ब्रेकिंग न्यूज़

ध्येय ठरवण्यापूर्वी …..

 प्रा. प्रदीप मसूरकर
(मुख्याध्यापक)
कोणत्याही व्यवसायाकडे जाण्यासाठी व त्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी प्रत्येक व्यवसायासाठी विशिष्ट अशी क्षमता असल्यास व त्याचे योग्य प्रशिक्षण मिळाल्यास ती व्यक्ती जीवनात यशस्वी होऊ शकते. प्रत्येक व्यक्तीत वेगवेगळ्या क्षमता असतात पण प्रत्येकाची क्षमता ही कमी-अधिक असू शकते. योग्य क्षमता म्हणजे काय व त्याचा उपयोग भावी जीवनात योग्य व्यावसायिक क्षेत्र निवडण्यासाठी कसा होतो ते पाहू…..
राजू इयत्ता १० वीमध्ये शिकत होता. त्याच्या पालकांच्या मनात राजूला इंजिनिअर करायचे ठरले व त्या दृष्टिकोनातून ते राजूकडे पाहू लागले व इतरांना ही सांगू लागले, ‘‘बरं का, आमचा राजू इंजिनिअर होणार आहे’’.
राजूचे वडील एका मोठ्या कंपनीत मेकॅनिकल इंजिनियर होते. नंतर त्यांना बढती मिळून ते त्या कंपनीचे जनरल मॅनेजर बनले. राजूला त्यांनी चांगली शिकवणी दिली व वरचेवर त्याला म्हणायचे, ‘तू इंजिनियर व्हायचं’.
राजूला त्या क्षेत्राबद्दल काही माहिती नव्हती. राजू इ. १० वी मध्ये ६५% गुण घेऊन पास झाला. त्याला विज्ञान शाखेत प्रवेशासाठी त्याच्या वडिलांनी भरपूर पैसे खर्च करून चांगले कॉलेज निवडले व राजू बारावी झाला व त्यास जेमतेम ६०% गुण मिळाले. पण राजूला आता समजेना आपण कोणता कोर्स निवडावा. आईवडिलांनी तर जोर धरला ‘तू इंजिनियरच झाला पाहिजे’. राजूला कळेना आपणास गणितात कमी मार्क पडले. माझ्याने तो कोर्स झेपेल काय? असे त्यास वाटू लागले. त्याच्या निष्पाप मनात घालमेल सुरू झाली. तरीपण त्यांचे वडील मोठे जिद्दी. त्यांनी चौकशी करून एका शहरातील कॉलेजमध्ये भरपूर डोनेशन देऊन राजूस इंजिनियरींग कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून दिला व म्हणाले, ‘‘आता आपली जबाबदारी संपली. तुला हवे तेवढे पैसे देईन पण तू अभ्यास करून मेकॅनिकल इंजिनियर व्हावयास पाहिजे.’’
सध्या सी.ई.टी. परीक्षा आहेत. पण त्याकाळी सी.ई.टी. परीक्षा नव्हत्या. राजूने आईवडिलांच्या दबावाखाली मनात नसताना कॉलेजला जाण्यास सुरुवात केली. पहिल्या वर्षी नापास झाला. कसेबसे विषय परत घेऊन दुसर्‍या वर्षी पुन्हा दोन वेळेस नापास झाला व ४ वर्षांचा इंजिनियरीगं कोर्स पूर्ण व्हायची लक्षणे दिसेनात. तरीपण वडिलांच्या जिद्दी स्वभावामुळे कोर्स सोडताही येईना व शेवटी वयाच्या अठ्ठावीसाव्या वर्षी मेकॅनिकल इंजिनियर झाला. पण वय बरेच निघून गेले. तो सध्या एका कंपनीत कामास आहे. पण त्यात त्याला अजिबात अभिरुची नाही. आता तो वडिलांना सतत दोष देतो. आपली क्षमता नसताना मला या क्षेत्राकडे जाण्यास बळजबरी केली. आपल्या भावना, आपली आवड, आपली कुवत यांचा त्याच्या पालकांनी जरासुद्धा विचार केला नाही याचे त्यास फार वाईट वाटले व त्यामुळे या क्षेत्रात त्याला आवड नसतानाही वडिलांनी घातले म्हणून त्यांच्या वडिलांना ही प्रायश्‍चित मिळाले- ते म्हणजे राजूचे वय निघून गेले तरी त्यांनी राजूला नीट समजून घेतले नाही.
