दुसरा अंक

कर्नाटकातील यावेळच्या नव्या नाटकाचा कालचा दुसरा अंक परवाच्या पहिल्या अंकापेक्षाही अधिक नाट्यमय म्हणावा लागेल. सत्ताधारी कॉंग्रेस आणि जेडीएसच्या आमदारांचे राजीनामासत्र सुरू झाले आणि त्याचा राजकीय फायदा उपटण्यासाठी भारतीय जनता पक्ष पुढे सरसावला असतानाच अमेरिकेहून परतलेल्या मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामींनी हा डाव परतवून लावण्यासाठी आगळीच खेळी रचली. सरकारमधील कॉंग्रेस आणि जेडीएसच्या सगळ्या मंत्र्यांनी आपल्या मंत्रिपदांचे राजीनामे सादर करून मुख्यमंत्र्यांना मंत्रिमंडळ फेररचनेची संधी उपलब्ध करून दिली. म्हणजेच काहीही करून हे बंड शमवायचे आणि भाजपच्या तोंडी येऊ घातलेला घास पळवायचा अटीतटीचा प्रयत्न कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी चालवलेला आहे. अर्थात, त्याला किती यश येईल, त्यासाठी किती तडजोडी कराव्या लागतील हे गुलदस्त्यात जरी असले, तरी आपल्या हातची सत्ता अशी सुखासुखी ते सोडू इच्छित नाहीत हेही या घडामोडींतून काल स्पष्ट झाले आहे. सरकारमधील बंडाळीमागे कारणे अनेक होती. एकेक पान गळावे तसे सरकारमधून एकेक आमदार गळू लागले. त्यामागे गेल्या अनेक महिन्यांपासून धुमसत असलेली नाराजी जशी कारणीभूत होती, तशीच मंत्रिपदाची हाव हेही एक कारण होते. त्यामुळे अशा असंतुष्टांना आता मंत्रिपदे देऊ करून त्यांचे बंड शमविण्याचा अखेरचा प्रयत्न कुमारस्वामी करून पाहणार आहेत असे दिसते. अर्थात, भारतीय जनता पक्षाला सध्याच्या बंडाची ही सुवर्णसंधी दवडायची नाही. मुंबईच्या ज्या पंचतारांकित हॉटेलमध्ये बंडखोर आमदार उतरले आहेत, तेथे एकीकडे कॉंग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी जोरदार निदर्शनांचे सत्र चालवलेले आहे. या घोडेबाजाराचा निषेध व्यक्त करण्यासाठी तेथे घोडा देखील आणला गेला. परंतु एकीकडे कॉंग्रेसजनांकडून आपल्या पक्षाच्या कर्नाटकातील बंडखोर आमदारांविरुद्धचा रोष हॉटेलबाहेर असा जहाल पद्धतीने प्रकट होत असतानाच खुद्द भाजपचे महाराष्ट्रातील एक आमदार प्रसाद लाड गेले दोन दिवस जातीने या सार्‍या बंडखोरांच्या व्यवस्थेत गुंतलेले दिसत आहेत. म्हणजेच या सगळ्या बंडाळीची सूत्रे आता भाजपाने आपल्या हाती घेतलेली दिसत आहेत. कर्नाटकचे भाजपचे ज्येष्ठ नेते बी. एस. येडीयुराप्पा काल म्हणाले की आम्ह्ी आणखी आमदार फुटण्याच्या प्रतीक्षेत आहोत. म्हणजे फोडाफोडीचे आणखी प्रयत्न सुरू झालेले आहेत. सरकार समर्थक अपक्ष आमदार व मंत्री एच. नागेश हे काल मुंबईला जाऊन बंडखोरांना मिळाले. आपले अपहरण झाल्याचे नागेश यांनी आपल्याला फोन करून सांगितले असल्याचा दावा कॉंग्रेसचे नेते डी. के. शिवकुमार यांनी केला आहे. परंतु हा दावा पटण्याजोगा नाही, कारण नागेश यांनी स्वतः राज्यपालांकडे आपले राजीनामापत्र सोपवलेले असून भाजपला पाठिंबा देणारे पत्रही सादर केलेले आहे. हे सगळे आपल्याकडून जोरजबरदस्तीने करवून घेतले गेले असे म्हणायला ते कुक्कुले बाळ थोडेच आहेत! कर्नाटकातील कुमारस्वामी सरकार संकटात आले आहे हे तर दिसतेच आहे. फार तर सरकार वाचवण्यासाठी थोडी उसंत मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू राहील. राज्य विधानसभेचे अधिवेशन थोडे लांबणीवर टाकण्याचा व दरम्यान बंडखोरांची नाराजी दूर करण्याचा त्यांचा प्रयत्न राहू शकतो, परंतु त्यांचा बंडखोरांशी संपर्क तर व्हायला हवा! भारतीय जनता पक्षाने या बंडाचा फायदा उठवण्यासाठी जे काही चालवले आहे, ते नीतीमत्तेला धरून नाही. आमचा यात हात नाही असे पक्षनेते कितीही कानीकपाळी ओरडून सांगत असले, तरी झालेल्या बंडाळीचा फायदा उठवत कधी एकदा कर्नाटकची सत्ता हस्तगत करतो असे त्यांना झालेले आहे. गेल्या निवडणुकीनंतर ज्या प्रकारे सत्ता हस्तगत करण्याचा प्रयत्न भाजपने केला व जो अंगलट आला, त्यातून पक्षाची प्रतिमा पार डागाळून गेली होती. आता पुन्हा एकदा बंडाचे निमित्त साधून जो काही घोडेबाजार पक्षाने चालवलेला आहे, तो तर त्याहून अधिक लांच्छनास्पद आहे. अशाने सत्ता हस्तगत जरी झाली, तरी जनमताच्या कौलाचा तो घोर अनादर ठरेल. ‘लोकशाहीचा बळी गेला, मतदारांच्या कौलाचा अनादर झाला तरी त्याची कोणाला फिकीर नाही हेच अशा प्रकारच्या फाटाफुटीचे मूळ आहे’ असे आम्ही काल म्हटले होते. खरोखरच अत्यंत सवंग पातळीवरून कर्नाटकातील राजकीय नाटक आज रंगलेले आहे. अशा प्रकारे मागल्या दाराने सत्ता हस्तगत करता आली, तरी अशा सरकारला आणि त्यातील घटकांना जनतेच्या मनामध्ये प्रतिष्ठा ती काय राहील? परंतु जनतेची तमा आहे कोणाला? सत्ता आली की गुळाच्या ढेपेला मुंगळे चिकटतात तशी जनता आपली कामे घेऊन दारात उभी राहील हे सत्तेला हपापलेल्या मंडळींना पक्के ठाऊक आहे. परंतु जनता हे जे सगळे चालले आहे ते पाहते आहे आणि राजकारणामध्ये सत्ता काही चिरंतन गोष्ट नसते!