्यायाने समाजरचनेत तारतम्य राहावं, त्यांच्या मूल्यांना नैतिक अधिष्ठान राहावं, विचारांमध्ये सुसूत्रता राहावी या हेतूने महापुरुषांनी मौलिक संदेश देऊन ठेवला आहे. आजही त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ साजर्‍या होणार्‍या सणांच्या माध्यमातून हा संदेश जनांपर्यंत पोहोचत असतो. ख्रिसमसही त्याला अपवाद नाही. या मंगलमय सणाच्या सर्वांना शुभेच्छा!
इसवी सन २८५ पासून ख्रिसमस हा सण साजरा होऊ लागला असं इतिहास सांगतो. मराठीत या सणाला नाताळ म्हणून संबोधलं जातं. ‘ख्रिस्त’ हा शब्द ‘ख्रिस्तोस’ या शब्दावरून आला आहे. अभिषिक्त असा त्याचा अर्थ… म्हणूनच ख्रिस्ताला अभिषिक्त राजा म्हणून ओळखतात. ‘नातालीस’ या शब्दापासून ‘नाताळ’ची उत्पत्ती झाली. नातालीस म्हणजे जन्म घेणं. २२-२३ डिसेंबरला सूर्याचं दक्षिणायन सुरू होतं. दिवस मोठा होऊ लागतो. रोमन साम्राज्यात आधी सूर्योपासना केली जायची. मात्र इसवी सन २१३ मध्ये रोममध्ये ख्रिस्ती धर्माला राजाश्रय मिळाला आणि सूर्याच्या उपासनेऐवजी ख्रिस्ताची उपासना सुरू झाली. पुढे कॅलेंडर अस्तित्वात आल्यानंतर २५ डिसेंबर हा दिवस येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस म्हणून निश्‍चित करण्यात आला. आजही या दिवशी येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस आनंदाने साजरा केला जातो. यानिमित्ताने अनेक प्रथा आणि परंपरांचं पालन होतं. या प्रथा-परंपरांमागे सुुस्पष्ट विचार आहेत. या प्रत्येक कृतीमध्ये मतितार्थ दडलेला आहे म्हणूनच या प्रथा-परंपरा जाणून घेतल्या तरच नाताळ या सणाचं खर्‍या अर्थाने महत्त्व समजू शकेल. नाताळ साजरा करताना गायीचा गोठा, ख्रिसमस ट्री, नाताळची गाणी, नाताळचा तारा, नाताळ भेटकार्ड यांना विशेष महत्त्व आहे. या प्रत्येकामध्ये बरीच प्रतीकं आणि संदेश दडलेले आहेत. आजच्या काळालाही त्याची महती सहज पटावी.
नाताळ या सणामध्ये उभारण्यात येणार्‍या देखाव्यात गायीच्या गोठ्याचं अपरंपार महत्त्व आहे. संत ङ्ग्रान्सिस ऑसिसिकर यांनी ही परंपरा सुरू केली. त्यांनी जिवंत पात्रांद्वारे येशूचा जन्मसोहळा उभा केला. उंट, मेंढ्या, तीन राजे, देवदूत, मेरी आणि तिचं छोटं बाळ या जिवंत पात्रांद्वारे त्यांना येशूजन्माची कथा लोकांपर्यंत पोहोचवायची होती. कालांतराने युरोपमध्ये ख्रिश्‍चन धर्माचा प्रसार झाला आणि जिवंत पात्रांच्या जागी मूर्ती बसवल्या जाऊ लागल्या. आज जागोजागी उभारण्यात येणार्‍या देखाव्यांमध्ये अशा सुंदर मूर्ती आपण पाहतो. या देखाव्याचं चिंतन करता खूप काही सापडतं. यात येशूचे पालक असणार्‍या मारिया आणि जोसेङ्गचं प्रेमळ पालकत्व दिसतं. तीन राजे ज्ञानी लोकांचं प्रतीक आहेत. ते तार्‍याच्या दिशेने शोध घेत आले म्हणजेच त्यांच्या ठायी संशोधनवृत्ती होती. येशू जन्माच्या वेळी आजूबाजूचे मेंढपाळ जमले. त्यांच्या ठायी कुतूहल होतं. येशूचा जन्म गोठ्यात झाला. ही बाब आयुष्यात साधेपणा राखण्याचा संदेश देते. देवदूताने येशूजन्माची सुवार्ता सांगितली. यातून सकारात्मकता पोहोचवण्याचा संदेश मिळतो. आजही या सकारात्मकतेच्या अधिष्ठानांचं महत्त्व अबाधित आहे. एखाद्या दु:खी, कष्टी माणसाला सुवार्ता द्यावी, त्याच्या मनात सकारात्मता पेरावी आणि त्याचं दु:ख, नैराश्य दूर करावं असा संदेश या देखाव्यातून मिळतो. या देखाव्यांमध्ये पारंपरिकतेबरोबरच वर्तमानाचे पडसादही दिसतात. उदा. सध्या नोटाबंदीचा विषय गाजतो आहे. रांगेत उभं राहण्यात लोकांचा बराच वेळ जातोे आहे. साहजिकच यंदा नाताळच्या देखाव्यामध्ये याचं प्रतिबिंब पाहायला मिळेल. गल्लोगल्ली, कुटुंबामध्ये, चर्चच्या आवारात असे देखावे सादर होेतात. वसईमध्ये तर तलावातल्या बोटींमध्ये भव्यदिव्य देखावे बघण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होते. नाट्य, संगीत, समालोचन या माध्यमातून भाविकांशी संवाद साधला जातो.
