ब्रेकिंग न्यूज़

नवी सुरूवात

घटनेच्या ३७० कलमाखालील विशेषाधिकार काढून घेतलेल्या काश्मीरच्या पुनर्निर्माणासाठीचा संकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरूवारी रात्री दूरदर्शनवरून केलेल्या संबोधनात प्रकट केला. घटनेचे ३७० वे कलम रद्द केले, आमचे राज्य दुभंगले, आमचे संविधान काढले गेले, ध्वज काढला गेला, आमच्या जमिनींना असलेले संरक्षण नाहीसे झाले, आमचा राज्याचा दर्जा गेला, आमचे जणू सर्वस्व हिरावले गेले अशी भावना बनलेल्या काश्मिरी जनतेला विश्वास देण्यासाठी अशा प्रकारचे संबोधन अत्यावश्यक होते. एका नव्या वळणावर असलेल्या काश्मीरला हा बदल तुमच्या भल्यासाठीच आहे हे सांगणे गरजेचे होते. आधी अमित शहांनी आणि नंतर मोदींनी काश्मिरी जनतेला भारत सरकारवर विश्वास ठेवाल तर सर्वतोपरी उत्कर्ष साधाल हाच संदेश दिलेला आहे. ३७० कलमाने आपल्याला असा कोणता फायदा मिळवून दिला होता? उलट ते कलम हा काश्मीरच्या विकासातील अडसर होता. त्याने फुटिरतावाद, दहशतवाद, वशिलेबाजी आणि भ्रष्टाचारच दिला असे मोदींनी या भाषणात ठणकावून सांगितले आहे. या नकारात्मक भूतकाळाच्या पा र्श्वभूमीवर एक चांगले वर्तमान आणि उज्ज्वल भविष्य देण्याची ग्वाहीही मोदींनी त्यांना दिलेली आहे. या उत्कर्षाचा रोडमॅपही त्यांनी सांगितला. सर्वप्रथम, ३७० वे कलम हटवले गेल्याने उर्वरित भारतातील सर्व कायदेकानून जम्मू काश्मीर व लडाखला लागू होतील. सरकारी कर्मचारी, लष्कर, पोलीस या सर्वांना उर्वरित भारतात असलेले वेतन व भत्तेविषयक सर्व लाभ मिळतील, शिक्षण हक्क कायदा, ऍट्रोसिटी कायदा, किमान वेतन कायदा, सफाई कर्मचारी कायदा अशा सर्व कायद्यांचा लाभ मिळेल, शरणार्थींना मताधिकार मिळेल, मुलींना संपत्तीचा हक्क मिळेल, निवडणुकांमध्ये अनुसूचित जाती जमातींचे आरक्षण लागू होईल, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या मिळतील, क्रीडासुविधा निर्माण होतील हे सगळे उज्ज्वल चित्र या भाषणातून मोदींनी काश्मिरी जनतेपुढे उभे केले. त्याच जोडीने काश्मीरच्या उत्कर्षाचे प्रमुख साधन असलेले पर्यटन, चित्रीकरण, हस्तकला, फळफळावळ, वनौषधी, यांच्या विकासाचे प्रयत्न करण्याचीही ग्वाही त्यांनी दिली आहे. काश्मिरींसाठी लष्कर, पोलीस व सरकारी नोकरभरती, सार्वजनिक आस्थापने, खासगी क्षेत्रातूनही रोजगार संधी मिळवून देण्याची ग्वाहीही मोदींनी दिली आहे. राज्याची महसुली तूट भरून देऊ, रखडलेली गट विकास मंडळे स्थापन करू, सुशासन, पारदर्शकता देऊ आदी सांगतानाच सर्वांत महत्त्वाची गोष्ट मोदींनी सांगितली आहे ती म्हणजे तेथील लोकशाही लवकरात लवकर पुनर्स्थापित करण्याची. पंचायत निवडणुकांतील यश लक्षात घेऊन परिस्थिती शांत होताच लवकरात लवकर विधानसभा निवडणुका घेऊन तुमच्याच लोकप्रतिनिधींना तुमचे प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली जाईल हे मोदींनी आवर्जून सांगितले आहे. जम्मू काश्मीरची जनता फुटिरतावादावर मात करून नव्या आशांसहित पुढे येईल हा जो विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे, त्या हाकेला ‘ओ’ देणे हे खरे तर काश्मिरी जनतेचे कर्तव्य आहे. ते त्यांच्याच भल्याचे आहे. ‘तुमच्या भागातील विकासाची कमान हाती घ्या’ असे मोदी म्हणाले, परंतु हे घडायचे असेल, जनता पुढे यायची असेल तर आधी भयमुक्त वातावरण खोर्‍यामध्ये निर्माण झाले पाहिजे. शेवटी प्रत्येकाला आपला जीव प्यारा आहे. दहशतवादाचा आणि फुटिरतावादाचा निःपात कठोरपणे झाल्याखेरीज जनता पुढे येण्यास धजावणार नाही. खरे म्हणजे हे वातावरण निर्माण करण्यासाठी योगदान देणे हे सर्व राजकीय पक्षांचे कर्तव्य आहे, परंतु काश्मीरमधील राजकीय दुकाने दुटप्पीपणावरच तर चालत असतात. अब्दुल्ला आणि मुफ्ती परिवाराची पारंपरिक मिरासदारी मोडून नवे युवक जेव्हा राष्ट्रीय प्रवाहात सामील होण्यास पुढे येतील, तेव्हाच काश्मीरचा चेहरामोहरा बदलू लागेल. तो विश्वास त्यांना मिळायला हवा. सतत दहशतीच्या आणि लष्कराच्या दबावाखाली जीवन कंठावे लागत असलेल्या तरुणाईमध्ये तो आपलेपणाचा विश्वास देणे ही या घडीची गरज आहे. पाकिस्तान हे मीलन उधळून लावण्याचा पुरेपूर प्रयत्न करील, परंतु त्याला चार हात दूर ठेवून भारत आणि त्याचे अभिन्न अंग असलेला काश्मीर यांचे मनोमीलन घडवण्याच्या प्रयत्नांना वेग देण्याची गरज आहे. त्यासाठी सरकारी पातळीवरच नव्हे, तर अगदी सामाजिक पातळीवरही आदानप्रदान वाढावे लागेल. तुम्ही – आम्ही वेगळे नाही आणि तुमच्या सुखदुःखाशी आम्ही समरस आहोत हा विश्वास जेव्हा काश्मिरी जनतेला मिळेल, तेव्हाच राष्ट्रीय प्रवाहामध्ये ते खुल्या दिलाने सामील होण्यास पुढे येतील! मध्यंतरी काही माथेफिरूंनी काश्मिरी विक्रेत्यांवर हल्ले चढवले. काश्मिरी विद्यार्थ्यांना लक्ष्य केले गेले. अशा गोष्टी परिस्थितीचे बदलू पाहणारे चक्र पुन्हा कैक योजने मागे सारत असतात. जो विश्वास हळूहळू उत्पन्न होत असतो, त्याला अशा वेळी तडा जातो आणि याचाच फायदा काश्मीरमधील फुटिरतावादी शक्ती, देशद्रोही शक्ती आणि संधिसाधू दुटप्पी राजकारणी उठवत असतात. काश्मीरला एकरूप करायचे असेल तर हे भान संपूर्ण देशाने राखणेही तितकेच जरूरी आहे.