दोन कोरोना रुग्ण सापडल्याने मडगावात भीतीचे वातावरण

पाजीफोंड-मडगाव येथे रविवारी रात्री जुन्ता क्वार्टर्समध्ये दोन कोरोना रुग्ण सापडल्याने भीतीचे वातावरण पसरले. ते दोघे वास्को आरोग्य खात्यात कामाला होते. रविवारी जुन्ता क्वार्टस मधील सरकारी कर्मचारी व इतर नागरिकांनी स्थानिक नगरसेवक आंजेलीन फर्नांडिस यांना भेटून याप्रकरणी संताप व्यक्त केला. या अगोदर तेथील लोकांना याविषयी माहिती द्यायला हवी होती असे त्यांचे म्हणणे होते. काल सोमवारी त्या भागांत सर्व लोक घरातच राहिले.

त्यानंतर जिल्हाधिकार्‍यांनी तो भाग सॅनिटाईज करण्यासाठी अग्नी शामक दलाला पाचारण करून जुन्ता क्वार्टर्समधील फ्लॅटस्, उघड्या जागा व परिसर औषधी फवारणी करुन सॅनिटाईज केला. तसेच आरोग्य खात्याच्या पथकाने येवून पहाणी केली. थंडी, खोकला, झालेल्याची तपासणी केली. दरम्यान मडगाव कोविड इस्पितळाची खाटांची क्षमता २०० होती. पण तेथे आता २०२ पेक्षा जास्त रुग्ण झाल्याने डॉक्टर व परिचारिकांवर ज्यादा बोजा पडला आहे.

बाजारपेठेत लोकांची वर्दळ घटली
आकें, पाजीफोंड, भागात कोरोना रुग्ण सापडल्याने मडगाव बाजारात खरेदीसाठी येणार्‍यांची संख्या घटलेली दिसली. त्यांनी बाजारांत येण्यापेक्षा घरीच राहणे पसंत केले.

बोर्ड्यातही रुग्ण असल्याचे वृत्त
बोर्डा येथे सरकारी निवासात राहणार्‍या दोन कदंब महामंडळाच्या कर्मचार्‍यांना संसर्ग झाल्याचे वृत्तही सर्वत्र पसरले. त्यापैकी एक मेकॅनिक व एक लिपिक असल्याचे समजते. त्यामुळे बोर्डा परिसरातही चिंतेचे वातावरण दिसून आले.