राजूसारखी अशी अनेक मुले जीवनाच्या मार्गावर योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळे, आपली क्षमता न जाणून घेतल्यामुळे इतरांचे अनुकरण करून वाट चुकतात व शेवटी भरकटत जातात. तर प्रश्‍न पडतो….
योग्य क्षमता म्हणजे काय? व त्याचा उपयोग भावी जीवनात योग्य व्यावसायिक क्षेत्र निवडण्यासाठी कसा होतो ते पाहू. साध्या भाषेत काम करण्याची कुवत असे म्हणू.
प्रत्येक व्यक्तीत वेगवेगळ्या क्षमता असतात पण प्रत्येकाची क्षमता ही कमी-अधिक असू शकते. आपल्या जीवनातील विविध क्षेत्रे निवडण्यासाठी या क्षमतेची आवश्यकता असते. उदा.- डॉक्टर होण्यासाठी काही क्षमतेची गरज असते. शिक्षक होण्यासाठी काही क्षमता आपल्या अंगी असाव्या लागतात तर अभियंता होण्यासाठी काही ठराविक क्षमता आपल्या अंगी असाव्या लागतात. मोटर मेकॅनिक, ड्रायव्हर, टेलर, पेंटर वगैरे. कोणत्याही व्यवसायाकडे जाण्यासाठी व त्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी प्रत्येक व्यवसायासाठी विशिष्ट अशी क्षमता असल्यास व त्याचे योग्य प्रशिक्षण मिळाल्यास ती व्यक्ती जीवनात यशस्वी होऊ शकते. तर कोणत्या क्षमता कोणते क्षेत्र निवडण्यात
उपयोगी ठरतात ते आम्ही पाहू.
१. बौद्धिक क्षमता – कॉग्निटिव्ह ऍबिलिटी
 ही क्षमता प्रत्येकाच्या ठिकाणी कमी-जास्त प्रमाणात असते. ही क्षमता आम्हाला कोणत्याही प्रकारचे शिक्षण घेण्यास किंवा कोर्स पूर्ण करण्यास मदत करते. ही सर्वात मूलभूत क्षमता आहे की ज्यामुळे नवीन गोष्टी, नवीन संकल्पना, ज्ञानप्राप्ती यासाठी ही क्षमता मदत करते.
आनुवंशिकरीत्या बौद्धिक क्षमता येत असते. या क्षमतेची व्याख्या काही मानसशास्त्रज्ञांनी अशा दिल्या आहेत.
‘‘बौद्धिक क्षमता ’’ ही समयोजनास मदत करते.
बिनेठ (१९०५) – ही एक अशी क्षमता आहे की आपल्या वर्तनास योग्य ध्येयाकडे नेण्यास मदत करते.
विलियम जेम्स (१९०४)- नवीन परिस्थितीशी, नवीन घटनेशी यशस्वीरीत्या समायोजन करून घेण्याची क्षमता होय.
‘‘बौद्धिक क्षमता नवीन ज्ञान अवगत करण्यास मदत करते’’- ही व्याख्या बकींग गम यांनी १९२१ मध्ये दिली. तर काही मानसशास्त्रज्ञांनी ‘ही एक सर्व बाजूंनी होणारी विचार प्रक्रिया आहे’ तर काहींनी यास ‘मानसिक शक्ती’ असे संबोधले आहे.
आम्ही ठरवले तर किंवा निश्‍चय केला तर ही क्षमता निरीक्षण करून, वाचन करून, नीट ऐकून घेऊन (श्रवण कौशल्य) व शिकलेल्या गोष्टींचे मनन करून काही समस्या स्वतः सोडवण्याचा प्रयत्न केला तर ही क्षमता आम्ही वाढवू शकतो. बौद्धिक क्षमतेस योग्य वातावरणाची जोड मिळाल्यास ध्येयप्राप्तीसाठी वेळ लागणार नाही. या क्षमतेचा उपयोग शिक्षण घेण्यासाठी, आपले व्यावसायिक क्षेत्र निवडण्यास होतो. डॉक्टर, अभियंता, शिक्षक, विज्ञान क्षेत्र निवडण्यास होतो. डॉक्टर, अभियंता, शिक्षक, विज्ञान क्षेत्र, वाणिज्य शाखा या शाखेकडे वळणार्‍या विद्यार्थ्यांना ही क्षमता उत्तम किंवा उत्कृष्ट असावी लागते, तर केलेले ज्ञान ग्रहण व त्याचे उपयोजन करण्यास मदत होते. जर ही कमी असेल तर अशा विद्यार्थ्यांकडून मोठमोठ्या अपेक्षा करणेसुद्धा चुकीचे ठरेल.
