धबधब्यांचा घाट

धबधब्यांचा घाट

– गोपिनाथ विष्णू गावस

आमची सासाय म्हादय माये, आमचां दायज म्हादय माये
आमची माय म्हादय माये, आमची साथ म्हादय माये…
गोंयची जीव जीवावळ, नमन तुका गाये…
म्हादय माये… म्हादय माये… म्हादय माये…

या म्हादय गीतातून कवीने म्हादईच्या परिसरातील दर्‍या-खोर्‍यांचे, ओहळ-झर्‍यांचे, घसघसणार्‍या धबधब्यांचे, नदी-नाल्यांचे, झाडा-पेडांचे आणि गगनाला गवसणी घालणार्‍या पश्‍चिम घाटातील डोंगरांचे चित्र डोळ्यांसमोर ऊभे केले आहे. या पश्‍चिम घाटाला चोर्ला आणि अनमोड घाट लागतो. देगाव गावच्या माथ्यावरील डोंगरावर असलेल्या दगडाच्या खाचरातून अविरतपणे झरत येणार्‍या झर्‍यातून म्हादईचा उगम होतो. देगाव गावात मनगटा एवढा प्रवाह पदराला घेत प्रवाहित होणारी ही म्हादय, पुढे चोर्ला घाट आणि अनमोड घाटातील वेगवेगळ्या झरी, ओहळ, ओले-सुके पानशिरे, सरसरून कोसळणारे धबधबे आणि अनेक लहान थोर नद्यांना आपल्या कवेत घेत रौद्ररूप धारण करून गोमंतकाच्या भूमित अवतरते. आषाढ – श्रावणातले म्हादईचे रौद्ररूप जसे जीवाला वेड लावते तसेच वेड चोर्ला घाटातील धबधबे प्रत्येकाच्या मनाला लावतात.
या आषाढ – श्रावणात धरित्री पानाङ्गुलांनी बहरून येते. धरित्रीचा नवा जन्मच तो. या दोन्ही महिन्यांत चोर्ला घाटात महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी असलेल्या डोंगर माथ्यावरच्या दगड धोंड्यांनी आणि कडेकपारिनी जणू ङ्गुला-पानांचा आयतारच माथ्यावर माळलेला असतो. म्हादईच्या दर्‍या-खोर्‍यांतील पोयों धबधबा, शितोड्यांचा धबधबा, लाडकी वझर, काट्या धबधबा आणि विर्डी आणि चोर्लाच्या सड्याला लागून डोंगरावरून कोसळणारा विर्डीचा ‘वझरा सकला’ हे धबधबे येणार्‍या प्रत्येकाच्या डोळ्यांचे पारणे ङ्गेडतात. या दोन्ही महिन्यांमध्ये चोर्ला घाटाचा सारा परिसर धबधबेमय होतो.
हणजुणे धरणाच्या चार दरवाज्यांतून कोसळणारे धरणाचे दुधाळ पाणी प्रत्येक पर्यटकाला आकर्षित करून घेते. केरीची हद्द काढून चोर्ला घाट माथ्यावर जाताना हणजुणे धरणाच्या जवळच कोसभर गेल्यानंतर, शेल्यासारखा सरसरत हणजुणे धरणाकडे धाव घेणारा वझर वा धबधबा चोर्ला घाटाच्या दिशेने जाणार्‍याचे खळखळत स्वागत करतो. कोणी त्याला सरपटा धबधबा म्हणतो तर कुणी शेलो वझर. कुणी सरसरा वझर म्हणतो, तर कुणी पातळ वझर. प्रत्येकाच्या नजरेतील कॅमेर्‍याने जसा त्याला टिपावा, तसाच तो दिसतो. या धबधब्याची किमयाच वेगळी. हा धबधबा वरून कोसळत नाही तर तो शंभरेक मिटरवरून घसरत, सरपटत खाली येतो.
