नदीत सांडपाणी; बार्देशमध्ये ४३२ घरमालकांना नोटिसा

सांडपाणी थेट नदीन सोडल्याप्रकरणी बार्देश तालुक्यातील ४३२ घरमालकांना कारवाईच्या नोटीसा पाठविण्यात आल्या. प्रक्रिया न केलेल्या सांडपाण्याचा व्यवस्थित निचरा न करता तो नदीत सोडणार्‍या या घरांना आरोग्य केंद्राकडून कारणे दाखवा नोटीसा पाठविण्यात आल्या आहेत. संबंधितांनी या नोटीसांची गंभीर दखल घेऊन ३० दिवसांच्या आत योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. या आदेशाची दखल न घेतल्यास आरोग्य कायदा १९८५ च्या कलम ४० अन्वये वीज, पाणी तोडण्याचा इशारा नोटीसीतून देण्यात आला आहे.

राष्ट्रीय हरित लवादाने दिलेल्या आदेशानुसार याबाबतचे सर्वेक्षण हाती घेण्यात आले होते. प्रक्रिया न केल्याने सांडपाणी नदीत सोडले जात असल्याने नदीच्या पाण्याचे प्रदूषण होत असल्याचे व नदीचे पाणी वापरण्या अयोग्य होत असल्याचे निदर्शनाला आणून देण्यात आले होते. तालुक्यात वाहणार्‍या मांडवी नदीच्या पात्रात तसेच शापोरा नदीत हे प्रकार जास्त प्रमाणावर घडलेले आहेत. न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर तालुक्यातील संबंधित आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकार्‍यांवर सर्वेक्षण करण्याचे काम संपविण्यात आले होते. त्यानुसार पथकांची स्थापना करण्यात आली होती. त्यात आरोग्य केंद्रातील सेनेटरी इन्स्पेक्टर, पंचायतीचे सचिव तसेच इतर काही कर्मचार्‍यांच्या मदतीने हे सर्वेक्षण हाती घेण्यात आले होते.

हळदोणा, पर्वरी, कांदोळी, कोलवाळ या तालुक्यातील आरोग्य केंद्राच्यावतीने स्वतंत्र पहाणी करण्यात आली होती. त्यावेळी काही लोकांनी सांडपाणी गटारातून नदीत तर काहींनी थेट नदीत सोडल्याचे यावेळी आढळून आले. तसेच काही नागरिकांनी शौचालयाचे सांडपाणीसुद्धा नदीत सोडल्याचे आढळून आले. उपलब्ध माहितीनुसार काही नागरिकांना सांडपाण्याचा व्यवस्थित निचरा करण्यासाठी व्यवस्था नसल्याने त्यांची घरे दाटीवाटीने असल्याने त्यांना ते गटारातून नदीत सोडणे भाग पडते. काही घरांचा वाद सुरू असल्याने योग्य व्यवस्था करणे शक्य नसल्याने त्यातून त्यांना मार्ग काढीत निसरा करणे भाग पडले.