ब्रेकिंग न्यूज़

नगरविकास मंत्र्यांना हटवा

>> आमदार कार्लुस आल्मेदा समर्थकांची मागणी

मुरगाव पालिकेच्या नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षांची निवडणूक तहकूब केल्याने नगरविकास मंत्री मिलिंद नाईक आणि वास्कोचे आमदार कार्लुस आल्मेदा यांच्यात चांगलीच जुंपली आहे. काल कार्लुस समर्थक नगरसेवकांनी आमदारांसमवेत पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्र्यांनी नगरविकास मंत्री मिलिंद नाईक यांचे मंत्रिपद काढून त्यांना उपमुख्यमंत्री करावे अशी खोचक मागणी केली.

आमदार कार्लुस आल्मेदा समर्थक नगरसेवक दीपक नाईक व नंदादीप नाईक यांनी नगरविकासमंत्र्यांवर हल्लाबोल करताना त्यांना मंत्रिपद सांभाळता येत नसल्याची टीका केली. निवडणूक तहकूब करण्यास जबाबदार असलेले मडगाव पालिका मुख्याधिकारी तथा निर्वाचन अधिकारी सिद्धिविनायक नाईक यांची पदावरून उचलबांगडी करावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

आमदार कार्लुस म्हणाले की, नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदांसाठीची निवडणूक रद्द करून सिद्धिविनायक नाईक यांनी मोठी चूक केली आहे. याबाबत त्यांच्यावर कडक कारवाई होणे आवश्यक आहे. स्वत: इस्पितळात जाऊन दाखल होणे हे त्यांचे कटकारस्थान होते. त्यामुळे ते गुन्हेगार ठरतात, अशी टीका त्यांनी केली.
नगरसेवक नंदादीप नाईक यांनी या प्रकरणाला मंत्री जबाबदार असल्याचा आरोप केला. यावेळी नगरसेवक फेड्रिक हेन्रीक्स, यतीन कामुर्लेकर उपस्थित होते.