नागरिकत्व दुरूस्ती विधेयक राज्यसभेत मंजूर

नागरिकत्व दुरूस्ती विधेयक राज्यसभेत मंजूर

>> विधेयकाच्या बाजूने १२५; विरोधात १०५ मते, शिवसेनेचा सभात्याग

प्रचंड विरोधानंतरही लोकसभेपाठोपाठ राज्यसभेतही नागरिकत्व दुरुस्ती विधेयक मंजूर करण्यात आले. विधेयकाच्या बाजूने १२५ मते पडली तर विधेयकाविरोधात १०५ मते पडली. दरम्यान, लोकसभेत विधेयकाच्या बाजूने मतदान करणार्‍या शिवसेनेने राज्यसभेत मतदानावेळी सभात्याग करून आपला विरोध दर्शविला. राज्यसभेतही हे विधेयक मंजूर झाल्याने देशातील सर्व राज्यांमध्ये हे विधेयक लागू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

हे नागरिकत्व देण्याचे
बिल आहे ः शहा
नागरिकत्व दुरुस्ती विधेयक हे नागरिकत्व देण्याचे बिल आहे घेण्याचे नाही असे यावेळी झालेल्या चर्चेत बोलताना गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले.
या विधेयकावर राज्यसभेत ६ तास झालेल्या चर्चेला उत्तर देताना अमित शहा यांनी सरकारने यापूर्वीही मुस्लिमांना नागरिकत्व दिल्याचे सांगितले. मोदी सरकारच्या काळात ५६६ मुस्लिमांना नागरिकत्व देण्यात आले आहे. या विधेयकात भलेही मुस्लिमांना नागरिकत्व देण्याचा उल्लेख नसेल पण म्हणून मुस्लिमांना नागरिकत्व देण्याचा मार्ग बंद होणार नाही. मुस्लिमांकडून नागरिकत्वसाठी अर्ज आल्यास त्याचा विचार केला जाईल, असं शहा यांनी राज्यसभेत स्पष्ट केले.

विधेयकावर सहा तास चर्चा
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल बुधवारी दुपारी १२ वाजता हे विधेयक राज्यसभेत मांडले. त्यावर ६ तासांहून अधिक वेळ चर्चा केल्यानंतर रात्री ८ नंतर मतदान प्रक्रिया सुरू करण्यात आली. आधी चिकित्सा समितीकडे विधेयक पाठवण्यासाठी मतदान घेण्यात आले. बहुमताने राज्यसभेने ही मागणी फेटाळून लावली. हे विधेयक समीक्षा समितीकडे पाठवण्याच्या विरोधात १२४ मते पडली तर बाजूने ९९ मते पडली. शिवसेनेने यावेळी सभात्याग केला. त्यानंतर विधेयकांवरील १४ सूचनांवर मतदान घेण्यात आले आणि बहुतेक सूचना फेटाळण्यात आल्या. नंतर विधेयकावर अंतिम मतदान घेण्यात आले. यावेळी विधेयक मंजूर करण्याच्या बाजूने १२५ मते पडली तर विरोधात १०५ मते पडली. या मतदान प्रक्रियेत एकूण २३० सदस्यांनी सहभाग घेतला. विधेयक मंजूर झाल्यानंतर राज्यसभा सभापती व्यंकय्या नायडू यांनी सभागृहाचे कामकाज तहकूब केले.

शिवेसनेवर गृहमंत्र्यांची टीका
गृहमंत्री अमित शहा यांनी सत्तेसाठी लोक कशाप्रकारे रंग बदलतात ते पाहा’ असा टोला शिवसेनेला लगावला. सोमवारी लोकसभेत शिवसेनेने नागरिकत्व विधेयकाला पाठिंबा दिला आणि आज मात्र शिवसेनेने वेगळीच भूमिका घेतली आहे. त्यामुळे एका रात्रीत हा बदल कसा झाला याचे उत्तर मलाच नव्हे तर महाराष्ट्राला शिवसेनेने द्यायला हवे, असे आव्हान शहा यांनी दिले.

कॉंग्रेसची टीका
आज भारतीय संविधानाच्या इतिहासातील काळा दिवस पाहण्यास मिळाला आहे. नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला मिळालेली मंजुरी म्हणजे कोत्या मनोवृत्तीच्या आणि धर्मांध शक्तीच्या लोकांचा विजय आहे अशी खरमरित टीका कॉंग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केली. कॉंग्रेसचे नेते आणि माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी भाजपवर टीका केली असून त्यांनी यावेळी शिवसेनेने मतदान प्रक्रियेवर बहिष्कार घातला ही चांगली बाब असल्याचे म्हटले.