२. तर्क विचार क्षमता (रिझनिंग ऍबिलिटी) –
 एकदा बागेत काम करत असता माझ्याबरोबर एक चार वर्षाची मुलगी होती. तिला खेळत असताना अर्धवर्तुळाकृती काठी मिळाली. ती काठी घेऊन ती माझ्याकडे पळत आली व म्हणाली, ‘‘माझ्या हातात हे बघा काय आहे?’’ मी पुन्हा परत तिला प्रश्‍न केला व विचारले, ‘‘काय ते सांग पाहू’’. तिचे उत्तर ऐकून मी क्षणभर स्तब्ध झालो. तिने सांगितले, ‘‘हे बघा, माझ्या हातात ‘चंदामामा’ आहे.’’ याचाच अर्थ त्या चार वर्षाच्या मुलीने चंद्राचे योग्य निरीक्षण केले होते, हे दिसून येते. चंद्र बारीक होतो, मोठा होतो, गोल होतो हे नकळत का होईना तिने ओळखले होते. काही वेळेस चंद्राची कला अर्धवर्तुळाकृतीही दिसते. याचेही निरीक्षण केलेले दिसून येते. येथे तिच्या बौद्धिक कुवतीनुसार तिने तर्क केला व सांगितले. ‘‘हा बघा माझ्या हातात चंदामामा आहे.’’
शाळा-कॉलेजमध्ये आम्हाला वेगवेगळे विषय शिकावे लागतात. उच्च शिक्षणासाठी गेल्यावर काही विषय पालक-शिक्षकांच्या मदतीशिवाय शिकावे लागतात. कोणताही विषय शिकताना त्यामागे तर्क करावा लागतो.
इयत्ता ४थीच्या मुलांना ‘हवा’ हा विषय शिकवत एका रिकाम्या प्लॅस्टिकच्या पावडरच्या डब्याचा उपयोग व एका विद्यार्थ्यास समोर बोलावून तो डबा त्याच्या हातात देऊन निरीक्षण करण्यास सांगितले व नंतर त्यास माहिती सांगण्यास सांगितले. त्या मुलांनी दिलेली उत्तरे अशी होती….
१. हा प्लॅस्टिकचा पावडरचा रिकामा डबा आहे.
२. वरच्या बाजूस छिद्रे आहेत
३. या डब्याचा रंग पांढरा आहे.
नंतर त्या मुलास डोळे बंद करण्यास सांगितले व त्याच्या कानाकडे तो डबा जोराने दाबला. त्यातून फस् फस् असा आवाज आला व त्या मुलाने उत्तर दिले, त्यात हवा आहे. नंतर त्यास हात पुढे करावयास सांगितले व हाताकडे डबा नेऊन पुन्हा दाबला व फस् फस् असा आवाज आला व विचारले… या हवेचा आकार सांग. त्याने लगेच उत्तर दिले- हवेला आकार नाही. तू हवेबद्दल आणखी काय सांगू शकशील? त्याने सांगितले,  हवेला रंग नाही, आकार नाही, वासही नाही पण ती जाणवते. हवा सगळीकडे आहे पण दिसत नाही. आपल्या तर्काने त्याने हवेची संकल्पना स्पष्ट केली. हे झाले लहान मुलांच्या बाबतीत. पुढे-पुढे काही विषयांचे शिक्षकांशिवाय काही प्रयोग, संशोधन करावे लागते. काही समस्या सोडवाव्या लागतात. कोणत्या तत्त्वाचा वापर केला?
फायदे-तोटे, त्याचे उपयोग यांचा विचार करावा लागतो. त्यास तर्क विचार किंवा तर्क करण्याची क्षमता असे म्हणतात.