नाताळची दुसरी परंपरा आहे ती ख्रिसमस स्टारची… येशू ख्रिस्ताच्या जन्मावेळी पूर्व दिशेला तारा दिसला होता. पृथ्वीतलावर कोणा महापुरुषाचा जन्म झाला असल्याचा तो संकेत होता. म्हणूनच या तार्‍याच्या दिशेने वेध घेत तीन राजे उंटावरून जेरुसलेमला पोहोचले. त्यांनी लोकांकडे यासंबंधी चौकशी केली, तेव्हा आपलं आसन डळमळीत होण्याच्या आशंकेेने तेथील राजा घाबरला. त्याने दरबारातील पंडितानाही या महापुरुषांचा शोध घेण्यासाठी पाठवलं. त्याने बायबलचं वाचन करता बेथलेहम या ठिकाणी महापुरुषाचा जन्म होईल अशी नोेंद सापडली. त्याप्रमाणे शोध घेता त्यांना गायीच्या गोठ्यात जन्मलेलं बाळ सापडलं. तीन राजांनी बाळाला नमस्कार केला आणि तीन भेटवस्तू दिल्या. सोने, धूप आणि गंधरस या त्या तीन भेटवस्तू होत्या. या भेटवस्तूही बरंच काही सांगून जातात. येशू ख्रिस्ताचा जीवनसंदेश यात दडला आहे. सोनं हे समृद्धीचं प्रतीक आहे. धुपाच्या माध्यमातून तो धर्मगुरू असल्याचं प्रतीत होतं आणि गंधरस मृतव्यक्तीच्या प्रेताला लावतात. म्हणजेच या राजाला समाजासाठी झटताना मृत्यू येईल असा अर्थ निघतो. या तीनही भेटवस्तूंच्या माध्यमातून येशू ख्रिस्त हा राजा, धर्मगुरू आणि संदिष्टा असल्याचा बोध होतो. या तीन राजांनी येशूला शोधण्यासाठी तीन माध्यमांचा वापर केला. तारा, लोकसमुदाय आणि बायबल ही तीन माध्यमे होत. यातूनही आपल्याला एक संदेश देण्यात आला आहे. पहिला संदेश आहे तो निसर्गात परमेश्वर शोधण्याचा… आपल्या आजूबाजूला, निसर्गामध्ये परमेश्वर असतो. पर्यावरणात तो सामावलेला असतो. म्हणूनच निसर्ग आणि पर्यावरण रक्षणाच्या माध्यमातून परमेश्वरापर्यंत पोहोचता येतं. या तीन राजांनी ख्रिस्त जन्माची वार्ता जाणून घेण्यासाठी लोकसमुदायाशी संवाद साधला. त्यांची ही कृती समाजाशी एकरूप होण्याचा संदेश देणारी आहे आणि तिसरं म्हणजे त्यांनी बायबलचा अभ्यास केला. इथे शास्त्रात परमेश्वर शोधण्याचा मार्ग आपल्याला दिसतो. म्हणजेच लिखित शब्दांतदेखील परमेश्वराचं अधिष्ठान सापडू शकतं. या संकेतांनुसार आजही ख्रिस्ती बांधव घरावर तारा लावतात, गावाच्या वेशीवर चांदणी लावली जाते. आपल्या जीवनात तार्‍याचं स्थान असणारी व्यक्ती कोण हेही या निमित्ताने शोधायला हवं. मुख्य म्हणजे आपणही एखाद्याच्या आयुष्यात तार्‍याची भूमिका बजावायला हवी.
