नवाज शरीफांना लष्कराचा राजीनाम्याचा सल्ला?
आक्रमक आंदोलकांनी पोलिसांनाही सोडले नाही.

नवाज शरीफांना लष्कराचा राजीनाम्याचा सल्ला?

पाकिस्तानात सरकारविरोधी आंदोलन तीव्र बनत असल्याच्या पार्श्वभूमीवर काल पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल राहील शरीफ यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना भेटून चर्चा केली. त्यांनी यावेळी सुरक्षा स्थितीचा आढावा घेतला. लष्करप्रमुखांनी पंतप्रधान शरीफ यांना राजीनाम्याचा सल्ला दिला असल्याचे सूत्रांकडून समजते.
दरम्यान, सरकार व लष्कर यांनी या वृत्ताचे खंडन केले.आंदोलकांच्या मागणीनुसार पंतप्रधान शरीफ यांनी तीन महिन्यांसाठी राजीनामा द्यावा व स्वतंत्र आयोगाद्वारे गेल्या वर्षीच्या निवडणुकीत घोळाची चौकशी होऊ द्यावी, अशी सूचना लष्कर प्रमुखांनी केल्याचे वृत्त पसरले होते.
दरम्यान, लष्कर प्रमुखांनी परवाच्या कमांडर्सच्या बैठकीतील निर्णयांची माहितीही पंतप्रधानांना दिली. देश संविधानास व संसदेच्या इच्छेस अनुसरून चालवला जाणार असल्याचे पंतप्रधानांनी स्पष्ट केले असल्याचे पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज पक्षाच्या वरिष्ठ नेत्याने सांगितले. दरम्यान, सरकारने सद्यस्थितीत बळाचा कमीत कमी वापर करून ताबडतोब राजकीय तोडगा काढावा असे सूचविले असल्याचे कळते. १९४७ मध्ये स्वातंत्र्यानंतरचा अर्ध्याहून अधिक काळ पाकिस्तान लष्करशहांच्या राजवटीत राहीले आहे. दरम्यान, आंदोलकांनी कालही उग्र निदर्शने केली. पोलीस व आंदोलक समोरासमोर भिडले. आंदोलकांनी काल सचिवालयावर धडक दिली तसेच पाकिस्तानची राष्ट्रीय वाहिनी असलेल्या पीटीव्ही कार्यालयावर मोर्चा नेला. आंदोलकांच्या हातात लाठ्या होत्या. त्यांनी पोलिसांवर तुफान दगडफेक केली व सचिवालयाची गेट तोडून आत प्रवेश केला. तर सुमारे हजारभर निदर्शकांनी पीटीव्हीच्या कार्यालयात घुसून नासधूस केली. गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराचा वापर करावा लागला. पाकिस्तानात सध्या उद्भवलेल्या राजकीय वादावर तोडग्यासाठी पुढाकार घेण्याची तयारी काल पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टाने दर्शविली आहे.
इम्रान खान, कादरी विरुद्ध दहशतवादाचा गुन्हा
पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलकांचे नेतृत्व करीत असलेले पाकिस्तान तेहरीक ए इन्साफचे अध्यक्ष इम्रान खान व पाकिस्तान आवामी तेहरीकचे धर्मगुरू ताहीर उल कादरी यांच्याविरुद्ध काल पाकिस्तान पोलिसांनी दहशतवाद विरोधी कायद्याखाली गुन्हे नोंद केले. परवा रात्री कादरी व खान समर्थकांनी बेरीकेड्‌स तोडून पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला होता.

Leave a Reply