दैनंदिन जीवनातही आपण वरचेवर तर्क करीत असतो. राजकारणात कोणती पार्टी सत्तेवर येईल? कोण जास्त काम करू शकेल असे आम्ही तर्क करीत असतो. विज्ञानात तर या क्षमतेचा बराच उपयोग होतो. काही वस्तूंचे निरीक्षण, पृथःकरण करावे लागते. काही प्रयोग करून अनुमान काढावे लागतात.
ही क्षमता आम्ही दृढ निश्‍चयाने व परिश्रम घेऊन वाढवूही शकतो. उदा. वाचन करून, निरीक्षण करून, कोणतीही गोष्ट शिकत असताना का? कशासाठी? त्यातील फायदे व तोटे लक्षात घेऊन- असे घडले तर? अशा प्रकारे स्वतःस प्रश्‍न विचारून, गणितातील प्रमेये सोडवून व स्वतः समस्या सोडविण्याचा प्रयत्न करूनही तर्क-क्षमता वाढवू शकतो.
चित्र स्मृती (फिगर मेमोरी) ः लक्षात ठेवण्याची क्षमता किंवा स्मरणशक्ती असे म्हणतात.
आम्ही दैनंदिन जीवनात काही गोष्टी निरीक्षणाने, अनुभवाने शिकत असतो. तेथे भाषेची गरज नसते. काही पाहिलेल्या गोष्टी आमच्या लक्षात राहतात. अशा प्रकारच्या स्मृतीचा आम्हाला भूमिकी, वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र, शिल्पशास्त्र व अभियंता होण्यासाठी उपयोग होतो.
आम्ही काही गोष्टी वाचत असतो व त्याची कल्पना आम्ही चित्राच्या स्वरूपात केली तर ती जास्त काळ लक्षात राहते.
बर्‍याच मुलांची तक्रार असते- अभ्यास लक्षात राहात नाही. अशा मुलांनी वाचलेला भाग तो इतिहास असो किंवा कोणताही असो त्याचे डोळ्यांसमोर काल्पनिक चित्र उभे केल्यास तो भाग जास्त स्मरणात राहील.
४. अवकाशासंबंधी क्षमता (स्पॅटिकल ऍबिलिटी)-
ही क्षमता प्रत्येक व्यक्तीत कमी-जास्त प्रमाणात असते. एखादी वस्तू तिरकी ठेवली असता कशी दिसेल, उभी ठेवली असता कशी दिसेल किंवा घरातील काही वस्तू कोच, खुर्ची सरकवताना त्या दुसर्‍या जागेवर ठेवल्या असता किती जागेत राहतील व कशा दिसतील याची कल्पना करणे म्हणजेच लांबी, रुंदी व उंचीचा अंदाज होण्याची क्षमता म्हणजेच अवकाशसंबंधीची क्षमता.
ही क्षमता सगळ्यांकडे असते असे नाही. पण काही जणांची ती फार चांगली असते. या क्षमतेचा उपयोग अभियंता (सिव्हिल इंजिनिअर) होण्यासाठी, शिल्पशाखा अभियंता होण्यासाठी होतो. शेतकी विज्ञानासाठी होतो. त्याचप्रमाणे क्रीडा क्षेत्रातही होतो. अनुभवाने व निरीक्षणाने ही क्षमता वाढवू शकतो.
५. भाषिक क्षमता (व्हर्बल ऍबिलिटी)-
भाषिक क्षमता याचा उपयोग माहिती गोळा करण्यासाठी, वाचनासाठी, ऐकण्यासाठी होतो. शालेय जीवनातील यश भाषेच्या प्रभुत्वावर अवलंबून असते. ज्याची भाषा चांगली तो वकिली पेशा, शिक्षण, वाणिज्य, विज्ञान, समाजशास्त्र इ. शाखेत चांगले यश संपादन करू शकतो.
ही क्षमता आम्ही निश्‍चयाने वाढवू शकतो. वाचन करणे, नीट ऐकणे, आपल्या भावना व्यक्त करणे, चांगल्या व्यक्तीचे संभाषण ऐकून वाढवू शकतो. एखाद्या पुस्तकातील आवडलेला मुद्दा वाचून लिहून काढणे, पत्र लिहिणे, टिपण ठेवणे असा सराव करणे आवश्यक आहे.
