ब्रेकिंग न्यूज़

नजरबंदी

भारतीय जनता पक्षाने शून्यातून भरारी घेत त्रिपुरामधील वीस वर्षांची डावी राजवट उद्ध्वस्त केल्यानंतर स्थानिक कार्यकर्त्यांकडून उन्मादाच्या भरात लेनीनचा पुतळा पाडण्यात आला आणि देशभरात पुतळे पाडण्याचे वा त्यांची नासधूस करण्याचे पेवच फुटले आहे. एकमेकांच्या विचारधारांप्रती किती पराकोटीचा दुस्वास समाजामध्ये भिनवला जात आहे याचा प्रत्ययच या घटनांतून येत आहे. निवडणुकांमध्ये जय – परायजाची पारडी वरखाली होतच असतात. एखाद्या विचारधारेची पकड असलेल्या सरकारची प्रदीर्घ राजवट उलथवून दुसर्‍या विचारधारेने ते राज्य ताब्यात घेतले म्हणजे आधीच्या राजवटीची सर्व प्रतीके उद्ध्वस्त केली पाहिजेत हा उन्माद येतो कुठून? समाजामध्ये वर्षानुवर्षे भिनवल्या गेलेल्या विखाराचीच ती परिणती असते. उत्स्फूर्ततेच्या नावाखाली या हिंसक, विद्ध्वंसक प्रवृत्तीची पाठराखण करणे गैर आहे. किमान संवैधानिक पदांवरील व्यक्तींनी तरी ते करू नये अशी अपेक्षा असते. त्रिपुरातील बेलोनियातील लेनीनचा पुतळा पाडला गेल्यानंतर त्रिपुराच्या राज्यपालांनी व्यक्त केलेली प्रतिक्रिया पाहिली तर त्यात पुतळा पाडण्याच्या त्या कृतीचे अप्रत्यक्ष समर्थनच दिसते. त्यांच्यासारख्या पदावरील व्यक्तीने अशी प्रतिक्रिया व्यक्त करावी हे आश्चर्यकारक आहे. पुतळा पाडणार्‍यांचा आततायीपणा जेवढा गैर आहे, त्याहून कितीतरी पट अधिक या राज्यपाल महोदयांनी त्याचे केलेले समर्थन गैर आहे. लेनीनचा पुतळा पाडला गेल्यानंतर ठिकठिकाणी पुतळे पाडण्याचे आणि नासधुशीचे सत्र सुरू झाले. पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत आणि उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत देशाच्या वेगवेगळ्या कोपर्‍यांमध्ये वेगवेगळ्या विचारधारांच्या मानबिंदूंची स्मारके उद्ध्वस्त करण्यात आली. श्यामाप्रसाद मुखर्जींपासून पेरियारपर्यंत आणि लेनीनपासून महात्मा गांधींपर्यंतच्या पुतळ्यांच्या या नासधुशीतून हा देश असहिष्णू बनत चालला आहे हाच संदेश जगामध्ये हेतुतः पोहोचवला गेला आहे असे दिसेल. विचारांची लढाई ही खरे तर विचारांनी लढायची असते. परंतु वैचारिक मुद्द्यांपेक्षा गुद्द्यांवर येणे सोपे असते आणि सोईचेही असते. त्यासाठी अभ्यास लागत नाही, पार्श्वभूमीचे ज्ञान लागत नाही. त्यामुळे अशा उठवळ मंडळींना विद्ध्वंसक कृत्यासाठी रान मोकळे राहते. मुळात आपल्या देशातील पुतळा संस्कृतीचाही फेरविचार करण्याची गरज या सगळ्या घटनांनी अधोरेखित केलेली आहे. मध्यंतरी आपल्या विजय सरदेसाई यांना एकाएकी जॅक सिक्वेरांचा पुळका आला आणि त्यांनी त्यांचा पुतळा विधानसभा संकुलात बसवण्याचा हट्टाग्रह सुरू केला, तेव्हा अशा प्रकारच्या दिखाऊ स्मारकांचा फोलपणा आम्ही स्पष्ट केला होता. एखाद्या व्यक्तीची स्मृती केवळ निर्जीव पुतळे उभारून जपण्याची कल्पनाच वेडगळपणाची आहे. त्या व्यक्तीची जीवनधारणा, तिचे विचार समजून उमजून घेण्यापेक्षा आणि ते आपल्या आचरणात आणण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा नुसत्या निरर्थक प्रतिमापूजनात काहीही साध्य होत नसते असे आम्ही तेव्हा म्हटले होेते. पुतळ्यांचा सोस किती विद्ध्वंसक आणि समाजामध्ये तेढ निर्माण करणारा ठरू शकतो याचे प्रत्यंतर आज देशभरातील घटना पाहताना येत आहे. डाव्यांची त्रिपुरामध्ये सत्ता येताच लेनीनचे पुतळे उभारले गेले, परंतु माणिस सरकारांच्या वीस वर्षांच्या तेथील राजवटीमध्ये लेनीनचा समतावाद कुठे प्रस्थापित झाला? १९७७ ते २००० या काळात पश्चिम बंगालात ज्योती बसूंची प्रदीर्घ सत्ता राहिली, परंतु आपल्या मार्क्सवादी विचारसरणीत सांगितल्याप्रमाणे शोषितांच्या उद्धारासाठी त्यांनी काय केले? आपल्याकडे विचारधारा नुसत्या मिरवल्या जातात. त्या मिरवण्यासाठीच वापरल्या जातात आणि समाजाला त्या गुंगीत ठेवण्यासाठी पुतळे आणि स्मारकांची व्यवस्था असते. समाजाच्या दैनंदिन जगण्याशी संबंधित विषय पडद्याआड ढकलण्यासाठी अशा प्रकारच्या भावनिक गोष्टींमध्ये जनतेला गुंतून ठेवणे हा राजकारण्यांचा नेहमीचा आवडता छंद असतो. कोणताही सर्वसामान्यांच्या जीवनमरणाचा प्रश्न उभा राहिला की तो डोळ्यांआड करण्यासाठी अशा प्रकारचे भावनिक विषय उकरून काढले जातात. मग भावभावनांचा खेळ असा काही रंगतो की मूळ विषय बाजूलाच पडून जातात. पुतळ्यांच्या सध्याच्या धामधुमीत हजारो कोटी लुटून पळून गेलेला नीरव मोदी विस्मरणात गेला की! या असल्या नजरबंदीच्या खेळांमध्ये आणि समाजाच्या ध्रुवीकरणाच्या धडपडीत आपण प्यादे बनायचे का याचा विचार प्रत्येकाने करायला हवा. पुतळे पाडल्याने एखादा विचार संपत नाही आणि पुतळा उभारल्याने एखाद्या विचारांची रुजवणही समाजामध्ये होत नाही. विचारधारा कृतीत उतरवण्यापेक्षा त्या मिरवणार्‍या आणि त्यांच्या बळावर बेमालूमपणे सत्ता उपभोगणार्‍या दांभिकांचीच आज समाजामध्ये चलती आहे.