ब्रेकिंग न्यूज़

‘नागरी जाणिवा’ अभ्यासक्रम यंदापासून

>> कांता पाटणेकर यांची माहिती

>> राज्यभरातील शंभर शाळांची निवड

राज्यातील निवडक शंभर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयांतून चालू शैक्षणिक वर्षापासून ‘नागरी जाणिवा’ हा नवीन अभ्यासक्रम सुरू केला जाणार आहे, अशी माहिती गोवा शिक्षण विकास महामंडळाचे अध्यक्ष कांता पाटणेकर यांनी काल दिली. तिसरी ते नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना हा अभ्यासक्रम लागू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. सर्व सरकारी शाळांतून योग व मूल्य शिक्षण यापूर्वीच शिकवण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

महामंडळाने तयार केलेल्या ‘नागरी जाणिवा’ अभ्यासक्रमाच्या पाठ्यपुस्तकाला एनसीईआरटीने मान्यता दिली आहे. नागरी जाणिवा या अभ्यासक्रमात स्वच्छता व आरोग्य, कचरा व्यवस्थापन आणि वाहतूक व्यवस्था व रस्ता सुरक्षा या प्रमुख विषयांचा समावेश आहे, अशी माहिती पाटणेकर यांनी दिली.

अभ्यासक्रम तीन टप्प्यांत
हा अभ्यासक्रम एकूण तीन टप्प्यांत तयार करण्यात आला आहे. तिसरी – चौथी, पाचवी – सातवी आणि आठवी – नववी या वर्गांतील मुलांना नागरी जाणिवांबाबत शिक्षण दिले जाणार आहे. समाजात नागरी जाणिवांचा अभाव दिसून येत आहे. समाजातील युवा पिढीमध्ये नागरी जाणीव निर्माण करण्याच्या उद्देशाने हा खास अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे, असेही पाटणेकर यांनी सांगितले.
प्रायोगिक तत्त्वावर निवडक सरकारी प्राथमिक, माध्यमिक विद्यालयांबरोबर काही अनुदानप्राप्त विद्यालयांतून हा अभ्यासक्रम सुरू केला जाणार आहे. हा अभ्यासक्रम शिकविण्यासाठी शिक्षकांना खास प्रशिक्षण दिले जाणार आहे, असेही पाटणेकर यांनी सांगितले.

योग, मूल्य शिक्षणाचे धडे
राज्यातील सर्व सरकारी प्राथमिक विद्यालयांतून योग व मूल्य शिक्षणाला सुरुवात करण्यात आली आहे. यापूर्वी काही निवडक सरकारी विद्यालयांतून योग व मूल्य शिक्षण अभ्यासक्रम शिकविला जात होता, असेही पाटणेकर यांनी सांगितले.

५३ समुपदेशकांची नियुक्ती
सरकारी विद्यालयांतील विद्यालयांच्या विविध तक्रारी, अडचणींवर तोडगा काढण्यासाठी ५३ समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे. शालेय विद्यार्थ्यांना २७ ते २८ प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. समुपदेशनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या समस्यांवर तोडगा काढला जात आहे, असेही पाटणेकर यांनी सांगितले.