संत रामदास स्वामींनी सांगितले आहे- ‘दिसामाजी काहीतरी लिहीत जावे. काहीतरी वाचीत जावे.’ याचाच अर्थ लिहिणे व वाचनक्रिया दररोज होणे आवश्यक आहे, तर ही क्षमता चांगली विकसित होईल.
६. सामाजिक क्षमता (सोशल ऍबिलिटी)-
जीवनात यश संपादन करावयाचे असल्यास ही क्षमता विकसित होणे आवश्यक आहे. या क्षमतेमुळे दुसर्‍या व्यक्तीस समजून घेऊ शकतो. त्याचे विचार, भावना व चेहर्‍याचे हावभाव त्या व्यक्तीच्या विशिष्ट अशा ठेवणीवरून, त्याच्या बोलण्यावरून समोरच्या व्यक्तीस जाणून घेणे व ती कला आत्मसात करणे म्हणजेच सामाजिक क्षमता.
ही क्षमता वाढवता येईल- जर वेगवेगळ्या वयोगटाच्या लोकांशी (व्यक्तींशी) संवाद साधून त्यांच्या राहणीमानाचा व विचारांचा, त्यांच्या गरजेचा विचार केल्यास व त्यामध्ये अभिरूची असल्यास आपली सामाजिक क्षमताही वाढेल व आपले व्यक्तिमत्त्व हे सामाजिक क्षमतेवर अवलंबून असते. ज्याची क्षमता जास्त त्याचा व्यक्तिमत्त्व प्रभावही जास्त असतो.
७. सांख्यिकी क्षमता (न्युमरीकल ऍबिलिटी)-
ही क्षमता दैनंदिन व्यवहारात व अभ्यासात उपयोगी ठरते. मूलभूत संख्येची कल्पना असते. प्रमाण चिन्हे, संकेत चिन्हे यांचा योग्य प्रकारे वापर करता येणे आवश्यक आहे. प्रत्येक ठिकाणी आम्ही संख्येचे खेळ कळत-नकळत करत असतो. ही क्षमता जर उत्कृष्ट असेल तर त्याचा उपयोग विज्ञान क्षेत्रात गणित व वाणिज्य विभागामध्ये व हे शिक्षण घेण्यासाठी उपयोगी ठरते. ही क्षमता अंकगणितापुरती मर्यादित नसून त्याचा विचार करण्याचे जे कौशल्य प्राप्त होते ते उच्च शिक्षण घेण्यासाठी उपयोगी ठरते.
प्रत्येक व्यक्तीस साध्या साध्या संख्येच्या क्रिया माहीत असणे गरजेचे आहे आणि या क्रियांमधील परस्पर संबंधही जाणून घेणे आवश्यक आहे.
जर आपल्याला ही क्षमता वाढवायची असेल तर संख्येवर व त्यावरील खेळांवर प्रेम केले पाहिजे. उदा. दररोजचा आपला आर्थिक व्यवहार लिहून ठेवावा, महिन्याचा खर्च लिहून ठेवावा, दिवसाच्या खर्चाची टिपणी ठेवावी. स्वतंत्रपणे गणितातील प्रश्‍न सोडवावेत.
८. सांख्यिकी स्मृती (नंबरीकल मेमरी)-
या क्षमतेत जास्त संख्या लक्षात ठेवायची क्षमता व्यक्तीमध्ये असते. एकत्र संज्ञा असलेली माहिती लक्षात ठेवणे, संख्येचा तक्ता लक्षात ठेवणे आणि मोठमोठ्या संख्या लक्षात ठेवणार्‍याची एकाग्रता वाढते. याचा उपयोग विज्ञान, गणित, शालेय जीवनामध्ये काही जण काही विशिष्ट पद्धत वापरून मोठमोठ्या संख्या लक्षात ठेवतात. आर.टी.ओ. होण्यासाठी टेलिफोन ऑपरेटर होण्यासाठी व्यवहारामध्ये ही क्षमता चांगली असणे आवश्यक आहे.
