ब्रेकिंग न्यूज़

दोनापावलच्या अपघातात दोघे युवक जागीच ठार

दोनापावल येथे काल पहाटे ४.३० च्या सुमारास ट्रिपल सीट बसवून यामा मोटरसायकलवरून बेफाम वेगाने जाणार्‍यांनी सूचना फलकाला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोघा युवकांचे जागीच निधन झाले तर एक युवक गंभीर जखमी झाला आहे. अपघातात सापडलेले युवक मित्रा बाजार करंजाळे पणजी येथील रहिवाशी आहेत.

या अपघातात रूफ आन्तोनियो वेल्हो (१६) आणि सोहेल शेख (१९) जागीच ठार झाले तर जेसबन पावलो सिक्वेरा (१९) हा गंभीर जखमी झाला आहे. जेसबन हा युवक यामा मोटरसायकल (क्र. जीए ०१ जे ०४८२) चालवत होता. मोटर सायकलवर एकूण तिघे युवक स्वार होते. चालक जेसबन याने हेल्मेट परिधान केले नव्हते. एनआयओ सर्कलकडून भरधाव जाताना ब्रिटीश सिमेट्री दोनापावल येथे जेसबन याचा मोटरसायकलवरील ताबा सुटल्याने रस्त्याच्या बाजूच्या सूचना फलकाला जोरदार धडक दिली. यात दोघांचे जागीच निधन झाले तर चालक जेसबन गंभीर जखमी झाला. त्याच्यावर सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या प्रकरणी राजाराम बागकर तपास करीत आहेत. हवालदार अनिल कुर्टीकर यांनी पंचनामा केला. मोटरसायकल चालक जेसबन यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.