नको ती खाज!

  •  डॉ. अनुपमा कुडचडकर

कित्येक शारीरिक आजार असलेल्या व्यक्तींनासुद्धा त्वचेवर खाज येऊ शकते. मधुमेह, थायरॉइड, कर्करोग, कावीळ. कित्येकदा खाज येणार्‍या लक्षणांमुळे त्यांच्या शारीरिक आजारांचं निदान होत असतं. मूत्रपिंडाच्या आजारातसुद्धा त्वचेवर खाज येते.

त्वचेवर खाज येणं कुणालाच आवडणार नाही. कितीही दुखलं तरी चालेल पण खाज नको… असं म्हणणारे कित्येक रूग्ण आढळतात. खाज ही लहान मुलांपासून ते वयस्कर माणसांपर्यंत कुणालाच सहन होत नसते. त्वचेला खाज येण्याची कारणे पुष्कळ असू शकतात- जसे ऍलर्जी, इन्फेक्शन, काही शारीरिक आजार, एक्झिमा, काही त्वचेचे आजार यांपैकी कोणतेही त्वचेवर येणार्‍या खाजेचे कारण बनू शकतात.
अलर्जीमुळे येणारी खाज ही त्वचेवर बाहेरून काहीतरी लागून येऊ शकते. किंवा काही गोष्टी शरीरात गेल्यामुळे येऊ शकते. त्वचेवर बाहेरून लागणार्‍या गोष्टींमध्ये – साबण, परफ्यूम, कुत्री, मांजरं, झाडं, कृत्रिम कपडे, किडे, औषधं, मलम, सौंदर्यप्रसाधन इत्यादींचा समावेश होतो. या प्रकारची ऍलर्जी, त्वचेवर ती गोष्ट ज्या ठिकाणी लागते त्या भागापासून सुरू होते. हळूहळू तो भाग खाजू लागतो, लालसर होतो, त्या भागावर सूज येते. जास्त प्रमाणात झालं तर पाण्याने भरलेले फोड उठतात. ही ऍलर्जी हळुहळू त्वचेच्या अन्य भागांवरही पसरू लागते.

कित्येक वेळा आपण ज्या गोष्टी खातो त्या गोष्टींमुळेही शरीरामध्ये ऍलर्जी होऊन ती त्वचेवर पसरू शकते. खाण्यामधल्या काही गोष्टी म्हणजे शेल-फिश, चीज, अळमी, नट्‌स आणि ड्राय फ्रूट्‌स, पपई, अननस, पेरू, संत्री, भेंडी, वांगी, अंडी अशा कित्येक प्रकारच्या जेवणामधील पदार्थांमुळेसुद्धा खाज येऊ शकते. अशा प्रकारची ऍलर्जी आयुष्यात कधीही उठू शकते.

कित्येक प्रकारचे इन्फेक्शन्स त्वचेवर खाज उठवू शकतात. त्यामध्ये फंगल इन्फेक्शनचा नंबर सर्वप्रथम लागतो. फंगल इन्फेक्शन ज्याला आपण दाद वा गजकर्ण म्हणतो. याची लागवण ज्यांना होते त्यांच्या त्वचेवर भयंकर खाज येते. एकदा का घरातल्या एका माणसाला याची बाधा झाली की मग घरातल्या बाकी व्यक्तींनाही त्याची लागवण होऊ शकते.

दुसरे इन्फेक्शन ज्यामध्ये भयंकर खाज असते ते म्हणजे खरूज. हीपण घरातल्या सगळ्या व्यक्तींना होऊ शकते. या आजारांमध्ये खाज सायंकाळी आणि रात्री जास्त वाढलेली आढळते. काही व्हायरल इन्फेक्शन्समध्येही खाज असते. केसांमध्ये झालेल्या उवांमुळेही खाज येते.

कित्येक शारीरिक आजार असलेल्या व्यक्तींनासुद्धा त्वचेवर खाज येऊ शकते. मधुमेह, थायरॉइड, कर्करोग, कावीळ. कित्येकदा खाज येणार्‍या लक्षणांमुळे त्यांच्या शारीरिक आजारांचं निदान होत असतं. मूत्रपिंडाच्या आजारातसुद्धा त्वचेवर खाज येते.
काहींना त्वचेवर एक्झिमा नावाचा त्वचेचा आजार होतो. त्यांना तर भरपूर खाज येत राहते. ऍटोपिक एक्झिमा हा लहानपणापासून होणारा आजार आहे ज्यामुळे लहान मुलं खाजवून खाजवून त्वचा ओरबाडून टाकतात. हा एक्झिमा काही वर्षं त्वचेवर अधूनमधून खाज उठवत असतो. कोरडी त्वचापण फार खाजते. हा एक्झिमा काही वर्षं त्वचेवर अधूनमधून खाज उठवत असतो. घामोळं जेव्हा त्वचेवर उठतं तेव्हापण त्वचा खाजवायला लागते.

ज्यांना ज्यांना त्वचेवर खाज उठते त्यांनी डॉक्टरांकडे जाऊन आपली त्वचा तपासून घ्यावी. काही रक्तचाचण्या करायच्या असतात, त्या करून घ्याव्या. आपल्या खाजेचं कारण शोधून काढणं जास्त महत्त्वाचं असतं. खाज थांबवण्यासाठी काही अँटीहिस्टामीन गोळ्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घेऊन खाज कमी करता येते. परंतु जोपर्यंत खाजेच्या कारणांचा शोध लागत नाही तोपर्यंत खाज चालू राहू शकते.