नवा किनारी व्यवस्थापन आराखडा लोकांच्या सूचना विचारात घेऊनच

>> पर्यावरणमंत्री काब्राल यांची विधानसभेत ग्वाही

गोव्यातील जनतेचे हित लक्षात घेऊन सरकारने राज्यातील किनारी विभाग व्यवस्थापन आराखडा तयार करण्याचा निर्णय घेतलेला असून त्यासाठी लोकांच्या सूचना विचारात घेतल्या जाणार आहेत. तसेच १९९१ वर्षी किनारपट्टीवर जे-जे काय होते त्याची सीआरझेडला माहिती मिळावी यासाठी १९९१ चा नकाशा तयार करणार आहोत. त्यासाठी १९९१ ची सर्व माहिती गोळा करण्याचे काम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती पर्यावरणमंत्री नीलेश काब्राल यांनी काल विधानसभेत दिली.

प्रश्‍नोत्तराच्या तासाला आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स, इजिदोर फर्नांडिस, आंतोनियो फर्नांडिस, आन्तान्सियो मोन्सेर्रात, नीळकंठ हळर्णकर व क्लाफासियो डायस यांनी सीआरझेडसंबंधी विचारलेल्या प्रश्‍नाचे उत्तर देताना त्यांनी वरील माहिती दिली.

काब्राल म्हणाले, सीआरझेडसंबंधीचा गोव्याचा नकाशा हा बरोबर नाही. याविषयी पर्यावरणमंत्री या नात्याने आपण सीआरझेडला कळवले आहे. याप्रश्‍नी आपण राज्यातील लोकांबरोबर असून या नकाशात घरे दाखवण्यात येणार नसल्याचे काब्राल यांनी सांगितले. नकाशामध्ये भरती रेषा, त्सुनामीसारखी आपत्ती आल्यास पाणी कुठेपर्यंत जाऊ शकते, धोक्याची रेषा आदी गोष्टी प्रामुख्याने दाखवाव्या लागतील याचा काब्राल यांनी काल पुनरुच्चार केला.

लोकांना हवा तसाच आराखडा आम्ही करणार असून त्यासाठी गरज भासल्यास आणखी ४ कोटी रु. खर्च करायचीही तयारी आहे, असे काब्राल यांनी यावेळी स्पष्ट केले. कुठे-कुठे वाळूच्या टेकड्या आहेत, खारफुटीची झाडे आहेत त्याचे आम्ही ‘ड्रोन’चा वापर करून छायाचित्रण करणार असल्याचेही काब्राल यांनी यावेळी स्पष्ट केले.

चर्चिल आलेमाव म्हणाले की, सीआरझेड क्षेत्रात धनिकांची मोठमोठी बांधकामे येतात. मात्र, गरिबांनी छोटीसी झोपडी जरी बांधली तरी ती मोडून टाकण्यात येते.
आराखड्याचा अभ्यास करण्यासाठी जे पॅनल तयार करण्यात आले आहे त्यावर चांगला अभ्यास असलेल्या गोमंतकीयांनाही स्थान द्या, अशी मागणी यावेळी आमदार आंतोनियो फर्नांडिस यांनी केली.