धेंपो क्लबची स्पोर्टिंगवर मात

डॉन बॉस्को ओरेटरी मैदानावर काल सोमवारी झालेल्या जीएफए १८ वर्षांखालील लीग स्पर्धेतील सामन्यात धेंपो स्पोटर्‌‌स क्लबने स्पोर्टिंग क्लब दी गोवावर १-० असा निसटता विजय मिळविला. सामन्याच्या सुरुवातीच्या काही मिनिटांत उभय संघांनी आक्रमणाचे फार कमी प्रयत्न करताना चेंडूवर ताबा राखण्याला प्राधान्य दिले. स्पोर्टिंगच्या अमन गोवेकर व कामितियो यांनी धेंपोचा बचाव भेदण्याचे अयशस्वी प्रयत्न केले. पहिल्या सत्राअखेर सामना गोलशून्य बरोबरीत होता. दुसर्‍या सत्रात क्लेटस पिंटोच्या पासवर फेड्रिच फर्नांडिस याने स्पोर्टिंगचा बचाव भेदताना सामन्यातील एकमेव गोलाची नोंद केली. धेंपो आपला शेवटचा साखळी सामना गोवन एफसीविरुद्ध खेळणार आहे. उभय संघांना जेतेपदाची संधी असल्याने हा सामना चुरशीचा होणे अपेक्षित आहे.