या धबधब्याच्या दोन्ही बाजूंनी असलेली झाडी वार्‍याच्या झुळकीबरोबर धबधब्याला स्पर्शण्यासाठी झेपावत असल्याचा भास झाल्याशिवाय राहत नाही. म्हणूनच या शेल्या धबधब्याचे सौंदर्य पाऊस जसा कोसळेल तसे आणखीच ङ्गुलत जाते. त्याच्यापुढे असलेल्या वन विभाग नर्सरीच्या परिसरातून खळखळत – घडघडत येणार्‍या धबधब्याच्या आवाजानेच उरात धडकी भरते. हा आवाज पाण्याचा आणि आपल्या बरोबर खाली घालून घेणार्‍या दगडांचा. हा खळखळा धबधबाच जणू. पाऊस कोसळू लागला की या धबधब्याचा आवाज ऐकावा. तुडूंब भरलेला बांध ङ्गुटावा आणि पाणी खळखळून जावे असेच त्याचे रौद्ररूप. साधारण दोनशे मीटर इतका लांब असा हा धबधबा. नर्सरीकडे असलेल्या पुलाखालून एकदम उसळी मारूनच तो खाली कोसळतो तो गुळ्‌ळे नदीच्या प्रवाहाला भेटण्यासाठी!
हणजुणे धरण ते वझरा सकला धबधब्याचे दर्शन होईपर्यंत साताठ कि. मी. परिसराच्या चोर्ला घाटात अनेक लहान-मोठ्या धबधब्यांची पिलावळच आपल्याला जळस्थळी खळखळताना दिसते. हे धबधबे एक आणि दोन नव्हेत तर कमीत कमी दहा-पंधरा धबधब्यांची पिले अक्षरशः तुम्हांला तिथून हलूच देत नाहीत. पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात. त्यांचे खदखदून हास्य पाहून त्यांचे एक तरी तुषार माथ्यावर घेतल्याशिवाय पुढे जाण्यास मन तयार होत नाही. चोर्ला घाटाच्या दोन्ही बाजूंनी दुधाच्याच झरी ङ्गुटाव्यात असेच भासू लागते.
त्या धबधब्यांना काय म्हणावे तेच कळत नाही. एक झाडूच्या खुटार्‍यासारखा, तर दुसरा शिरशिरणारा, एक सुपातील भात सरसरत पडावे तसा सरसरणारा तर दुसरा मातीच्या गाडग्यात लाह्या ङ्गरङ्गराव्यात तसा ङ्गरङ्गरत कोसळणारा ङ्गरङ्गरा धबधबा. तर एखादा सुळकी घेत खाली येणारा सुळका धबधबा. हे सगळे धबधबे पाहताना मनात चैतन्याचे कारंजे निर्माण होतात. आनंदाला भरते येते. मनाला समाधानाची पालवी ङ्गुटते.
जांभळीच्या पुढे गेल्या नंतर दर्शन होते ते वझरा सकलाच्या तीन धबधब्यांचे. हे धबधबे म्हणजे दुधाचेच वझर. हा नसर्गाचा चमत्कार चोर्ला घाटातून जाणार्‍या प्रत्येकाला जीवनाचेच गीत सांगतो. जगण्याचा नवा मंत्र देतो – जगावे तर असे जसे वझराच्या खळखळासारखे. वझरा सकलाचा हा धबधबा चोर्ला घाटातील सड्यावरील तीठ्यावर उगम पावतो. या सड्यावर तीन लहान ओहळ आहेत. त्या ओहळांचे मीलन चोर्ला गावातील सातेरी देवळाच्या परिसरात म्हणजेच केळीच्या बेटाकडे होते आणि अनेक झर्‍यांना बरोबर घेत चोर्ल्याची ही नदी वझरा सकलाच्या सड्यावरून विर्डी गावाच्या हद्दीत महाराष्ट्रात कोसळते, ती थेट वाळवंटीच्या भेटीसाठी! बियांच्या कोंडीत विसावा घेत महाराष्ट्राच्या विर्डी गावात कोसळणारा हा धबधबा आज जगाच्या नकाशावर पोहचलेला आहे. वझरा सकलाचा हा धबधबा म्हणजे चोर्ला घाटातील चमत्कारच! त्याच्यावर बोलण्यापेक्षा त्याला बघण्यात जो अपूर्व आनंद आहे तो तनामनात भरून घ्यावा बस्स…!
