नव्या महासत्तेचा उदय

नव्या महासत्तेचा उदय

– प्रशांत वेरेकर
पृथ्वीतलावरील एका देखण्या क्रीडामहोत्सवाची नेत्रदीपक तेवढीच थरारक सांगता गेल्या रविवारी झाली. फुटबॉलचे नवे जगज्जेते म्हणून थॉमस लोव यांच्या जर्मनीने त्या रात्री कीर्तीशिखर पादाक्रांत केले आणि त्याचबरोबर आपल्या देशाच्या दृष्टीने क्रांतीच घडवली. खेळांचा राजा असलेल्या फुटबॉलची ही अत्युच्च दर्जाची स्पर्धा खर्‍या अर्थाने जागतिक स्पर्धाच आहे. कारण दर चार वर्षांनी होणार्‍या विश्‍व चषक स्पर्धेची पात्रता गाठण्यासाठी पृथ्वीतलावरील अनेक देशांचे संघ सर्वस्व पणाला लावून वर्षानुवर्षे तप करत असतात. मात्र अखेरीस त्या देशांपैकी ३२ देशांचे संघ त्यासाठी पात्र ठरतात. १९९८ आधी ही संख्या याहून कमी म्हणजे २४ होती. म्हणूनच फुटबॉलच्या तुलनेत क्रिकेटच्या जागतिक स्पर्धेला विश्‍वचषक स्पर्धा का म्हणावी हा अनेकांच्या मनातील प्रश्‍न आहे. फार तर क्रिकेट वर्ल्ड कपला राष्ट्रकुल (कॉमनवेल्थ) स्पर्धा म्हणता येईल असे अनेकांचे म्हणणे आहे. असो. तूर्त आपला विषय तो नाही.
ब्राझिलमधील यंदाच्या स्पर्धेपर्यंत विश्‍व क्रमांक एकचा टेंभा मिरवणारा स्पॅनिश संघ सर्वात आधी घरी पाठवला गेला. त्यानंतर फुटबॉलजगतातील ब्राह्मण मानले जाणार्‍या पोर्तुगाल व ब्राझिल यांचीही दशा झालेली या स्पर्धेने पाहिली. मात्र केवळ विश्‍वविजेते बनण्याच्या ईर्षेनेच पहिल्या सामन्यापासून मैदानावर उतरलेल्या जर्मनीने एक नवलकथाच फुटबॉलजगतासमोर प्रदर्शित केली. मात्र या देशासाठी हे सुखासुखी, सहजतेने घडलेले नाही. त्यामागे दोन तपांची तपश्‍चर्या आहे. वेदनादायक नाझी भूतकाळ आणि त्यानंतर झालेली पूर्व आणि पश्‍चिम जर्मनी अशी फाळणी, आणि त्यानंतर झालेल्या दोन्ही देशांच्या पुनर्मीलनामुळे झालेला पुनर्जन्म अशा आगळ्या इतिहासाची पार्श्‍वभूमी ‘ब्राझिल २०१४’च्या जगज्जेत्या संघांना लाभली आहे. जागतिक राजकीय आणि आर्थिक पटलावर एक शक्ती म्हणून स्थान प्राप्त केलेल्या या संघाने एकसंध जर्मनीसाठी पहिले फुटबॉल विश्‍वविजेतेपद मिळवले आहे. या दृष्टिकोनातून या घटनेला जर्मनक्रांती मानावे लागेल.
जर्मनीच्या या देदीप्यमान यशाला क्रांती असे संबोधत असताना त्यांची ही वाटचाल अतिशय खडतर व नियोजनबद्ध कार्यक्रमांची परिणामकारक फल-निष्पत्ती आहे, हेही तितकेच महत्त्वाचे आहे. १९९० साली फ्रान्झ बेकनबॉर यांच्या प्रशिक्षकपदाखालील जर्मन संघाने आपल्या संघाला तिसर्‍यांदा जगज्जेतेपदावर आरूढ केले होते. त्यानंतर जर्मन संघाची घसरणच होत चालली होती. त्यात भर म्हणून त्यावेळचे अनुभवी खेळाडू निवृत्त झाले. त्यामुळे त्यांची जागा घेण्यासाठी प्रतिभाशाली खेळाडूंचा शोध घेऊन सर्वंकष फुटबॉल विकास कार्यक्रम राबविण्याची निकड निर्माण झाली. त्याप्रमाणे जर्मन फुटबॉल प्रशासकांनी अतिशय बुद्धिमानपणे योजनांची अंमलबजावणी केली.
