धावपटू गोमतीवर चार वर्षांची बंदी

>> प्रतिबंधित पदार्थसेवनप्रकरणी दोषी

>> गमवावे लागले आशियाई ऍथलेटिक्स सुवर्णपदक

भारताची ३१ वर्षीय स्टार ऍथलिट गोमती मरीमुथू उत्तेजक चाचणीत दोषी आढळल्याने वर्ल्ड ऍथलेटिक्स ट्रिब्युनालनेे तिच्यावर ४ वर्षांची बंदी घातली आहे. बंदीमुळे मरीमुथूला तिने गेल्या वर्षी मिळविलेले एशियन ऍथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेतील सुवर्णपदक गमवावे लागले आहे.

डोपिंगविरोधी नियमांच्या उल्लंघनाबाबत अण्णा बोर्दीगुवा यांच्या अध्यक्षतेखाली वर्ल्ड ऍथलेटिक्स ट्रिब्युनालने हा निर्णय घेतला आहे. तिच्यावर लादलेली चार वर्षांची बंदी ही १७ मे २०१९ ते १६ मे २०२३पर्यंत लागू राहील. वर्ल्ड ऍथलेटिक्स ट्रिब्युनालने हा निर्णय घेताना मरीमुथू हिने एडीआर कलम २.१ आणि २.२चे उल्लंघन केल्याचे म्हटले आहे. त्यात तिने प्रतिबंधित पदार्थाचे सेवन केल्याने तिच्या मूत्र चाचणीचे नमुनेही सकारात्मक आलेले असल्याचे स्पष्ट केले आहे.

गोमतीवर लादल्या गेलेल्या बंदीमुळे तिच्या गेल्या वर्षी १८ मार्च ते १७ मे दरम्यानच्या सर्व स्पर्धांतील निकाल अपात्र ठरविण्यात आले आहेत. तमिळनाडूच्या या ऍथलिट्ला पदके, क्रमवारी गुण, बक्षिसे व स्पर्धांतील सहभागाची रक्कमही गमवावी लागणार आहे.
गेल्या वर्षी मे महिन्यात गोमतीच्या ‘ए’ चाचणीचा नमुना सकारात्मक आल्याने तिला तात्पुरते निलंबित करण्यात आले होते.