नागरिकांना ऑनलाईन तात्पुरता प्रवास पास देण्याचा निर्णय

सरकारने नागरिकांना किराणा सामान, वैद्यकीय, एटीएममधून पैसे काढण्यासाठी बाजारात जाण्यासाठी दोन तास अवधीचा तात्पुरता प्रवास पास ऑन लाईऩ पद्धतीने देण्याचा निर्णय घेतला आहे.

कोविड-१९ च्या पार्श्‍वभूमीवरील लॉकआऊटमुळे नागरिकांना प्रवास करण्यास बंदी घालण्यात आलेली आहे. या लॉक आऊटच्या काळात प्रवासासाठी नागरिकांना प्रवास पास घ्यावा लागत आहे. राज्यातील ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला, दिव्यांग यांना नजरेसमोर ठेवून  ऑन लाइन पद्धतीने तात्पुरता प्रवास पासची  सोय उपलब्ध करण्यात आली आहे. या तात्पुरत्या प्रवास पाससाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जाण्याची गरज नाही.

नागरिकांनी हा तात्पुरता प्रवास पास मिळविण्यासाठी प्रथम गोवा ऑनलाईऩ या सरकारी संकेत स्थळांवर नोंदणी करण्याची गरज आहे. नागरिक आपला ईमेल, मोबाईल क्रमांक, नाव, पत्ता आदी माहिती देऊन नोंदणी करू शकतात. ही नोंदणी पूर्ण झाल्यानंतर महसूल खात्याअर्तंगत तात्पुरता प्रवास पाससाठी अर्ज केला जाऊ शकतो. या तात्पुरता प्रवास पाससाठी प्रवासाचे कारण, ठिकाण, तारीख व वेळ आदी आवश्यक माहिती दिल्यानंतर आपोआप तात्पुरता प्रवास पास मंजूर केला जाणार आहे. नागरिक हा मंजूर झालेला तात्पुरता प्रवास पास डाऊन लोड करून सोबत ठेवू  शकतो. नागरिकाने या पाससोबत छायाचित्र असलेले ओळखपत्र बाळगणे आवश्यक आहे, अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली.