द. आफ्रिकेकडून श्रीलंकेचा धुव्वा

>> पराभवामुळे लंकेचा ‘उपांत्य’ प्रवेश धोक्यात

गोलंदाजांच्या प्रभावी कामगिरीनंतर हाशिम आमला व कर्णधार फाफ ड्युप्लेसी यांच्या बहारदार अर्धशतकांवर आरुढ होत काल शुक्रवारी दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेचा ९ गडी व ७६ चेंडू राखून पराभव केला. श्रीलंकेने विजयासाठी ठेवलेले २०४ धावांचे माफक लक्ष्य द. आफ्रिकेने ३७.२ षटकांत गाठले. या सामन्यापूर्वीच विश्‍वचषक स्पर्धेतील आफ्रिकेचे आव्हान संपुष्टात आले होते. परंतु, या पराभवामुळे लंकेची वाटचाल अधिक बिकट बनली असून त्यांची जवळपास ‘एक्झिट’ झाली आहे.

माफक लक्ष्याचा पाठलाग करताना द. आफ्रिकेने डी कॉक (१५) याला लवकर गमावले. आमला व ड्युप्लेसी यांनी यानंतर दुसर्‍या गड्यासाठी १७५ धावांची अविभक्त भागीदारी रचली. आमलाने आपले ३९वे तर ड्युप्लेसीने ३५वे एकदिवसीय शतक ठोकले. श्रीलंकेकडून एकमेव बळी लसिथ मलिंगा याने घेतला.

तत्पूर्वी, दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून गोलंदाजी स्वीकारली. दक्षिण आफ्रिकेने आपल्या संघात दोन बदल करताना लुंगी एन्गिडी व डेव्हिड मिलर यांच्या जागी जेपी ड्युमिनी व ड्वेन प्रिटोरियस यांना खेळविले तर श्रीलंकेने नुवान प्रदीपला बाहेर बसवून सुरंगा लकमलला मौका दिला. श्रीलंकेच्या डावाची सुरुवात खराब झाली. सामन्यातील पहिल्याच चेंडूवर रबाडाने लंकेचा कर्णधार दिमुथ करुणारत्ने याला दुसर्‍या स्लीपमध्ये ड्युप्लेसीकरवी झेलबाद केले. प्रारंभीच्या या धक्क्यानंतर अविष्का फर्नांडो व कुशल परेरा या आक्रमक फलंदाजांनी संघाला ६७ धावांपर्यंत पोहोचविले. दहाव्या षटकात अविष्का व १२व्या षटकात कुशल परतल्यानंतर त्यांच्या डावाला घरघर लागली. मॅथ्यूज व कुशल मेंडीस यांनी कसोटी क्रिकेटला साजेशी फलंदाजी करताना गरजेपेक्षा जास्त निर्धाव चेंडू खेळत दबाव वाढवला. यानंतर त्यांनी स्वतःच्या विकेट्‌सही खराब फटके खेळून बहाल केल्या. धनंजय डीसिल्वा व जीवन मेंडीस यांनी त्यांचाच कित्ता गिरवताना कुर्मगती फलंदाजी करत दक्षिण आफ्रिकन गोलंदाजांना वर्चस्व गाजवू दिले. स्थिरावल्यानंतर त्यांनीदेखील बेजबाबदार फटका खेळून संघाला अधिक संकटात टाकले. लंकेचा संघ पूर्ण ५० षटके खेळू शकला नाही. ४९.३ षटकांत त्यांचा डाव २०३ धावांत संपला.

