दुजानाचा खात्मा

लष्कर ए तोयबाचा काश्मीरमधील विभागीय कमांडर म्हणवणारा कुख्यात दहशतवादी अबु दुजाना याला काल सुरक्षा दलांनी पुलवाम्यातील हकरीपुरात कंठस्नान घातले. बुरहान वानी, सबझार भट आणि बशीर लष्करीनंतर सुरक्षा दलांनी खात्मा केलेला हा चौथा मोठा दहशतवादी आहे. यावर्षी जानेवारीपासून जुलैपर्यंत लष्कर आणि जम्मू काश्मीर पोलीस यांनी संयुक्त मोहिमेत १०२ दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे आणि येणार्‍या काळात आणखी अनेकांचा काटा काढला जाणार आहे. गोळीस गोळीने उत्तर देत ज्युलिओ रिबेरोंनी जसा पंजाबमधील खलिस्तानी दहशतवाद नामशेष केला, तसे काश्मीरमधील दहशतवाद निपटून काढण्याचे धोरण सरकारने अवलंबिलेले दिसते. परंतु एक मोठा फरक आहे, जो विसरून चालणार नाही. पंजाबमध्ये खलिस्तानवाद्यांना अगदी मर्यादित जनसमर्थन होते. काश्मीर खोर्‍यात दहशतवाद्यांना काही जिल्ह्यांमध्ये तरी व्यापक जनसमर्थन आहे. काल मारल्या गेलेल्या अबु दुजानाला यापूर्वी तब्बल जमावाने सुरक्षा दलांवर दगडफेक करून पळून जायला मदत केली होती. एक – दोनदा नव्हे, तब्बल पाच वेळा तो पळून जाण्यात यशस्वी ठरला. शेवटी एकदाचा त्याचा काटा काढता आला. पण आता त्याची जागा अबु इस्माईलसारखा दुसरा कोणी घेईल आणि मृत्यूचे तांडव सुरू राहील. सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांची हिट लिस्ट बनवून एकेकाचा खात्मा चालवलेला असला, तरीही त्यांना दक्षिण काश्मीरमध्ये काही जिल्ह्यांतून असलेले जनसमर्थन, त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन नव्याने दहशतवाद्यांना सामील होणारे तरूण, सुरक्षा दलांच्या आक्रमक कारवाईचे भांडवल करून स्थानिक नागरिकांमध्ये भारताविषयी निर्माण केला जाणारा रोष या बाबीही दुर्लक्षिण्यासारख्या मुळीच नाहीत. स्थानिक काश्मिरी नेत्यांच्या दुटप्पीपणाचे दर्शन नेहमीच घडते. त्यातून अशा अपप्रचाराला बळकटीच मिळते. काश्मीरमध्ये नव्या पिढीला भारताविरुद्ध चिथावण्याचे मोठे षड्‌यंत्र पाकिस्तान समर्थित दहशतवाद्यांनी आखलेले आहे. तेथील शाळा जाळल्या गेल्या. शाळा जळाल्या की मुले शिकायला मदरशांमध्ये जातील हा त्यामागील उद्देश आहे. तेथे त्यांच्यात धर्मांधतेचे विष कालवून भारताविरुद्ध चिथावले जाते आहे. त्यामुळे एकीकडे दहशतवाद्यांना डोके वर काढण्याची संधी अजिबात न देता त्यांच्याविरुद्धची धडक कारवाई सुरू ठेवताना दुसरीकडे नव्या पिढीमध्ये रुजू लागलेला कट्टरतावाद निपटून काढण्यासाठीही प्रयत्न व्हायला हवेत. सरकारने संवादाची दारे बंद केल्याने काश्मिरींमधील राष्ट्रीयत्वाच्या भावनेचा र्‍हास होण्याची भीती आहे. तेथील राजकीय नेतृत्व तर केव्हाच कुचकामी ठरलेले आहे. अशावेळी केवळ जोरजबरदस्तीच्या मार्गाने काश्मीर शांत करता येणार नाही. आम भारतीय आणि काश्मिरी जनता यांच्यातील दरी सांधण्याचे व्यापक प्रयत्न झाले पाहिजेत. आज दक्षिण काश्मीरमधील तरूण मुले उदरनिर्वाहाच्या, प्रगतीच्या काही विशेष संधी समोर नसल्याने हाती अत्याधुनिक बंदुका घेऊन दहशतवादाच्या मार्गाने जाऊ लागली आहेत. त्यांच्या बचावासाठी दगडफेक करणारा जमाव ढाल बनून पुढे सरसावतो आहे. हे चित्र बदलले पाहिजे. बदलावेच लागेल. काश्मिरी तरुणांची व्यथा दुहेरी आहे. एकीकडे दहशतवादाचा मृत्यूकडेच घेऊन जाणारा मार्ग तर दुसरीकडे प्रगतीच्या, विकासाच्या बंद झालेल्या वाटा यात अर्थातच खुल्या मार्गाने तो जायला निघतो. त्यामुळेच कितीही दहशतवादी मारले गेले तरी स्थानिक दहशतवाद्यांची संख्या वाढतेच आहे. शेकडो ‘दहशतवादी’ आजवर मारले गेले, तरी पुन्हा पुन्हा नवे त्यांची जागा घेत आहेत त्याचे कारण हेच आहे. केवळ बंदुकीच्या गोळीने काश्मीरमधील सध्याची परिस्थिती सुधारता येणार नाही. जोडीने खूप काही करावे लागेल. काश्मिरींना विश्वास द्यावा लागेल.