९. यांत्रिक तर्क क्षमता-
काही व्यक्तींमध्ये ही क्षमता दिसून येते. एखादे गाडीचे चाक काढण्यासाठी बोल्ट असतात ते कोणत्या दिशेने फिरवावे म्हणजे आम्हास चाक काढता येईल. काही वस्तूंची रचना केल्यावर एक विशिष्ट यंत्र बनते व ते आम्हास साधे यंत्र किंवा संयुक्त यंत्र म्हणून कामास येते.
अशा प्रकारची तर्कक्षमता असलेल्या व्यक्तीमध्ये यांत्रिक तर्कक्षमता असते. काही लहान मुलांमध्ये ही लहानपणी दिसून येते. मी पाहिलेले उदा. – एक नऊ महिन्याचे मूल उताणे झोपले होते. पाठ जमिनीवर टेकली होती व तिच्या हातात रिकामी दुधाची बाटली व त्या बाटलीचे झाकण होते. ते मूल त्या बाटलीस झाकण लावण्याचा प्रयत्न करीत होते.
पाच वर्षांनंतर याच मुलीचे निरीक्षण केल्यावर निरनिराळे मॉडेल्स करणे, रचना करणे, स्क्रू ड्रायव्हर घेऊन स्क्रू काढण्याचा प्रयत्न करणे दिसून आले.
हीच मुलगी आता १० वर्षांची असून घरातील लहानसहान वस्तू रिपेरिंग करणे किंवा वडिलांना त्यासंबंधात आपला अभिप्राय देणे करीत आहे. त्याशिवाय तिच्या अंगी सृजनशीलतेचेही गुण दिसून येतात.
कपडा कापून लहान फ्रॉक तयार करणे, त्यास ठिगळ्या चिकटवून नवीन डिझाईन करणे, त्यास कागदाच्या घड्या घालून वेगवेगळी प्रतिकृती करणे, प्रत्येक गोष्ट कुतूहलपूर्वक न्याहाळणे व का, कसे होते? असे असले असते तर बरे झाले असते… अशा प्रकारची प्रश्‍नावली तिची दर दिवशी असते. एका समस्येला अनेक पर्याय देण्याची तिची विलक्षण क्षमता दिसून येते. यावरून यांत्रिक क्षमता व सृजनशीलता या दोन्ही क्षमता त्या व्यक्तीच्या ठिकाणी आढळतात तर काही ठिकाणी यांत्रिक क्षमता आढळते.
काही मोटर मॅकेनिक जास्त शिकलेले नाहीत, पण दोन-तीन वेळा एस.एस.सी.ला बसून कसेबसे पास झालेले दिसून येतात. पण त्यांच्याकडे यांत्रिक तर्कक्षमता दिसून येते. ते चांगले मेकॅनिक बनले आहेत. आवाजावरुन गाडीतील चूक शोधतात व दुरुस्तही करतात. अशा प्रकारचे मेकॅनिक किंबहुना शालेय शिक्षण न घेतलेलेही आहेत. आम्हास ही क्षमता वाढवायची असल्यास योग्य निरीक्षण, काही गोष्टी करुन पाहणे, सराव करणे, प्रयोग करुन अनुमान काढणे, अनुकरणाने ही क्षमता वाढवता येते.
अभिरुची कल ः
काही जणांमध्ये विशिष्ट शिक्षण क्षेत्रासाठी योग्य क्षमता असतात पण त्यात जर अभिरुची नसेल तर त्या क्षेत्रात ते प्रगती करु शकत नाहीत. तर काही अभिरुची कल
खाली दिलेले आहेत.
१. ज्ञानात्मक कल (नॉलेज ओरिएंटेशन)-
या प्रकारची अभिरुची जर असेल तर उच्च शिक्षण घेण्यासाठी योग्य ठरते. शिक्षक होण्यासाठी, प्रकल्प तयार करण्यासाठी, वेगवेगळी रचना कार्य (डिझाईन्स) तयार करण्यासाठी याचा उपयोग होतो. सर्व क्षेत्रात ही उपयोगी ठरते. पण ज्ञान घेण्याची किंवा नवीन शिकण्याची अभिरुची असेल तर ते होऊ शकते. वाचन, लिखाण, श्रवण, मनन, माहिती घेऊन हा कल वाढवू शकतो.
