ब्रेकिंग न्यूज़

नदाल अंतिम फेरीत

लाल मातीवरील निष्णांत खेळाडू राफेल नदाल याने फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या उपांत्य फेरीत काल शुक्रवारी स्वित्झर्लंडचा दिग्गज खेळाडू रॉजर फेडरर याला ६-३, ६-४, ६-२ असे सरळ सेटमध्ये पराजित करत अंतिम फेरीत प्रवेश केला. फ्रेंच ओपनमधील नदालचा हा सलग २२वा विजय होता. तसेच ग्रँडस्लॅम स्पर्धेत फेडररचा सलग तीन सेटमध्ये पराभव करण्याची नदालची ही तिसरी वेळ आहे. २००८ सालच्या फ्रेंच ओपनमध्ये नदालने ६-१, ६-३, ६-० असे फेडररला नमविले होते. यानंतर २०१४ सालच्या ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये फेडररला ७-६, ६-३, ६-३ असा धक्का दिला होता. काल नदालने फेडररवरील आपल्या २४व्या विजयाची नोंद केली. तर फेडररला नदालवर केवळ १५ वेळा विजय मिळविणे शक्य झाले आहे. काल संपूर्ण सामन्यात रॉजर फेडरर आपल्या नेहमीच्या लयीत दिसलाच नाही. नदालसाठी हा सामना बहुतांश प्रमाणात एकतर्फी ठरला. फेडरर २०१५ सालानंतर फ्रेंच ओपनमध्ये व २०१६ सालानंतर क्ले कोर्टवर प्रथमच खेळत होता, त्यामुळे जगभरातील फेडररच्या चाहत्यांना फेडररकडून अनपेक्षित निकालाची अपेक्षा होती. मात्र त्यांच्या पदरी निराशाच पडली. फ्रेंच ओपन स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करण्याची नदालची ही बारावी वेळ ठरली आहे.

जोकोविच- थिम सामना स्थगित
अव्वल मानांकित नोवाक जोकोविच व चौथ्या मानांकित डॉमनिक थिम यांच्यातील सामना पावसामुळे अर्ध्यावरच थांबविण्यात आला. उर्वरित सामना आज शनिवारी खेळविण्यात येणार आहे. सामना थांबला त्यावेळी थिम ६-२, ३-६, ३-१ असा आघाडीवर होता.

बार्टी- वोंदरुसोवा जेतेपदासाठी झुंजणार
ऍश्‍ले बार्टी व मार्केटा वोंदरुसोवा यांच्यात आज शनिवारी फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या महिला एकेरीचा अंतिम सामना खेळविला जाणार आहे. बार्टीने एक सेट व ०-३ अशा पिछाडीनंतर जोरदार मुसंडी मारताना १७ वर्षीय अमांडा अनिसिमोवा हिचा उपांत्य फेरीत ६-७ (४-७), ६-३, ६-३ असा पराभव करत प्रथमच ग्रँडस्लॅम स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. विद्यमान विजेत्या सिमोना हालेपला धक्का दिलेल्या अनिसिमोवाने बार्टीविरुद्ध पहिल्या सेटमध्ये ०-५ अशा पिछाडीनंतर जोरदार खेळ दाखवत सेट आपल्या नावे केला. यानंतर दुसर्‍या सेटमध्ये ३-० अशी आघाडी घेत विजयाच्या दिशेने ती मार्गक्रमण करत होती. परंतु, यानंतर सामन्याचे पारडे बार्टीच्या बाजूने झुकले. बार्टीने आपल्या अनुभवाच्या जोरावर विजय खेचून आणत अनिसिमोवाचा कडवा प्रतिकार मोडून काढला. झेक प्रजासत्ताकची युवा खेळाडू मार्केटा वोंदरुसोवाने आपली स्वप्नवत वाटचाल कायम ठेवत दुसर्‍या उपांत्य लढतीत ब्रिटनच्या जोहाना कोंटा हिचा ७-६, ७-६ (७-२) असा पाडाव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. २००७ साली सर्बियाच्या ऍना इव्हानोविचने अंतिम फेरी गाठल्यानंतर फ्रेंच ओपनच्या अंतिम फेरीत स्थान मिळविणारी वोंदरुसोवा ही पहिली किशोरवयीन खेळाडू ठरली. तर २०१० सालची उपविजेती सामंथा स्टोसूरनंतर फ्रेंच ओपन जेतेपदाच्या लढतीत खेळणारी आठवी मानांकित बार्टी पहिली ऑस्ट्रेलियन ठरली.