नंदिनी सारिपल्लीला बुद्धिबळाचे राज्य विजेेतेपद

मडगावच्या नंदिनी सारिपल्ली हिने अखिल गोवा महिला राज्य अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. रविवारी झालेल्या सहाव्या व अंतिम फेरीत तिने गुंजल चोपडेकरविरुद्धचा डाव बरोबरीत सोडविला. ५ विजय, १ बरोबरी अशी कामगिरी करत तिने ५.५ गुणांची कमाई केली. पणजीच्या तन्वी हडकोणकर तर बार्देशच्या सयुरी नाईकने यांनी प्रत्येकी ५ गुणांसह अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळविला. काणकोणच्या सान्वी नाईक गावकरने चौथा, तिसवाडीच्या गुंजल चोपडेकरने पाचवा व फोंड्याच्या नेत्रा सावईकरने सहावा क्रमांक प्राप्त केला. या त्रिकुटाचे प्रत्येकी ४.५ गुण झाले. जेनिसा सिकेरा, श्‍वेता सहकारी, दिशा वेर्णेकर (सासष्टी तालुका) व साईनी देसाई (केपे तालुका) यांनी अनुक्रमे सातवा, आठवा, नववा व दहावा क्रमांक आपल्या नावे केला. या चौकडीचे प्रत्येकी ४ गुण झाले.

बक्षीस वितरण समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून गोवा बुद्धिबळ संघटनेचे उपाध्यक्ष व सासष्टी तालुका बुद्धिबळ संघटनेचे (एसटीसीए) अध्यक्ष आशिष केणी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याव्यतिरिक्त काणकोण तालुका बुद्धिबळ संघटनेचे (सीटीसीए)अध्यक्ष डॉ. अमन प्रभुगावकर, एसटीसीएचे सचिव दामोदर जांबावलीकर, वासनी सावईकर, दालिया वेरेकर व ज्योत्स्ना सारिपल्ली आदी मान्यवर उपस्थित होते. सीटीसीएचे सचिव शरेंद्र नाईक यांनी उपस्थितांचे स्वागत केले व सूत्रसंचालन केले. स्पर्धेतील आघाडीच्या सात खेळाडूंची निवड १७ ते २५ जुलै या कालावधीत तमिळनाडू येथे होणार्‍या राष्ट्रीय महिला अजिंक्यपद स्पर्धेसाठी करण्यात आली आहे.

वैयक्तिक बक्षिसे ः ७ वर्षांखालील ः १. जेनिसा सिकेरा, २. श्रेयशी फळदेसाई, ९ वर्षांखालील ः १. साईजा देसाई, २. तानिया दा सिल्वा, ११ वर्षांखालीलः १. वरदा देसाई, २. केया फडते, १३ वर्षांखालील ः १. अवनी हेगडे, १५ वर्षांखालील ः १. चारुता शेट्ये