नव्या ३० कोरोना रुग्णांपैकी २८ रुग्ण मांगूर हिलमधील

कोरोनाचा संसर्ग झालेले नवीन ३० रुग्ण सोमवारी सापडले असून त्यापैकी २८ जण हे मांगूर हिल येथील आहेत. तर दोघे रुग्ण हे परराज्यातून आलेले असल्याची माहिती आरोग्य सचिव नीला मोहनन यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. काल दोन कोरोना रुग्ण बरे झाले. त्यामुळे राज्यात सध्या सक्रिय असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या २६३ एवढी झाली असल्याचे त्या म्हणाल्या. सोमवारी सापडलेल्या ३० रुग्णांपूर्वी राज्यात सक्रिय असलेल्या रुग्णांची संख्या २३५ एवढी होती. त्यातील दोन रुग्ण बरे झाले. सोमवारी मिळालेल्या ३० रुग्णांची त्यात भर पडल्याने एकूण सक्रीय रुग्णांची संख्या २६३ एवढी झाली आहे, असे मोहनन यांनी स्पष्ट केले.
जे अन्य दोन रुग्ण सापडले आहेत त्यापैकी १ रुग्ण हा गुजरातहून रेल्वेने गोव्यात आला होता. तर दुसरा रुग्ण हा महाराष्ट्रातून रस्ता मार्गाने गोव्यात आला होता, असे मोहनन यांनी सांगितले.

शिरोडा आरोग्य केंद्रात ३० रुग्ण
दरम्यान, शिरोडा येथील आरोग्य केंद्रात कोविड रुग्णांसाठीचा जो वॉर्ड तयार केलेला आहे तेथे सध्या कोरोनाचे ३० रुग्ण असल्याची माहितीही मोहनन यांनी दिली. डॉ. आयरा यांच्या नेतृत्वाखालील पथक तेथे या रुग्णांवर उपचार करीत असल्याचे त्या म्हणाल्या.
एका प्रश्‍नाचे उत्तर देताना सध्या तरी राज्यात आणखी एका कोविड इस्पितळाची आवश्यकता नसल्याचे मोहनन यांनी नमूद केले.

मांगूर हिल येथील रुग्ण
२० ते ४० वयोगटातील
मांगूर हिल येथे सापडलेल्या कोरोना रुग्णांसंबंधी विचारलेल्या एका प्रश्‍नाचे उत्तर देताना तेथे सापडलेले रुग्ण हे २० ते ४० वयोगटातील असल्याची माहिती मोहनन यांनी दिली. ६० व त्यावरील वयोगटातील एकही रुग्ण तेथे सापडलेला नाही. तसेच गंभीर स्वरुपाचा आजार असलेल्या व्यक्तींचाही त्यात समावेश नसल्याचे त्या म्हणाल्या.