२. प्रायोगिक कल – (प्रॅक्टिकल ओरिएन्टेशन)
व्यवहारात आपण  कितीतरी गोष्टी करीत असतो. पुस्तकी ज्ञानापेक्षा काही गोष्टी करुन पाहताना अनुभूती जास्त मिळते व त्यामधील बारकावे, चुका, फायदे, तोटे कळतात. आम्ही जर कोणतेही काम घरातील असो वा बाहेरील असो किंवा बाजारातील असो… ते जर योग्य निरीक्षण देऊन केल्यास त्याचा योग्य फायदा व अनुभव आपल्यास मिळतो. पण आळस झटकून काम करण्याची आवड पाहिजे तर यश मिळू शकते.
३. कलात्मक अभिरुची – (आर्टिस्टिक ओरिएन्टेशन)
काहींना ही अभिरुची जात्याच (आनुवंशिकरित्या) आलेली असते. जे शिल्पकार, सृजनशीलता असलेल्या व्यक्ती किंवा शिल्पअभियंता (आर्किटेक्ट) वगैरे व्यक्तींना अशा क्षमता असतात.
४. जिद्द – (पॉवर ओरिएन्टेशन)
कोणतेही काम करण्याचा जिद्द हवी. मानसिकदृष्ट्या व्यक्ती जर चांगली सुदृढ असेल तर कोणतीही गोष्ट असाध्य नाही. काही संकल्प करणे आवश्यक आहेत. ‘‘मी ही गोष्ट करणारच’’ नियोजन, दृढनिश्‍चय व चिकाटी असेल तर ध्येय गाठण्यास मदत होते. काही व्यक्तींमध्ये क्षमता असताना पण मानसिक शक्ती कमी पडते. मग त्यांच्या आवडीचे परीक्षेत्र मिळाले तरी प्रगती होत नाही.
विश्‍वक्रिकेटचे उदाहरण बघा, आमच्या देशात खेळाडू उच्च दर्जाचे असूनसुद्धा आम्हाला वांग्लादेश बरोबरील सामन्यात हार खावी लागली. काही वेळेस मानसिक शक्ती जबरदस्त काम करते. त्यासाठी योग्य गुरुउपासना केल्यास किंवा नियमित प्रार्थना केल्यास मनाची एकाग्रता टिकून राहून इच्छाशक्ती वाढते.
५. विश्‍वास कल – फेथ ओरिएन्टेशन
काही बाबतीत आम्ही आमच्या पलीकडील शक्तीवर विश्‍वास, श्रद्धा ठेवतो. देव, धर्म, चालीरीती, मूल्ये यावर विश्‍वास ठेवणे काही प्रमाणात आवश्यक आहे.
अभिक्षमता ः
प्रत्येक व्यवसाय निवडताना आपल्या अंगी काही क्षमता असाव्या लागतात. त्याबरोबर जर अभिरुची असेल तर दुधात साखर घातल्याप्रमाणे होईल. त्याचा परिणाम व्यक्तित्व विकास घडवण्यास मदत होईल.
एखाद्या प्रशिक्षणाचा फायदा होत असेल तर त्या व्यक्तीत ती अभिक्षमता किंवा ऍप्टिट्यूड आहे असे म्हणतात. उदा. सुनिताचा आवाज गोड आहे. अनुवंशिकरित्या ही देणगी आहे. तिने जर संगिताचे किंवा गायनाचे प्रशिक्षण घेतले तर या प्रशिक्षणाचा तिला फायदा होऊन ती चांगली गायिका होऊ शकेल. म्हणजेच तिच्या अंगी ती अभिक्षमता आहे असे म्हणता येईल.
राजूचे गणित व विज्ञान हे विषय चांगले आहेत. त्याने विज्ञान शाखेत प्रवेश केला तर त्याचा त्याला फायदा होईल. म्हणजेच विज्ञान क्षेत्राची अभिक्षमता त्याच्या अंगी आहे.
जर रामूने कला क्षेत्रात प्रवेश घेतला. तेथे भरपूर क्षमता पाहिजे होती, पण राजूची भाषाविषयक ज्ञानक्षमता कमी आवडीची, मग तो त्या क्षेत्रात प्रगती करू शकत नाही व त्यासाठी लागणारी अभिक्षमता राजूच्या अंगी नाही.