यासाठी जुर्गेन क्लिन्समन या गतकालीन दिग्गज जर्मन खेळाडूने महत्त्वपूर्ण योगदान दिल्यानंतर विद्यमान संघप्रशिक्षक ज्योकिम लोव यांनी एका तपाहून अधिक काळ तातत्यपूर्ण मेहनत घेतली. त्यांच्या प्रबळ व दुर्दम्य इच्छाशक्तीच्या रूपात या संघाला यशाची गोड फळे ब्राझिल वर्ल्ड कपमध्ये चाखावयास मिळाली आहेत. प्रसारमाध्यमे व फुटबॉलपंडितांनी ब्राझिल वर्ल्डकपआधी आपापल्या परीने विविध अंदाज, भाकिते वर्तवली होती. त्यांपैकी कोणी अभावानेच जर्मनीच्या यशाबाबत अंदाज वर्तवला होता. मात्र जर्मन संघ ब्राझिलमध्ये उतरला होता तो विश्‍वचषक आपल्या देशात नेण्याची महत्त्वाकांक्षा उराशी बाळगूनच हेही आता स्पष्ट झाले आहे. जर्मनी २०१४ चे वर्ल्डकप विजेते म्हणून टपाल तिकिटे आधीच छापण्यात आली होती. याचा गौप्यस्फोट आता झाला असल्याने ही बाब स्पष्ट झाली आहे.
ब्राझिल, अर्जेंटिनापाठोपाठ वर्ल्ड कपचा दावेदार असलेल्या रोनाल्डोच्या पोर्तुगीज संघाला ४-० असे पाणी पाजलेल्या जर्मनीला साखळी फेरीत घानाने बरोबरीत रोखले होते; मात्र त्यानंतर दमदार फ्रान्सवर मात केल्यानंतर जर्मनीच्या शास्त्रशुद्ध योजनांची झलक पाहायला मिळाल्याने त्यांची वाटचाल कोणत्या दिशेने आहे व त्यांचे लक्ष्य काय आहे याची कल्पना फुटबॉलतज्ज्ञांना आली होती. त्यानंतर उपांत्य लढतीत जर्मनीने ब्राझिलला ज्या पद्धतीने नामोहरम केले त्यावरून बहुतेक तज्ज्ञांनी जर्मनीने अंतिम लढतीची अर्धी लढाई जिंकल्याचे अनुमान काढले होते. जर्मन संघाच्या यावेळच्या कामगिरीला अनेक कंगोरे आहेत. बॉल पझेशन, चेंडू जास्त वेळ स्वतःशी न ठेवता परिस्थितीनुरूप शॉर्ट व लॉंग पासेस, प्रतिस्पर्धी संघाच्या शैलीचा शास्त्रशुद्ध अभ्यास व त्यानुरूप डावपेच आणि प्रतिस्पर्धी संघाच्या शैलीनुसार आपल्या शैलीत बदल करणे अशा गोष्टींचा आवर्जून उल्लेख करावा लागेल.
दक्षिण अमेरिकी खंडात गेली अनेक वर्षे या खंडातील देशांव्यतिरिक्त युरोपीयन देशांचे वर्चस्व कधीच नव्हते. त्यामुळेही बहुतेकांची पसंती यंदा ब्राझिल, अर्जेंटिना यांना होती. ब्राझिलला तर त्यांच्या भूमीत गेल्या ३८ वर्षांपासून कोणीच हरवू शकले नव्हते; मात्र हा महापराक्रम जर्मनीने केल्यामुळे त्यादृष्टिनेही या संघाची ही क्रांतिकारक वाटचाल ठरली आहे. यापुढील काही वर्षे तरी जर्मनीचीच अधिसत्ता फुटबॉल जगतावर चालू राहणार आहे. कारण ब्राझिल, पोर्तुगाल, स्पेन हे दिग्गज यावेळी भुईसपाट झाले आहेत. त्यांना पुन्हा उभारी घेण्यास अवधी लागणार आहे.