नाताळ परंपरेत ख्रिसमस ट्रीचं मोठं महत्त्व आहे. यासंबंधीची कथाही मोठी रंजक आहे. एका सायंकाळी मार्टिन ल्यूथर अंगणात बसून आकाशातील तारे न्याहाळत होते. हे तारे पृथ्वीवर आणता येत नाहीत या विचाराने बेचैन असताना त्यांनी दारातील ङ्गर वृक्षाची ङ्गांदी तोडली, त्यावर छोट्या छोट्या मेणबत्त्या लावल्या. कालांतराने मेणबत्त्यांची जागा विजेच्या दिव्यांनी घेतली. दुसर्‍या एका कथेनुसार एक स्त्री दारात ख्रिसमस ट्री उभी करून प्रार्थनेला गेली. ती परतली तेव्हा कोळी-किटकांनी झाडावर लाळेचं वेष्टन घातलं होतं. त्यात दवबिंदू पडले होते आणि सूर्याच्या प्रकाशात ते चमकत होते. ती अद्भुत सजावट सर्वांनाचा मोहून गेली. तेव्हापासून ख्रिसमस ट्रीवर सोनेरी आणि चंदेरी लेस लावण्याची प्रथा सुरू झाली. ख्रिसमस ट्री सजवण्याच्या परंपरेतूनही एक संदेश मिळतोे. ङ्गर वृक्षाचं निरीक्षण केल्यास त्याच्या ङ्गांद्यामध्ये गॅप आढळते. म्हणूनच या वृक्षाच्या खाली सावली असते तसाच प्रकाशही असतो. अगदी याच पद्धतीने प्रत्येकाने आपल्याकडील ज्ञान दुसर्‍यापर्यंत पोहोचवायला हवं. प्रकाश-शलाका अडकवून ठेवू नयेत.
सांताक्लॉजबद्दलही बर्‍याच रंजक कथा आहेत. दानशूर संत निकोलस रात्रीच्या अंधारात द्रव्यहीनांना द्रव्य देत असे. कोणालाही कळू न देता, कोणताही गाजावाजा न करता त्याच्याकडून होणारी ही कृती दानाचं महत्त्व दर्शवते. घेण्यापेक्षा देण्यात आनंद असल्याचंही या परंपरेद्वारे स्पष्ट होतं. नाताळमध्ये नाताळ गीते गायली जातात. त्यांचंही वेगळं महत्त्व आहे. येशूचा जन्म झाला तेव्हा मेंढपाळ मेंढ्या राखत होेते. त्याचवेळी स्वर्गातून देवदूत अवतरले आणि गीत गाऊन त्यांनी येशूजन्माची सुवार्ता सांगितली. त्याचे शब्द होते- ‘स्वर्गात परमेश्वराला गौरव आणि पृथ्वीवर सज्जनांना शांती देण्यासाठी येशूने जन्म घेतला आहे.’ हे पहिलं नाताळ गीत आहे. त्यानंतर बरीच नाताळ गीते रचली गेली. ‘जिंगल बेल, जिंगल बेल…’सारखी गीतं यांतीलच! या गीतांच्या माध्यमातूनही शांतीचा आणि सकारात्मकतेचा संदेश दिला जातो. हा संदेश ग्रहण करायला हवा. माणसाने नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवायला हवा. सकारात्मकता असेल तर समस्येतही संधी शोधता येते आणि नकारात्मकता संधीतही समस्या शोधते. म्हणूनच नकारात्मता टाळून सकारात्मक दृष्टिकोन धारण करण्याचा संदेश देणारा नाताळ महत्त्वाचा सण ठरतो.

बाजारातील चहलपहल
खरेदी हा प्रत्येक सणाच्या साजरीकरणाचा केंद्रबिंदू असतो. नाताळ या सणामध्येही खरेदीचा हा बहर अनुभवायला मिळतो. या सणानिमित्त घराची आकर्षक सजावट केली जाते. साहजिकच घरसजावटीच्या वस्तूंना प्रचंड मागणी बघायला मिळते. नाताळच्या निमित्ताने आकर्षक आणि वेगवेगळ्या आकार-प्रकारच्या मेणबत्त्यांची विशेष रेलचेल दिसते. आकर्षक कँडल स्टँड, ख्रिसमस ट्रीच्या सजावटीचं सामान, आकर्षक लँप्स, तारा, बेल्स आदी सामानाने घराचा नूर पालटतो. थंडीचा मौसम लक्षात घेता नाताळच्या सणाला ऊबदार कपड्यांच्या खरेदीला पसंती असते. शॉर्ट अथवा लॉंग स्कर्ट, टॉप्स, ट्रेंडी ट्राऊजर, हाय हिल्स ङ्गूटवेअर, पर्स यांनाही भरपूर मागणी असते. नाताळला भेट देण्याचं विशेष महत्त्व आहे. त्यानिमित्ताने शुभेच्छा पत्र, सुका मेवा, चॉकलेट्‌स आदींची मोठ्या प्रमाणात खरेदी होते. सध्याचा ट्रेंड बघता भेटवस्तू म्हणून मेकअप प्रॉडक्ट निवडण्याकडेही अनेकांचा कल दिसतो. या काळात लाईटवेट ज्वेलरीलाही महिलावर्गाची पसंती मिळते. या काळात स्टॉकिंग्जच्या मागणीतही बरीच वाढ होते. यानिमित्ताने वेगवेगळ्या आकारातील स्टॉकिंग्ज बाजारात येतात. एकंदर हा माहोल वेगळाच आनंद देऊन जातो.