धावफलक
श्रीलंका ः दिमुथ करुणारत्ने झे. ड्युप्लेसी गो. रबाडा ०, कुशल परेरा त्रि. गो. प्रिटोरियस ३०, अविष्का फर्नांडो झे. ड्युप्लेसी गो. प्रिटोरियस ३०, कुशल मेंडीस झे. मॉरिस गो. प्रिटोरियस २३, अँजेलो मॅथ्यूज त्रि. गो. मॉरिस ११, धनंजय डीसिल्वा त्रि. गो. ड्युमिनी २४, जीवन मेंडीस झे. प्रिटोरियस गो. मॉरिस १८, थिसारा परेरा झे. रबाडा गो. फेहलुकवायो २१, इसुरु उदाना झे. व गो. रबाडा १७, सुरंगा लकमल नाबाद ५, लसिथ मलिंगा झे. ड्युप्लेसी गो. मॉरिस ४, अवांतर २०, एकूण ४९.३ षटकांत सर्वबाद २०३
गोलंदाजी ः कगिसो रबाडा १०-२-३६-२, ख्रिस मॉरिस ९.३-०-४६-३, ड्वेन प्रिटोरियस १०-२-२५-३, आंदिले फेहलुकवायो ८-०-३८-१, इम्रान ताहीर १०-०-३६-०, जेपी ड्युमिनी २-०-१५-१
दक्षिण आफ्रिका ः क्विंटन डी कॉक त्रि. गो. मलिंगा १५, हाशिम आमला नाबाद ८० (१०५ चेंडू, ५ चौकार), फाफ ड्युप्लेसी नाबाद ९६ (१०३ चेंडू, १० चौकार, १ षटकार), अवांतर १५, एकूण ३७.२ षटकांत १ बाद २०६
गोलंदाजी ः लसिथ मलिंगा १०-१-४७-१, धनंजय डीसिल्वा ४-०-१८-०, सुरंगा लकमल ६-०-४७-०, थिसारा परेरा ५.२-१-२८-०, जीवन मेंडीस ७-०-३६-०, इसुरू उदाना ५-०-२९-०

माशांचा मैदानावर हल्ला
श्रीलंकेची फलंदाजी सुरू असताना ४८ व्या षटकात ख्रिस मॉरिसच्या गोलंदाजीदरम्यान मैदानात अचानक माशांचा थवा आला. या अनाहुत पाहुण्यांमुळे सर्व खेळाडूंनी मैदानावर आपला चेहरा झाकत मैदानावर झोपणे पसंत केले. क्रिकेट सामना सुरू असताना माशांनी हल्ला करण्याची ही काही पहिलीच वेळ नव्हती. २००८ साली भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय सामना माशांमुळे एक तास स्थगित ठेवण्यात आला होता. भारत व इंग्लंड यांच्यातील दिल्लीतील फिरोजशाह कोटला मैदानावरील एका कसोटीतही हाच प्रत्यय आला होता.

दिमुथचा ‘करुण’ अंत
श्रीलंकेचा कर्णधार दिमुथ करुणारत्ने पहिल्याच चेंडूवर बाद झाला. यंदाच्या क्रिकेट विश्‍वचषकात पहिल्याच चेंडूवर बाद होणारा तो केवळ दुसरा खेळाडू व पहिला कर्णधार ठरला. न्यूझीलंडचा मार्टिन गप्टिल अफगाणिस्तान व न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात पहिल्याच चेंडूवर माघारी परतला होता. विश्‍वचषकात पहिल्याच चेंडूवर बाद झालेल्यांमध्ये हन्नान सरकार (बांगलादेश वि. श्रीलंका, पीटरमॅरिट्‌झबर्ग, २००३), ब्रेंडन टेलर (झिंबाब्वे वि. कॅनडा, नागपूर, २०११), मार्टिन गप्टिल (न्यूझीलंड वि. विंडीज, अफगाणिस्तान, मँचेस्टर, २०१९), दिमुथ करुणारत्ने (श्रीलंका वि. दक्षिण आफ्रिका, चेस्टर ली स्ट्रीट, २०१९), जॉन राईट (न्यूझीलंड वि. ऑस्ट्रेलिया, ऑकलंड, १९९२) यांचा समावेश आहे.