कोणाही एका खेळाडूवर विसंबून न राहण्याचे जर्मनीचे धोरणही निर्णायक सिद्ध झाले आहे. याउलट अंतिम फेरीत धडकण्यात यशस्वी ठरलेल्या अर्जेंटिनाची स्थिती होती. प्रत्येक सामन्यात कर्णधार लिओनेल मेस्सीवरच हा संघ भिस्त ठेवून राहिला. याच वेळी एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की मेस्सीच्या ताकदीवरच अर्जेंटिना वर्ल्डकपच्या नजीक पोचला होता. आता अंतिम लढतीत डिमारिया असता तर मेस्सी एकाकी पडला नसता. तथापि, शेवटी या खेळात जर-तर या शब्दांना तसा अर्थ नसतो. कारण अंतिम लढतीत अर्जेंटिनालाही काही सुवर्णसंधी मिळाल्या होत्या, परंतु त्यांच्या खेळाडूंना यश आले नाही. खुद्द त्यांचा मसिहा मेस्सीसुद्धा त्याला अपवाद ठरला नाही. प्रचंड दबावाखाली त्याच्या खेळावर परिणाम झाला हेही तेवढेच खरे. याउलट ब्राझिलच्या नेमारचा खेळ दबावाखाली असूनही बहरला होता. (दुखापतग्रस्त झाल्यामुळे त्याला मैदानाबाहेर बसावे लागले ही बाब वेगळी.) कोलंबियाच्या जेम्स रॉड्रिग्स याने पेले, मेस्सी, माराडोना यांच्याप्रमाणेच आपल्या खेळात सुपरस्टार बनण्याची सुप्त ताकद असल्याचे या स्पर्धेत ठळकपणे दाखवून दिले.
यंदाच्या या स्पर्धेचे आणखी एक ठळक वैशिष्ट्य ठरले ते म्हणजे, काही गोलरक्षकांनी बजावलेली नेत्रदीपक कामगिरी! अर्जेंटिनाचा रोमेरो, मेक्सिकोचा गिलमर ओचोआ, कॉस्तारिकाचा केलर नावस, अमेरिकेचा टिम हॉवर्ड, जर्मनीचा मान्युएल न्युअर यांची नावे या अनुषंगाने घेता येतील. ब्राझिल वर्ल्डकपमधील बहुतेक सामने रोमहर्षक ठरले. अनोखी शैली व सतत चमकदार खेळ यांची मेजवानीच कोट्यवधी फुटबॉलशौकिनांना लाभली. या स्पर्धेत मोठ्या संख्येने गोलांची नोंद झाली. फ्रान्समधील १९९८ च्या स्पर्धेप्रमाणेच यावेळी तब्बल १७१ गोलांची नोंद झाली.
या स्पर्धेतील एकूण ६४ सामन्यांपैकी २९ सामन्यांचा निकाल केवळ एका गोलाच्या फरकाने लागला. १३ सामने बरोबरीत राहिले. बादफेरीतील आठ सामने जादा वेळेपर्यंत लांबले.
एवढ्या सार्‍या रामायणानंतर एक बाब आवर्जून मान्य करावी लागेल ती म्हणजे, जर्मनीच्या अतुलनीय कामगिरीत ५४ वर्षीय प्रशिक्षक ज्योकिम लोव यांचा सिंहाचा वाटा आहे. किंबहुना ‘विजयाचे शिल्पकार’ अशा शब्दांत त्यांचे वर्णन करावे लागेल. २००४ साली ते क्लिन्समन यांचे साहाय्यक होते. त्यानंतर २००६ साली जर्मनीचे मुख्य प्रशिक्षक झाले. त्यानंतरच्या दशकभरातील बहुतेक प्रमुख स्पर्धांमध्ये जर्मन संघाने किमान उपांत्य फेरी गाठली. त्यांच्या नेतृत्वाखालील जर्मन संघाने २००८ च्या वर्ल्ड कपमध्ये अंतिम फेरी गाठली होती; मात्र स्पेनकडून पराभूत झाल्याने त्यावेळी त्यांची स्वप्नपूर्ती अधुरी राहिली. २०१० च्या द. आफ्रिकेतील वर्ल्डकपमध्ये नवोदित खेळाडूंचा भरणा असलेल्या त्यांच्या संघाने अर्जेंटिनासह ऑस्ट्रेलिया, इंग्लंड यांना पाणी पाजले होते. मात्र ब्राझिलच्या रिओ द जानेरोमधील मार्काना स्टेडियमवरील गेल्या रविवारच्या लढतीसाठी लोव यांनी काही गोष्टी राखून ठेवल्या होत्या. त्यासाठी बरीच गणिते त्यांनी सोडवली होती. पूर्ण वेळेच्या खेळात त्वेष व वेगवान आक्रमणे करून शक्ती खर्च न करता ती संभाव्य अतिरिक्त वेळेच्या खेळासाठी राखीव ठेवली. खेळाडूंमधील आत्मविश्‍वासाला त्यांनी सतत रसद पुरविली. निर्णायक गोल करणारा मारियो गॉएत्झ हे त्याचे जिवंत उदाहरण ठरले. मिळालेल्या संधीचे गोएत्झने सोने केल्यामुळेच जर्मनी संघ क्रांती घडवू शकला.

Leave a Reply