ब्रेकिंग न्यूज़
नव्या मांडवी पुलाचे ६६ टक्के काम पूर्ण

नव्या मांडवी पुलाचे ६६ टक्के काम पूर्ण

मांडवी नदीवरील तिसर्‍या केबल स्टेड पुलाचे ६६ टक्के बांधकाम पूर्ण झाले असून मे २०१८ पर्यत बांधकाम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या पुलाच्या बांधकामाविरोधात राष्ट्रीय हरीत लवादाकडे (एनजीटी) तक्रार करण्यात आल्यानंतर सात ते आठ महिने पुलाचे बांधकाम खोळंबल्याने जीएसआयसीडीला पन्नास ते साठ कोटी रूपयांचा फटका सोसावा लागणार आहे, अशी माहिती गोवा राज्य साधन सुविधा विकास महामंडळाचे उपाध्यक्ष सिध्दार्थ कुंकळ्येकर यांनी दिली.

या तिसर्‍या पुलाला कदंब बसस्थानकाजवळ पणजीत येण्यासाठी नवीन फाटा जोडण्यात येत असल्याने खर्चात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पुलाच्या मूळ आराखड्यात पणजीत येण्यासाठी फाट्याची सोय नव्हती. वाहन चालकांच्या सोयीसाठी पणजीत येण्यासाठी नवीन फाटा जोडण्यात येत आहे, अशी माहिती कुंकळ्येकर यांनी दिली.

तिसर्‍या मांडवी पूलाची लांबी ३.१९ किलो मीटर एवढी आहे. पुलाला पर्वरी पुंडलिकनगर जंक्शन येथून सुरूवात होते. तर मेरशी जंक्शन येथे समाप्ती होते.
या पुलाच्या बांधकामाच्या विरोधात एनजीटीकडे तक्रार करण्यात आल्याने साधारण आठ महिने पणजीच्या बाजूच्या पुलाच्या काम रेंगाळत पडले होते. पर्वरीच्या बाजूने पुलाचे बांधकाम सुरू होते. त्यामुळे सध्या पर्वरीच्या बाजूने मोठ्या प्रमाणात पुलाचे बांधकाम पूर्ण झालेले आहे. नदीच्या पात्रातील काम सुध्दा जास्त प्रमाणात मार्गी लागलेले आहे. पणजी ते मेरशी जंक्शनपर्यतच्या पुलाचे मोठ्या प्रमाणात काम मार्गी लागायचे आहे. नदीच्या पात्रात अकरा केबलच्या एका खांबाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. येत्या मे २०१८ मध्ये पुलाचे बांधकाम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट्य आहे.