अभिक्षमता म्हणजे त्या व्यक्तीच्या अंगी योग्य क्षमता असते व त्याप्रकारचे प्रशिक्षण मिळाल्यास त्यामध्ये त्याची प्रगती होऊ शकते व त्याचबरोबर त्या व्यक्तीची त्यात अभिरुची असणे आवश्यक.
अभिक्षमता असेल व अभिरुची नसेल तरीपण प्रगती होणार नाही. उदा. एका बँकेतील कारकून (क्लर्क) मला भेटली. बर्‍याच परिश्रमाने (परीक्षा देऊन) ती पास झाली होती व बँकेत तिला नोकरी मिळाली व सहजपणे मी विचारले येथे कसे वाटते?… तिने चक्क मला सांगितले, ‘‘सर, मला या नोकरीत अजिबात आवड नाही. मला शिक्षिका व्हायचे होते पण सगळेजण परीक्षा देतात म्हणून मीही दिली व मला ही नोकरी मिळाली.
येथे अभिक्षमता आहे पण अभिरुची नाही. असे झाले तर समायोजन होण्यास कठीण जाते. अभिक्षमतेस इंग्रजीत ‘ऍप्टिट्यूड’ असे म्हणतात.
सध्या विद्यार्थ्यांसाठी बर्‍याच अभिक्षमता कसोट्या उपलब्ध आहेत.
* जनरल ऍप्टिट्यूड टेस्ट बॅटरी (जीएटीबी) – यामध्ये विविध क्षमता मोजल्या जातात.
जी- सर्वसाधारण तर्क क्षमता – जनरल ऍबिलिटी
व्ही- भाषिक – व्हर्बल ऍप्टिट्यूड
एन- संख्येची – न्युमरिकल ऍ.
एस- अवकाशसंबंधी – स्पॅटिकल ऍप्टि.
पी – संवेदन क्षमता – फॉर्म परसेप्शन
सी – लेखणी गती – क्लरीकल परसेप्शन, संवेदन क्षमता
के – स्नायुचे सहकार्य क्षमता – मोटर को-ऑर्डिनेशन
एफ- बोटांची क्षमता – फिंगर डेक्सिटरिटा
एम- स्वतः काम करण्याची कुवत (स्नायू वापरून) – मॅन्युअल डेक्सिटीन
मोजल्या जातात. त्याचप्रमाणे ज्ञानप्रबोधिनी पुणे यांच्यातर्फे घेण्यात येणार्‍या‘आय ऍम ऍप्टिट्यूड टेस्ट’ मध्येही बर्‍याच क्षमता व अभिरुची कल पाहिला जातो. यांचा योग्य वेळी वापर केल्यास व्यक्तिविकास व योग्य क्षेत्र, व्यवसाय निवडण्यास मदत होते.
काही उदाहरणे पुढीलप्रमाणे –
अ. क्र. व्यवसाय आवश्यक असणार्‍या क्षमता
१. शिक्षक बौद्धिक, भाषिक, तर्क, सामाजिक सांख्यिकी क्षमता व स्मृती
२. डॉक्टर बौद्धिक, तर्क, चित्रस्मृती, भाषिक, सामाजिक
३. अभियंता (एपसळपशशी) बौद्धिक, तर्क, चित्रस्मृती, —-, भाषिक, सामाजिक, सांख्यिकी, स्मृती क्षमता
४. दुकानदार किंवा इतर आर्थिक व्यवसाय करणारा बौद्धिक, भाषिक, सामाजिक, सांख्यिकी, स्मृती व क्षमता, विचार
५. ड्रायव्हर बौद्धिक तर्क, अवकाशासंबंधी, भाषिक, स्नायूचे व बोटाचे सहक क्षमता.
६. विज्ञानामधील इतर शाखेत बौद्धिक, भाषिक, तर्क, सामाजिक, चित्रस्मृती, संख्याची स्मृती व क्षमता, अवकाश.
यावरून आपण आपल्या मुलाची ए.एस.सी.मध्ये असताना उत्तीर्ण झाल्यावर लगेच क्षमता (अभिक्षमता) पाहिल्यास त्यास योग्य दिशेने मार्गदर्शन करण्यास सोपे जाईल व त्याची आवड व क्षमता त्या विद्यार्थ्यास/विद्यार्थीनीस भावी जीवनात यशाच्या शिखरावर पोचवेल.