चोर्ला घाटातील धबधबे आज पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात. हे धबधबे पर्यटकांसाठी पर्वणीच! पावसातील तीन महिन्यांमध्ये चोर्लाघाट पर्यटकांनी गजबजलेला असतो. निसर्गाची ही सारी किमया आमच्यासाठीच आहे. परंतु आनंद प्राप्तीचे स्वरूप मात्र आज बदलायला हवे.
आज अनेकजण या सगळ्या परिसरातील धबधबे पहाण्यास जातात आणि अक्षरशः या परिसराची दैना करतात. सध्या पर्ये पत्रकार संघ, स्वामी विवेकानंद पर्यावरण जागृती ङ्गौज, विवेकानंद स्मृती संघ, युवा कुंभार समाज या केरी, सत्तरीतील अनेक सामाजिक क्षेत्रात कार्य करणार्‍या संस्थांनी चोर्ला घाटातील सौंदर्याचे जतन आणि संवर्धनाचा विडा उचलला असल्याने चोर्लाघाट परिसर स्वच्छ, सुंदर दिसत आहे. वन खाते, गोवा पर्यटन खात्याच्या कर्मचारीवर्गाने तर हा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी कंबर कसली आहे. काल पंधरा ऑगस्ट आपल्या देशाचा स्वातंत्र्यदिन. जगण्याचा अर्थ शिकवणार्‍या स्वातंत्रसैनिकांचा आदर्श मनात ठेवत पर्ये पत्रकार संघाने चोर्लाघाट स्वच्छता अभियान राबवले. हे अभियान त्यांनीच का राबवावे, आम्हीही या अभियानाचे घटक म्हणून जर दर दिवशी देशासाठी सगळ्यांनी कार्य केले तर देशाच्या खर्‍या स्वातंत्र्यात भर पडेल, नाही का?
बंधु-भगिनींना सगळ्यांनाच विनंती आहे की जरूर या घाटातील धबधबे, वझर आणि निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटा. निर्सागाची हानी करण्याचा आम्हांला अधिकार नाही. निदान आम्ही चांगले जर काही करू शकलो नाही तर वाईट करण्यापासून तरी दूर राहूया. हे चोर्लातील धबधबे, वझर, खळखळ, रान, डोंगर, झाडे, झुडपे, ङ्गुले आणि कपारींच्या सौंदर्याचा आनंद घेत असताना कोणत्याही प्रकारे निर्सगाला हानी पोहचू देणार नाही, माझ्या हातून निसर्गाचा र्‍हास होणारे कसलेही कृत्य होणार नाही असा ठाम निश्‍चय करूया. आज हणजुणे धरणाच्या जलाशयात हणजुणे, गुळ्ळे, केळावडे आणि पणसुली या चारही गावांच्या आतील भागात वेगवेगळ्या प्रकारचा कचरा साठलेला आहे. हा कचरा ना मातीत मिसळणारा आहे ना, पाण्यात विरघळणारा. अनेक प्रकारचे प्रदूषण निर्माण करणारा हा कचरा सगळा चोर्ला घाटातील अनेक धबधब्यांच्या खळखळणार्‍या पाण्यातून जलाशयात आलेला आहे. याला जबाबदार आम्हीच आहोत. बंधु-भगिनींनो, हे धबधबे जर असेच वर्षानुवर्षे खळखळत राहायला हवेत, तर या परिसराला निसर्गाच्याच भावनेने पहायला हवे. तरच या घाटातील जैविक संपदा समृद्ध होईल. आपल्या डोंगरांचे वैभव अबाधित राहील. हे आपले वैभव आहे. घाट समृद्ध राहिला तरच घाटाच्या पायथ्याशी असणार्‍यांचे जीवन समृद्ध होईल.
———

Leave a Reply